मराठवाड्यातील पावसाने नांदेड, हिंगोली, परभणी, बीड, लातूर जिल्ह्यांना झोडपले !

अतीमुसळधार पावसाने गोदावरी नदीचे रौद्ररूप

सोलापूर – मराठवाड्यात झालेल्या अतीमुसळधार पावसाने पुन्हा एकदा नांदेड, हिंगोली, परभणी, संभाजीनगर, बीड, लातूर आदी जिल्ह्यांना अक्षरश: झोडपून काढले. अतीमुसळधार पावसाने नांदेडमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे, तर गोदावरी नदीने रौद्ररूप धारण केले आहे. विष्णुपुरी प्रकल्पाचे १४ दरवाजे उघडण्यात आले आहेत.

१. बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यामध्ये मुसळधार पावसामुळे मारफळा, भेंड खुर्द, भेंड बुद्रुक आणि जातेगाव येथील ४ प्रकल्प फुटले असून पाण्याचा विसर्ग वेगाने चालू आहे. गेवराई तालुक्यात अमृता नदीला पूर आल्याने पौळाचीवाडी जवळील पूल खचला असून या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. केज, अंबेजोगाई, पाटोदा, परळी येथेही जोरदार पावसाने मोठी हानी झाली आहे. कपिलधार येथील धबधबा पहाण्यासाठी दुचाकीवरून गेलेल्या दोन अल्पवयीन मुलांतील एक मुलगा बेपत्ता झाला, तर दुसर्‍याला वाचवण्यात यश आले आहे.

२. परभणी येथे मागील २४ घंट्यांत ३६.८ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. शहरातील विविध भागांत पाणी शिरले असून ओढे, नदी, नाले दुथडी भरून वहात आहेत. पालम तालुक्यातील गळाटी आणि लेंडी या नद्यांना पूर आला आहे, त्यामुळे नदी पलीकडील १३ गावांचा संपर्क तुटला आहे. चाटोरी येथे गळाटी नदीला पूर आला असून गंगाखेड येथे गोदावरी नदी दुथडी भरून वहात आहे. मानवत तालुक्यातील कोल्हापाटी येथील नदीला पूर आल्याने महामार्ग वाहतूक ठप्प झाली आहे.

३. संभाजीनगर येथे भिजपावसामुळे नागद-गौताळा मार्गावरील म्हैस घाटात दरड कोसळल्याने हा मार्ग ७ सप्टेंबरच्या पहाटेपासून बंद आहे. येथे दिवसभर दरड हटवण्याचे काम युद्ध पातळीवर चालू होते. चाळीसगाव घाटातही दरड कोसळल्याने धुळे-संभाजीनगर राष्ट्रीय महामार्ग बंद असून म्हैस घाट हा पर्यायी मार्ग चालू होता; मात्र ७ सप्टेंबरच्या पहाटेपासून हा घाटही बंद झाल्याने धुळे मार्गे चाळीसगावहून संभाजीनगरला येणार्‍या वाहनांना नागद, सोयगाव किंवा चाळीसगाव नांदगावमार्गे फेरा मारावा लागत आहे.