६१ टक्के आध्यात्मिक पातळीचा महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आलेला चि. ऋग्वेद नीलेश जोशी (वय १३ वर्षे) !
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र चालवणारी पिढी ! या पिढीतील चि. ऋग्वेद नीलेश जोशी एक आहे !
१. जन्मापूर्वी
अ. ‘मी गर्भारपणात प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्राला नियमितपणे प्रदक्षिणा घालायचे, तसेच त्या काळात मी श्रीरामरक्षास्तोत्र आणि मारुतिस्तोत्र नियमितपणे म्हणत असे.
आ. आमच्या घराजवळ सनातन संस्थेचे सेवाकेंद्र होते. ‘त्या ठिकाणची स्वच्छता करणे, आरतीच्या पूर्वी शुद्धी करणे’, या सेवा मी करत असे.
इ. मला गरोदरपणात ‘विश्रांती घ्यावी किंवा झोपावे’, असे वाटले नाही. मी सदैव उत्साही आणि प्रसन्न असायचे. माझ्याकडून बाळाच्या चांगल्या आरोग्यासाठी प्रार्थना होत असे.
२. जन्माच्या वेळी
२ अ. बाळ आणि आई यांची प्रकृती अतिशय चिंताजनक असल्याने आधुनिक वैद्यांनी मुंबईला जाण्यास सांगणे अन् आईच्या जिवाला असलेला धोका टळावा; म्हणून आठव्या मासात शस्त्रकर्म करून बाळाचा जन्म होणे : बाळ पोटात असतांना मला कोणताही त्रास जाणवत नव्हता. मी आठव्या मासात तपासणीसाठी गेले असता आधुनिक वैद्यांनी बाळाची आणि माझी प्रकृती अतिशय चिंताजनक असल्याचे सांगितले होते. ‘बाळाच्या गळ्याभोवती नाळ आल्याने त्याला अन्न आणि प्राणवायू अल्प मिळत आहे. त्यामुळे तातडीने मुंबई येथील मोठ्या रुग्णालयात जावे’, असेही त्यांनी मला सांगितले होते. मुंबईला गेल्यावर तेथील आधुनिक वैद्यांनी ‘हे बाळ जगणार नाही आणि जगले, तर अपंग असेल’, असे सांगितले. माझ्या जिवाला असलेला धोका टळावा; म्हणून आठव्या मासात शस्त्रकर्म करून बाळाचा जन्म झाला. जन्माच्या वेळी बाळाचे वजन १ सहस्र २०० ग्रॅम होते.
३. जन्मानंतर
३ अ. बाळाची प्रकृती पूर्ण बिघडल्यावर ‘परात्पर गुरुदेवांनी बाळाला दोन्ही हातांच्या ओंजळीत घेतले आहे’, असे दिसणे : जन्मानंतर काही मासांत बाळाची प्रकृती पूर्ण बिघडली आणि आधुनिक वैद्यांनी ‘तुम्ही मनाची पूर्ण सिद्धता करा’, असे सांगितले. या प्रसंगात ‘परात्पर गुरुदेवांनी बाळाला दोन्ही हातांच्या ओंजळीत घेतले आहे’, असे मला दिसले आणि त्याच क्षणी मला कोणत्याही प्रसंगाला सामोरे जाण्याचे बळ मिळाले.
३ आ. बाळाच्या सातत्याने तपासण्या होत होत्या, तरीही बाळ सदैव हसतमुख असणे : त्यानंतर २१ दिवसांनी बाळाला घरी आणले. या २१ दिवसांच्या कालावधीत केवळ गुरुदेवांच्या कृपेमुळे आम्ही सर्व जण स्थिर राहू शकलो. रुग्णालयात असतांना ‘बाळाच्या शरिरातील साखरेचे प्रमाण अल्प होणे, त्याला कावीळ होणे, त्याची प्रकृती खालावणे’, यांसारखे अनेक प्रसंग घडले. तेव्हा अतीदक्षता विभागातील परिचारिकांनी सांगितले, ‘‘तुमच्या बाळाच्या सातत्याने तपासण्या होत होत्या, तरीही बाळ सदैव हसतमुख होते.’’
४. जन्म ते २ वर्षे
ऋग्वेदला बालपणापासून प.पू. भक्तराज महाराज यांची भजने ऐकायला, तसेच त्यांचा जयजयकार करायला आवडते.
५. वय २ ते ४ वर्षे
अ. बालपणापासून त्याला कापूर आणि अत्तर यांचे उपाय करायला आवडायचे. तो त्याच्या आजीच्या समवेत श्रीरामाच्या मंदिरात जात असे. त्या ठिकाणी तो ‘श्रीरामाचे दर्शन घेणे, प्रदक्षिणा घालणे’, या कृती आवडीने करत असे.
आ. तो शाळेत जातांना कधीच रडला नाही. ‘कृष्णबाप्पा जवळ आहे’, असे तो सांगायचा.
६. वय ४ ते ६ वर्षे
६ अ. समजूतदारपणा : बालपणी धर्मजागृती सभा किंवा गुरुपौर्णिमा या कार्यक्रमांना तो त्रास न देता शांत बसत असे. त्यामुळे आम्हा उभयतांना सेवा करता येत असे. एखादी गोष्ट नीट समजावून सांगितल्यावर किंवा ‘काळानुसार ती करणे आवश्यक आहे’, असे सांगितल्यावर तो त्याप्रमाणे आचरण करण्याचा प्रयत्न करतो.
७. वय ६ ते १३ वर्षे
७ अ. सभाधीटपणा : तो शाळेमध्ये विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे देतो, तसेच तो सर्वांसमोर जाऊन एखाद्या विषयावर बोलतो आणि कार्यशाळेत मनोगतही व्यक्त करतो.
७ आ. इतरांना साहाय्य करणे : त्याचा स्वभाव मनमिळाऊ आहे. तो त्याच्या मित्रांना अभ्यासात साहाय्य करतो. तो त्याच्या लहान बहिणीला ‘जप करणे, उपाय करणे, सारणी लिखाण करणे’ यांत साहाय्य करतो, तसेच तो घरातील ‘केर काढणे, लादी पुसणे, कपडे आवरणे’ या सेवांमध्ये साहाय्य करतो.
७ इ. घरातील सात्त्विक उत्पादनांचा साठा तो व्यवस्थित लावून ठेवतो. कुणी सात्त्विक उत्पादने न्यायला आल्यास ‘ती काढून देणे आणि त्यांचा हिशोब करणे’, या सेवा तो करतो.
७ ई. शिकण्याची वृत्ती : त्याला नवीन गोष्टी शिकायला आवडतात. तो स्वभावदोष निर्मूलन प्रक्रिया शिकून तिच्यातील बारकावे शिकण्याचा प्रयत्न करतो. काही दिवसांपूर्वी त्याने सामाजिक माध्यमांची सेवा शिकून घेतली.
७ उ. साधनेचे गांभीर्य : वर्ष २०१९ मधील दीपावलीच्या सुटीत तो मिरज आश्रमात युवा साधकांच्या कार्यशाळेला गेला होता. तेथून परत आल्यावर त्याच्यामध्ये पुष्कळ पालट झालेले जाणवले. कार्यशाळेनंतर त्याच्यामध्ये साधनेची गोडी निर्माण झाली. त्यानंतर तो नियमितपणे सारणी लिखाण करत आहे. चूक लक्षात आल्यावर तो क्षमायाचना करतो. तो नियमित ८ ते १० सूचनासत्रे करतो आणि साधनेचा आढावा नियमित देतो. तो सर्व आध्यात्मिक उपाय करतो. तो घरातील सेवा नामस्मरण करत करतो.
७ ऊ. त्याला चूक सांगितल्यावर तो ती स्वीकारतो आणि क्षमायाचना करतो.
७ ए. भाव : ऋग्वेद घरातील पूजा भावपूर्ण करतो. त्या वेळी तो देवाचे आणि गुरुदेवांचे अस्तित्व अनुभवण्याचा प्रयत्न करतो.
७ ऐ. स्वभावदोष : आळस, बहिणीची चेष्टा करणे आणि राग येणे’
– श्री. नीलेश आणि सौ. प्रीती जोशी (आई-वडील), चिंचवड, पुणे. (ऑक्टोबर २०२०)
६८ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. वैभवी भोवर यांना कु. ऋग्वेद जोशी याच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे
१. सहनशील
‘काही मासांपूर्वी ऋग्वेदला पोटाचा त्रास होत होता आणि त्यामुळे त्याला काही दिवस रुग्णालयात भरती करावे लागले. त्याला अन्न जात नसल्याने त्याची प्रकृती खालावली होती. मी त्याला भेटण्यासाठी रुग्णालयात गेले. तेव्हा ‘तो लहान असूनही सर्व सहन करत आहे’, असे माझ्या लक्षात आले.
२. तो सांगितलेली औषधे गांभीर्याने घेत होता आणि सर्व आध्यात्मिक उपाय करत होता.
३. साधनेची तळमळ
अ. युवा शिबिराला जाऊन आल्यानंतर तो ‘मोकळेपणाने बोलणे, साधनेचे प्रयत्न गांभीर्याने करणे आणि त्यांत सातत्य ठेवणे’ हे प्रयत्न करू लागला आहे.
आ. एकदा तो व्यष्टी साधनेचा आढावा देतांना ‘माझी सत्रे अल्प होतात’, असे सांगून रडायला लागला. त्याच्यातील ही खंत पाहून सत्संगातील सर्वच युवा साधक अंतर्मुख झाले. तेव्हा ‘त्याला अंतर्मनातून साधनेची तळमळ आहे’, हे शिकायला मिळाले.
४. ऋग्वेदमध्ये पुष्कळ दैवी गुण आहेत. ‘त्याची आध्यात्मिक पातळी चांगली असेल’, असे जाणवते.
‘देवाने या बालसाधकाकडून शिकण्याची संधी दिली’, यासाठी मी कृतज्ञता व्यक्त करते.’
– कु. वैभवी भोवर, पुणे (ऑक्टोबर २०२०)
यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता
या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |