हिंदु समाजाला हिणवणार्यांच्या विरोधात हिंदूंनी ठाम भूमिका घेणे आवश्यक ! – मारिया वर्थ, सुप्रसिद्ध लेखिका, जर्मनी
हिंदूसंघटन आणि धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची स्थापना यांसाठी हिंदु जनजागृती समिती
‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व परिषद – एक दुष्प्रचार’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद !
मुंबई – हिंदु धर्माला कनिष्ठ संबोधून, तसेच त्याविषयी अपप्रचार करून हिंदू समाजाला हिणवण्याचा प्रकार विरोधक पूर्वीपासूनच करत आलेले आहेत. आताही एका षड्यंत्राद्वारे प्रसारमाध्यमे आणि शैक्षणिक क्षेत्रातील लोकांना धरून हा प्रयत्न चालूच आहे; मात्र हिंदू याकडे दुर्लक्ष करतांना दिसत आहेत. हिंदु संस्कृती आणि सभ्यता पुरातन असून काळाच्या ओघात ती अजूनही टिकून आहे, हे लक्षात घेतले पाहिजे. हिंदूंनी आता वैचारिकदृष्ट्या सुस्पष्ट भूमिका घेऊन आपल्या धर्माविषयी ठाम भूमिका घेणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन जर्मनी येथील सुप्रसिद्ध लेखिका तथा हिंदु धर्माच्या अभ्यासक मारिया वर्थ यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व परिषद – एक दुष्प्रचार’ या विषयावर ६ सप्टेंबर २०२१ या दिवशी आयोजित केलेल्या ‘ऑनलाईन’ विशेष संवादात त्या बोलत होत्या. या वेळी श्रीलंका येथील ‘शिवा सेनाई’चे संस्थापक श्री. एम्. सच्चिथानंदन आणि मुंबई येथील इतिहासकार अन् हिंदुत्वनिष्ठ सौ. मीनाक्षी शरण यांनीही मार्गदर्शन केले.
हिंदुत्वाला नष्ट करणे म्हणजे नैतिकता, सभ्यता यांची मूल्ये नष्ट करणे होय ! – एम्. सच्चिथानंदन, संस्थापक, शिवा सेनाई, श्रीलंका
हिंदु धर्माने जगाला लाभ करून देणार्या अनेक गोष्टी दिल्या आहेत. हिंदुत्वाला नष्ट करणे म्हणजे अनेक वर्षांपासून निर्माण केलेली नैतिकता, सभ्यता, कौटुंबिक, राजकीय, ऐतिहासिक आणि भौगोलिक मूल्ये नष्ट करणे होय. गीता, चाणक्य नीती यांसारखे ग्रंथ नष्ट करण्याचा प्रकार आहे. हिंदुविरोधी परिषदेचे आयोजन करणार्यांचे कथन खरे हिंदू बांधव कधीच स्वीकारणार नाहीत. याउलट दुर्योधन आणि रावण यांच्याप्रमाणेच या परिषदेचे आयोजक सुद्धा अपयशी होतील अन् हिंदुत्व पुढे मार्गक्रमण करत राहील, असा आम्हाला ठाम विश्वास आहे.
हिंदु धर्माविषयी द्वेषपूर्ण प्रचार करणार्या परिषदेला हिंदूंनी कडाडून विरोध करणे आवश्यक ! – सौ. मीनाक्षी शरण, इतिहासकार अन् हिंदुत्वनिष्ठ, मुंबई
ब्रिटिशांनी संस्कृत आणि संस्कृत विद्यापिठे यांवर आघात करून, तसेच भारताच्या इतिहासात ढवळाढवळ करून देशाची मोठी हानी केली. हिंदु धर्माचा द्वेषपूर्ण प्रचार करण्यासाठी अमेरिकेत होणारी ‘डिसमेंटलिंग ग्लोबल हिंदुत्व’ ही काही पहिली परिषद नसून हिंदु धर्माला कलंकित करण्यासाठी यापूर्वीही वेगवेगळ्या देशांमध्ये परिषदा घेऊन प्रयत्न झाले आहेत. काळानुरूप व्यक्ती जरी पालटल्या असल्या, तरी हिंदु धर्माविषयी द्वेषपूर्ण प्रचार करण्याचा कार्यक्रम अजूनही चालूच आहे. हिंदूंनी याला कडाडून विरोध करणे आवश्यक आहे.