प्रांताधिकारी यांच्या पुढाकारामुळे दहिवडी (जिल्हा सातारा) येथील शासकीय जागेचा होणार कायापालट !
‘हरित वसुंधरा माण-खटाव’ समितीमध्ये विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सक्रिय सहभाग
सातारा, ८ सप्टेंबर (वार्ता.) – माण (जिल्हा सातारा) येथील प्रांताधिकारी कार्यालयासमोर विविध शासकीय विभागांची ६ हेक्टर जागा आहे. अनेक वर्षांपासून ही जागा विनावापर पडून होती. या जागेत घाणीचे साम्राज्य पसरले होते; मात्र सध्या या जागेचा कायापालट करण्याचे ध्येय प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी यांनी घेतले आहे. यासाठी ‘हरित वसुंधरा माण-खटाव’ या नावाने एक विनाशासकीय समिती गठीत करण्यात आली आहे. याचे अध्यक्ष माण-खटावमधील नामवंत स्त्रीरोग तज्ञ डॉ. प्रदीपकुमार पालवे असून बालरोग तज्ञ डॉ. बोराटे, डॉ. करणे, वैद्य डोंबे, सर्वश्री नंदकुमार खोत, सुनील पोळ, संदीप खाडे, अजित पवार, बलवंत पाटील आदी मान्यवरांचा समावेश आहे.
प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी यांनी विविध शासकीय कार्यालयांकडून लेखी अनुमतीपत्रे घेतली, तसेच यासाठी लागणारे साहाय्यही संबंधितांकडून अर्ज भरून स्वीकारले. हा उपक्रम पूर्ण व्हावा यांसाठी समाजातील दानशूर व्यक्ती पुढे येत असून कुणी रोख रक्कम, तर कुणी वस्तू रूपाने साहाय्य करत आहे. या जागेचा कायापालट पाहून ग्रामस्थ भारावून गेले असून श्रमदानासमवेत अर्थसाहाय्याचा ओघही वाढत आहे. त्यामुळे प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी, स्त्रीरोग तज्ञ डॉ. प्रदीपकुमार पालवे आणि सहकारी यांचे तालुक्यातून कौतुक होत आहे. वैद्यकिय व्यवसायामध्ये व्यस्त असूनही स्त्रीरोग तज्ञ डॉ. प्रदीपकुमार पालवे आणि अन्य सहकारी डॉक्टर, तसेच व्यापारी यांनी सामाजिक उपक्रमासाठी वेळ दिल्यामुळे सर्वांनाच उत्साह आलेला आहे, असे मत ग्रामस्थांनी व्यक्त केले आहे.
‘हरित वसुंधरा माण-खटाव’ येथील सुविधानागरिकांना सकाळ-संध्याकाळ चालण्यासाठी ‘ट्रॅक’ सिद्ध करण्यात आला असून ‘ट्रॅक’वर लाल माती टाकून दोन्ही बाजूस १० सहस्रांहून अधिक झाडे लावण्यात आली आहेत. मुलांसाठी खेळाचे मैदान, जेष्ठ नागरिकांसाठी नाना-नानी पार्क, खुली व्यायामशाळा अशा विविध योजना आहेत. |
दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने स्त्रीरोग तज्ञ डॉ. प्रदीपकुमार पालवे यांना संपर्क केला असता ते म्हणाले, ‘‘शहरातील मुलांना खेळण्यासाठी बगीचा, तरुणांना व्यायामशाळा तसेच वयस्करांना फिरण्यासाठी खुली आणि प्रशस्त जागा कुठेच उपलब्ध नव्हती. त्यामुळे प्रांताधिकारी शैलेश सूर्यवंशी यांच्या संकल्पनेला आम्ही लगेच मान्यता दिली आणि सर्वांनी हा उपक्रम यशस्वी होण्यासाठी स्वयंस्फूर्तीने प्रयत्न करायचे ठरवले. शहरातील सर्व आधुनिक वैद्य (डॉ.), औषध दुकानदार, व्यापारी आणि नागरिक यांनी यामध्ये तन, मन आणि धन अर्पण करून सहभाग नोंदवला आहे. नागरिकांचे मानसिक आणि शारीरिक आरोग्य उत्तम रहाण्यासाठी याचा उपयोग निश्चितपणे होणार आहे.’’ |