अमरावती येथे ‘अंडरपास’मध्ये पावसाचे पाणी साचल्याने अपक्ष आमदार रवि राणा यांनी शहर अभियंत्याला साचलेल्या पाण्यातून बळजोरीने चालायला लावले !
रस्त्याची अशी निकृष्ट दर्जाची कामे करून जनतेच्या लाखो रुपयांची हानी करणार्या संबंधित अधिकार्यांना सरकारने कारागृहात टाकले पाहिजे ! – संपादक
अमरावती – शहरात ७ सप्टेंबर या दिवशी पहाटे झालेल्या मुसळधार पावसामुळे शहर जलमय झाले. शहरातील राजापेठ ‘अंडरपास’ (रस्त्याच्या किंवा रेल्वेमार्गाच्या खालून जाणारा रस्ता) येथे पाणी साचल्यामुळे राजापेठकडून दस्तुरनगरकडे जाणारा मार्ग बंद होता. ‘अंडरपास’मध्ये साचत असलेल्या पाण्यामुळे अपक्ष आमदार रवि राणा यांनी रोष व्यक्त करत शहर अभियंता मंगेश कडू यांना चक्क ‘अंडरपास’मधील साचलेल्या पाण्यातून बळजोरीने चालायला लावले, तसेच ‘या अंडरपास’मध्ये यापुढे जर पाणी साचले, तर अधिकार्यांना या पाण्यातच बुडवण्यात येईल’, अशी चेतावणीही दिली. (लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांनी त्यांचे कर्तव्य चांगल्या प्रकारे पार पाडल्यास अशा घटनांची पुनरावृत्ती टळेल ! – संपादक)
आमदार रवि राणा यांनी ‘अंडरपास’चे काम पूर्ण होण्यापूर्वीच त्याचे उद्घाटन केले होते. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्तेही या ‘अंडरपास’चे उद्घाटन झाले होते. ‘राजापेठ ‘अंडरपास’ हा जीवघेणा मार्ग आहे’, असा आरोप करत युवा सेनेचे जिल्हाप्रमुख राहुल माकोडे यांनी राजापेठ ‘अंडरपास’च्या ठिकाणी ‘देवेंद्र फडणवीस मौत का कुवा’, असा उल्लेख असलेले फलक झळकावत फडणवीस यांच्यासह आमदार रवि राणा यांचा निषेध केला.