(म्हणे) ‘भारतात मुसलमान कधीच बहुसंख्यांक बनू शकत नाहीत !’ – काँग्रेसचे खासदार दिग्विजय सिंह
|
नवी देहली – बहुपत्नीत्वामुळे लोकसंख्येत सातत्याने वाढ होऊन पुढील १० वर्षांत देशातील मुसलमान अल्पसंख्यांकांतून बहुसंख्यांक होतील आणि बहुसंख्यांक अल्पसंख्यांक होतील, असा चुकीचा प्रचार केला जात आहे. मी सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांच्यासह संघाच्या प्रचारकांना आव्हान देतो की, त्यांनी या विषयावर सार्वजनिक चर्चेसाठी यावे. या देशात मुसलमान कधीही बहुसंख्यांक होऊ शकत नाहीत, हे मी सिद्ध करून दाखवीन, असे आव्हान काँग्रेसचे राज्यसभेतील खासदार दिग्विजय सिंह यांनी दिले आहे. ते देहलीमध्ये काँग्रेस आणि साम्यवादी पक्ष, तसेच कामगार संघटना यांनी संयुक्तपणे आयोजित केलेल्या ‘सांप्रदायिक सद्भाव परिषदे’ला संबोधित करतांना बोलत होते. (‘हिंदूंना झोडपा आणि मुसलमानांचे लाड करा’ यालाच निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी ‘सांप्रदायिक सद्भाव’ म्हणतात, हे लक्षात घ्या ! – संपादक)
Muslims can never become majority in India as their fertility rate decreasing: Digvijaya Singhhttps://t.co/zqE8FirqdE
— India TV (@indiatvnews) September 7, 2021
दिग्विजय सिंह पुढे म्हणाले की,
१. देशातील मुसलमान समाजात जन्मदर न्यून होत आहे. या महागाईच्या काळात एका सामान्य व्यक्तीला एका पत्नीपासून जन्मलेल्या मुलांना वाढवणे कठीण जात आहे. अशात कोणता मुसलमान ४ बायका आणि त्यांच्यापासून होणार्या मुलांचे पालनपोषण करू शकेल ? (हे ठाऊक असूनही भारताला लोकसंख्येच्या माध्यमांतून इस्लामी देश करण्यासाठी ४ बायका केल्या जातात आणि अनेक मुले जन्माला घातली जातात अन् पुढे ही मुले गुन्हेगारी कृत्याकडे वळतात, असेच चित्र दिसून येते ! गुन्हेगारीत अल्पसंख्यांकच बहुसंख्येने दिसतात ! याविषयी दिग्विजय सिंह बोलतील का ? – संपादक)
२. एकीकडे संघाचे कार्यकर्ते विषारी बोलतात, तर दुसरीकडे ‘हिंदू आणि मुसलमान यांचा ‘डी.एन्.ए.’ एकच आहे’, असे संघप्रमुख भागवत म्हणतात. जर दोघांचा ‘डी.एन्.ए.’ सारखाच आहे, तर जातीय द्वेष का पसरवला जात आहे ? ‘लव्ह जिहाद’सारख्या सूत्रांची आवश्यकता काय आहे ? (हिंदू आणि मुसलमान यांचा ‘डी.एन्.ए.’ एक असला, तरी त्यांना देण्यात येणारी शिकवण वेगवेगळी आहे. त्यांचे धर्मग्रंथ आणि धर्मगुरु वेगवेगळे आहेत. यामुळेच जातीय द्वेष पसरवला जात आहे आणि तो कोण पसरवतो आहे, हे जगजाहीर आहे ! – संपादक)
३. इंग्रजांच्या ‘लोकांना विभाजित करा आणि राज्य करा’ या धोरणानुसार देशात खोट्या गोष्टी पसरवून हिंदू अन् मुसलमान अशी विभागणी केली जात आहे. (भारताची फाळणी हिंदू आणि मुसलमान अशा स्तरावर झाली अन् त्याला दिग्विजय सिंह यांच्या काँग्रेसनेच मान्यता दिली. काँग्रेसमुळेच मुसलमान पाकिस्तानमध्ये न जाता भारतात राहिले आहेत, हे दिग्विजय सिंह का विसरत आहेत ? – संपादक)