खारेपाटण तपासणी नाक्यावर आरोग्य कर्मचार्यांची कमतरता असल्याने प्रवाशांची गैरसोय
कणकवली – सिंधुदुर्ग जिल्ह्यात गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येने गणेशभक्त येऊ लागले आहेत. मुंबई-गोवा महामार्गाने येणार्या गणेशभक्तांची महामार्गावरील खारेपाटण येथे तपासणी, तसेच नावनोंदणी केली जात आहे. ७ सप्टेंबरला सकाळी खासगी गाड्यांतून मोठ्या संख्येने प्रवासी आले असता तपासणी नाक्यावर आरोग्य कर्मचार्यांची संख्या अपुरी असल्याने प्रवाशांना ताटकळत रहावे लागले. त्यामुळे प्रवाशांमध्ये अप्रसन्नता दिसली.
पुढील २ दिवस मोठ्या संख्येने प्रवासी येणार असल्याने प्रशासनाने तपासणी नाक्यावर अधिकची तपासणी पथके सिद्ध ठेवावीत, अशी मागणी केली जात आहे. (सिंधुदुर्ग जिल्ह्यात गणेशोत्सवासाठी लाखो भाविक विविध मार्गांनी येत असतात. हे प्रशासनाला ठाऊक असूनही तपासणी नाक्यावर आवश्यक तेवढ्या प्रमाणात प्रवाशांची तपासणी करण्यासाठी कर्मचारी उपलब्ध नसणे यातून प्रशासनाची नियोजनशून्यता लक्षात येते ! – संपादक)