कै.(सौ.) पार्वतीबाई मधुकरराव फोकमारे यांची त्यांच्या मुलाला जाणवलेली गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या मृत्यूनंतर आलेल्या अनुभूती
कै. (सौ.) पार्वतीबाई मधुकरराव फोकमारे (वय ६० वर्षे) यांचे १०.८.२०२१ या दिवशी निधन झाले. भाद्रपद शुक्ल पक्ष द्वितीया (८.९.२०२१) या दिवशी त्यांचे मासिक श्राद्ध आहे. त्यानिमित्त त्यांच्या मुलाला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये आणि त्यांच्या निधनानंतर जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.
१. प्रेमभाव
‘आई पुष्कळ प्रेमळ होती. आई नातेवाईक आणि गावातील व्यक्ती, तसेच वयाने लहान-मोठ्या सर्व व्यक्तींशी सहजतेने बोलत असे. त्यामुळे तिची प्रत्येकाशी लगेच जवळीक होत असे. आईने एखादा पदार्थ बनवल्यास ती तो इतरांना देत असे. आईने सर्वांना आपलेसे करून घेतले होते. तिने कधी कुणाला दुखावले नाही.
२. इतरांचा विचार करणे
आई प्रत्येक कृती तत्परतेने करत असल्याने तिची सर्व कामे वेळेच्या आधी पूर्ण होत असत. ती इतरांनाही साहाय्य करत असे. आई कुटुंबातील व्यक्ती आणि नातेवाईक यांचा विचार करून कृती करत असे. आईला ‘सर्वांनी नेहमी आनंदात रहावे’, असे वाटायचे.
३. कुलाचाराचे पालन करणे आणि शास्त्रानुसार सण साजरे करणे
आई कुलाचाराचे पालन करत असे. आई गुढीपाडवा, दसरा, दिवाळी आदी सर्व सण आणि उत्सव शास्त्रानुसार साजरे करायची.
४. कार्यक्रम आणि उत्सव यांच्या वेळी पुढाकार घेऊन कामे करणे
नामकरणविधी, वाढदिवस, विवाह इत्यादी कार्यक्रमांत, तसेच सार्वजनिक गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आदी उत्सवांच्या प्रसंगी आई नेहमी पुढाकार घेऊन सर्व कामे करत असे. त्यामुळे सर्वांना आईचा आधार वाटत असे.
५. सहनशीलता
आईमध्ये पुष्कळ सहनशीलता होती. तिला काही शारीरिक त्रास होत असले, तरी बहुतेक वेळा ती कुणाला त्याविषयी सांगायची नाही.
६. सेवेची आवड
आई सनातन पंचांग, सनातनची सात्त्विक उत्पादने आणि सनातनने प्रकाशित केलेले ग्रंथ यांचे वितरण करत असे. आईचे मला सेवेत साहाय्य होत असे.
७. देवावर आणि नामजपावर श्रद्धा
आईची देवावर श्रद्धा होती. ती ‘आनंद दत्त संप्रदाय’ या संप्रदायामध्ये दिलेल्या गुरुमंत्राचा जप करत असे. ‘देवाच्या नामजपाने लाभ होतो’, अशी आईची श्रद्धा होती. त्यामुळे ती सतत नामस्मरण करत असे.
८. पू. पात्रीकरकाकांनी सांगितल्यानुसार नामजप केल्याने वैद्यकीय चाचण्या करतांना आईला त्रास न होणे
आई रुग्णाईत असतांना सनातनचे धर्मप्रचारक पू. अशोक पात्रीकरकाका यांनी सांगितल्यानुसार ती ‘श्री भवानीदैव्यै नमः ।’ आणि ‘श्री गणेशाय नमः ।’ हे नामजप करत होती. त्यामुळे वैद्यकीय चाचण्या करतांना तिला त्रास झाला नाही.
९. परात्पर गुरु डॉक्टरांप्रती भाव
आईने मृत्यू होण्यापूर्वीच्या शेवटच्या मासात परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ७९ व्या जन्मोत्सवानिमित्त प्रकाशित झालेला दैनिक ‘सनातन प्रभात’चा विशेषांक स्वतःजवळ ठेवला होता. ती प्रतिदिन त्या विशेषांकातील परात्पर गुरु डॉक्टरांच्या छायाचित्राचे दर्शन घेत असे.
१०. आईचे निधन आणि तिच्या मृत्यूनंतर आलेल्या अनुभूती
आई सतत दत्ताचा नामजप करत असे. १०.८.२०२१ या दिवशी दत्ताचा नामजप करतच तिने देहत्याग केला. मृत्यूनंतरही तिचा तोंडवळा तेजस्वी दिसत होता. आईचे निधन झाल्यानंतर आम्ही सर्व जण ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करत होतो. त्यामुळे घरात सात्त्विकता जाणवत होती. घरी येणार्या व्यक्तींनीही आम्हाला ‘घरात चैतन्य जाणवत आहे’, असे सांगितले.
‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपाशीर्वादामुळे या प्रसंगात मला स्थिर रहाता आले’, त्याबद्दल त्यांच्या चरणी कृतज्ञता !’
– श्री. दत्तात्रेय फोकमारे (मुलगा), यवतमाळ (२१.८.२०२१)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |