साधकांना चैतन्य देणारे परात्पर गुरु डॉ. आठवले !
रामनाथी आश्रमात महर्षींच्या आज्ञेने झालेल्या ‘श्री गुरुपादुका (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या पादुका) प्रतिष्ठापना’ सोहळ्याचे ‘ऑनलाईन’ प्रक्षेपण पहातांना ठाणे येथील साधकांना आलेल्या अनुभूती
१. अधिवक्ता विवेक भावे, कल्याण
अ. मला सोहळ्याची कोणतीही पूर्वकल्पना नव्हती. सकाळपासून मला न्यायालयाच्या कामांविषयी ताण जाणवत होता. ‘सोहळ्याची वेळ समजल्यावर मी सोहळा पहाण्यासाठी वेळेत पोचेनच’, याची मला शाश्वती नव्हती. तेव्हा माझ्या मनाची द्विधा स्थिती होती.
आ. सोहळ्याच्या ठिकाणी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे आगमन झाल्यावर सर्वत्र पांढरा प्रकाश दिसणे : सोहळ्याचे ‘ऑनलाईन’ प्रक्षेपण दाखवणार असल्याच्या ठिकाणी पोचल्यावर माझा ताण न्यून होऊन माझे मन शांत झाले. सोहळ्याच्या ठिकाणी गुरुदेवांचे (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे) आगमन झाल्यावर मला सर्वत्र पांढरा प्रकाश जाणवला. मला दुसरे काही दिसत नव्हते. नंतर तो प्रकाश हळूहळू न्यून होत गुरुदेवांच्या देहात लुप्त झाला. ‘देवाने मला प्रकाशाच्या माध्यमातून निर्गुणाची अनुभूती दिली’, त्याबद्दल गुरुदेवांच्या चरणी कृतज्ञता !
इ. ‘गुरुदेवांना सर्वस्व अर्पण करावे’, असे मला प्रकर्षाने वाटले. मला ‘जीवनाचा हेतू समजला आहे’, असे वाटले.
ई. गुरुदेवांची आरती चालू असतांना आरतीची भलीमोठी ज्योत सभोवती फिरत असल्याचे जाणवणे : गुरुदेवांची आरती चालू असतांना माझ्या नाकातून पाणी आणि डोळ्यांतून अश्रू वहात होते. मला सतत हुंदके येऊन माझे शरीर गदगदत होते. माझ्या शरिराला घाम आला. ‘आरतीची ज्योत भलीमोठी होऊन सभोवती फिरत आहे’, असे मला जाणवले. त्या वेळी मला ज्योतीची धग जाणवत होती. (फेब्रुवारी २०१९)
२. श्री. विष्णु गजरे, कल्याण
२ अ. सोहळ्याविषयी काही ठाऊक नसतांनाही ‘आजचा दिवस सोन्याचा आहे’, असे कुणीतरी आतून सांगत असल्याचे जाणवणे : मला सोहळ्याविषयी काही ठाऊक नव्हते. मी सकाळी घरात देवपूजा करत असतांना ‘देवघरातील सर्व मूर्ती सोन्याच्या झाल्या आहेत आणि त्यातून माझ्याकडे चैतन्य प्रक्षेपित होत आहे’, असे मला जाणवले. ‘आजचा दिवस सोन्याचा आहे’, असे मला आतून कोणीतरी सांगत होते. ‘मी आत्मज्योतीने देवाची आरती करत आहे’, असे मला जाणवत होते. (फेब्रुवारी २०१९)
३. सौ. अलका भागडे, डोंबिवली
अ. साधकांनी शंखनाद केल्यावर ‘मी स्वर्गात आहे आणि गुरुदेव सर्व साधकांना स्वर्गात घेऊन जात आहेत’, असे मला जाणवले.
आ. गुरुपादुकांचे पूजन चालू असतांना ‘गुरुदेव सर्व साधकांना चैतन्य देऊन साधकांच्या भोवती संरक्षककवच निर्माण करत आहेत’, असे मलागुरु जाणवले. तेव्हा माझी भावजागृती झाली.
इ. ‘गुरुदेव माझ्या डोक्यावर हात ठेवून ‘तुझा त्रास कायमस्वरूपी गेला आहे. तू पुढे चल. मी तुझ्या समवेत आहे. तुझे आता काहीच राहिले नाही. तू आश्रमात जा. तुझा मार्ग मोकळा आहे’, असे म्हणत असल्याचे जाणवले. तेव्हा मला पुष्कळ आनंद झाला. त्या दिवशी मला कोणताही शारीरिक त्रास जाणवला नाही. (फेब्रुवारी २०१९)
या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |