महागाई आणि बेरोजगारी यांच्या विरोधात पणजी येथील आझाद मैदानात काँग्रेसचे आंदोलन
-
पोलीस आणि आंदोलक यांच्यात धक्काबुक्की !
-
पोलिसांचा काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर लाठीमार !
पणजी, ७ सप्टेंबर (वार्ता.) – येथील आझाद मैदानात बेरोजगारी आणि महागाई यांच्या विरोधात आंदोलन करणारे काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यामध्ये धक्काबुक्की झाली. या वेळी परिस्थिती नियंत्रणाखाली आणण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला. आंदोलनकर्ते मुख्यमंत्र्यांच्या आल्तिनो येथील निवासस्थानावर जाण्याचा प्रयत्न करू लागल्याने कार्यकर्ते आणि पोलीस यांच्यामध्ये वाद निर्माण झाला अन् एकच गोंधळ उडाला. पोलिसांनी या वेळी काही कार्यकर्त्यांना कह्यात घेतले.
गोव्यातील भाजप शासनाला महागाई आणि बेरोजगारी या दोन्ही प्रश्नांवर अपयश आल्याच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस पक्षाने ७ सप्टेंबर या दिवशी शासनाचा निषेध करण्यासाठी पणजी येथील आझाद मैदानात आंदोलनाचे आयोजन केले होते. या आंदोलनात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, कार्याध्यक्ष आलेक्स सिक्वेरा, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत आदींची प्रमुख उपस्थिती होती. आंदोलन संपल्यानंतर कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या आल्तिनो येथील निवासस्थानी जाण्याचा प्रयत्न केला. या वेळी पोलिसांनी त्यांना मैदानाजवळच रोखले. शांततापूर्णरित्या आंदोलन करणार्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी लाठीमार केल्याचा दावा करून गोवा प्रदेश काँग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर आणि विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी शासनावर टीका केली. विरोधी पक्षनेते दिगंबर कामत म्हणाले, ‘‘आंदोलन करणे हा प्रत्येकाचा घटनात्मक अधिकार आहे.’’ (केंद्रात काँग्रेसचे शासन असतांना देहलीतील जंतरमंतर मैदानात योगऋषी रामदेवबाबा यांनी शासनातील भ्रष्टाचाराच्या विरोधात केलेले आंदोलन चिरडण्यासाठी पोलिसांनी रात्रीच्या वेळी आंदोलनस्थळावरील तंबूत घुसून लाठीमार केला होता आणि आंदोलन उधळून लावले होते. काँग्रेसवाले त्या वेळी राज्यघटना विसरले होते का ? – संपादक)