नांदेड जिल्ह्यात अतीमुसळधार पावसामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला, विष्णूपुरी धरणाचे ९ दरवाजे उघडले !

नांदेड – जिल्ह्यात ६ सप्टेंबर या दिवशी सर्वत्र अतीमुसळधार पाऊस झाला असून अनेक शिवारात नदीकाठच्या भूमी आणि पिके खरडून गेली आहेत. अर्धापूर तालुक्यातील मुखेड, नायगाव, नरसी, बिलोली, हदगाव आणि अर्धापूर या गावांत पावसाचे पाणी शिरले असून लघुळ, उंद्री, तळणी आणि शेलगाव या गावांचा शहरांशी संपर्क तुटला आहे. १५ दिवसांनंतर काढणीला येणार्‍या सोयाबीनचे पीक पाण्याखाली गेल्यामुळे शेतकर्‍यांची प्रचंड हानी झाली आहे. इसापूर धरण ९० टक्के भरले असून विष्णूपुरी प्रकल्पाचे ९ दरवाजे उघडण्यात आले आहेत.

जिल्ह्यातील मुखेड, बिलोली, हदगाव, हिमायतनगर, किनवट, अर्धापूर आणि नायगाव तालुक्यांतील ८० मंडळांत अतीवृष्टीसह जोरदार पाऊस पडला आहे. ७ सप्टेंबर या दिवशी सकाळी ८.३० वाजेपर्यंत जिल्ह्यातील ८० महसूल मंडळांत जोरदार पाऊस झाला. आतापर्यंत हाती आलेल्या माहितीनुसार जिल्ह्यातील ११ महसूल मंडळात अतीवृष्टीची नोंद झाली आहे. हा आकडा वाढण्याची दाट शक्यता आहे. अतीवृष्टी आणि पूर यांमुळे जिल्ह्यात पिकांची मोठी हानी झाली आहे.