अतीवृष्टी आणि चक्रीवादळ यांमुळे जामनेर (जळगाव) तालुक्यातील १७ गावे बाधित !
जळगाव – तालुक्यातील अनेक गावांना ६ सप्टेंबरच्या रात्रीपासून चालू असलेला पाऊस आणि चक्रीवादळ यांनी झोडपले. यामुळे घरे आणि शेती यांची प्रचंड हानी झाली आहे. संसारोपयोगी साहित्याचीही हानी झाली. भागदरा या गावाजवळील तलाव फुटल्यामुळे संपूर्ण गावात पाणी शिरले. शेतातील मका, कापूस यांसारखी पिके वाहून गेली. तोंडापूर या गावामध्ये नदीला पूर आल्यामुळे २ गावांचा संपर्क तुटला असून गावातील २ जण पुराच्या पाण्यात वाहून गेले. प्रशासनाने पहाणी केल्यानंतर हानीचे प्राथमिक अनुमान एका विवरणपत्राच्या माध्यमातून घोषित करण्यात आले. या विवरणानुसार जामनेर तालुक्यातील १७ गावांमध्ये हानी झाली आहे. यात हिंगणे, ओझर खुर्द आणि ओझर बुद्रुक, रामपूर, लहासर, ढालशिंगी, जुनोने, तळेगाव येथील घरांचे पत्रे उडाले असून काही घरांची पडझड झाली आहे. पहूर येथील काही दुकानांत पाणी शिरले, तर मेणगाव, टाकळी बुद्रुक, हिरवखेडा दिगर, देवळसगाव, वडगाव तिघ्रे, वाघारी या गावांच्या शिवारातील पिकांची मोठी हानी झाल्याचा प्राथमिक अंदाज प्रशासनाने आपल्या विवरणपत्रात नमूद केला आहे. शेतीची नेमकी किती हानी झाली, याची माहिती अजून प्राप्त झालेली नाही.