रत्नागिरी जिल्ह्यातील पूज्य (ह.भ.प.) कै. सखाराम बांद्रे महाराज यांची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी झालेली भावभेट !
निवळी तालुका चिपळूण येथील पू. बांद्रे महाराज यांच्या मनात सनातन संस्थेविषयी विशेष स्नेह निर्माण झाला होता. ते आणि त्यांचे ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे भाऊ श्री. शिवराम बांद्रे सनातन संस्थेच्या गोवा येथील रामनाथी आश्रमाला भेट देण्यासाठी आले होते. तेव्हा त्यांची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी भेट झाली होती. त्या वेळी त्यांच्यामध्ये झालेला भावसंवाद येथे दिला आहे. (पूज्य सखाराम बांद्रे महाराज यांनी २४.८.२०२१ या दिवशी देहत्याग केला आहे.)
१. पू. सखाराम बांद्रे महाराज परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या भेटीसाठी तळमळत असणे
परात्पर गुरु डॉ. आठवले : तुम्ही इतक्या लांबून मला भेटायला इकडे येणार; म्हणून मला आनंद झाला. आज मला आपले दर्शन झाले.
पू. सखाराम बांद्रे महाराज : ‘मासा पाण्यातून काढल्यावर तडफडतो ना ?’, तसा मी तुम्हाला भेटण्यासाठी तडफडत होतो. साधकांनी मला इकडे-तिकडे (आश्रमातील विविध सेवेच्या ठिकाणी) फिरवले; पण मी ज्या मूर्तीचे दर्शन घ्यायला आलो होतो, त्या मूर्तीची भेटच होत नव्हती.
परात्पर गुरु डॉ. आठवले : कुठे म्हणजे काय ? तुमच्या हृदयामध्ये जो देव आहे, ती म्हणजेच मूर्ती !
पू. सखाराम बांद्रे महाराज : मला आपले सगुण रूपामध्ये दर्शन घेतांना निर्गुणाचाही अनुभव घ्यायचा होता. ‘तुज सगुण म्हणू कि निर्गुण रे ?’, हे मला पहायचे होते.
परात्पर गुरु डॉ. आठवले : मी अध्यात्माचा एवढा अभ्यास केला आहे; पण किंमत शून्य ! मला तुमच्याशी असे तुलनात्मक बोलताच येत नाही.
पू. सखाराम बांद्रे महाराज : आता येईल शक्ती !
परात्पर गुरु डॉ. आठवले : आशीर्वाद दिलात ना ?
२. असंख्य साधकांना घडवणार्या परात्पर गुरु डॉ. आठवले यांची प्रकृती चांगलीरहाण्यासाठी ‘मी आज माझे पुण्य तुम्हाला देतो’, असे पू. सखाराम बांद्रे महाराज यांनी सांगणे
पू. सखाराम बांद्रे महाराज : तुम्ही मला तुमचे ५० टक्के आजारपण द्या आणि तुम्ही चांगले व्हा !
परात्पर गुरु डॉ. आठवले : अरे बाप रे ! असे कसे होईल ?
पू. सखाराम बांद्रे महाराज : दख्खनच्या खिंडीमध्ये बाजीप्रभु देशपांडे छत्रपती शिवाजी महाराजांना म्हणाले, ‘‘आम्ही फार महत्त्वाचे नाही. आमच्यासारखे किती बाजीप्रभु येतील आणि जातील; पण शिवाजी महाराज वाचायला हवेत. लाख मेले, तरी चालतील; पण लाखांचा पोशिंदा जगला पाहिजे.’’ आम्ही त्या बाजीप्रभूसारखे आहोत. ‘गोब्राह्मणप्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज (परात्पर गुरु डॉ. आठवले) राहिले पाहिजेत’, असे मला वाटते; म्हणून मी माझे जे काही पुण्य आहे, ते आज आपल्याला देत आहे ! तुमची प्रकृती चांगली राहू दे ! साधकांचे कल्याण होऊ दे !
पू. बांद्रे महाराज यांनी देवाला प्रार्थना केली.
‘नारायणा, मी २० वर्षे देवाची जी सेवा केली, ते माझे पुण्य आहे. परम पूज्यांनी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) पुण्य वाटल्यामुळे त्यांचे पुण्य न्यून झाले असेल, तर त्यांच्या झोळीमध्ये माझे पुण्य टाक; पण परम पूज्यांची प्रकृती लगेच चांगली कर. मला याची प्रचीती घ्यायची आहे. नाहीतर मी पूजा (पू. महाराज २० वर्षे प्रतिदिन करत असलेली विठ्ठलाची पूजा) बंद करीन !’
३. ‘तुम्ही पुण्य वाटण्याचे काम करत आहात, तसे मीही करत आहे’, पू. सखाराम बांद्रे महाराज यांनी सांगणे
तुम्हाला पुष्कळ सहन करावे लागत आहे. संत तुकाराम महाराज यांनी म्हटलेच आहे, ‘जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती । देह कष्टविती परउपकारें ।’ तुमचे सगळे कुंतीसारखे झाले आहे ना ? कुंतीने भगवंताकडे दुःख मागून घेतले आणि म्हणाली, ‘‘भगवंता, माझ्या नशिबी काही सुख असेल, तर ते जगाला वाट.’’ तिच्यासारखेच तुम्ही ! ‘परमेश्वराने माझे पुण्य आपल्याला द्यावे आणि तुमची प्रकृती चांगली करावी.’ उद्या सकाळी मला असा निरोप आला पाहिजे, तरच मी समजेन. लोक साधना करत नाहीत. त्यामुळे त्यांच्याकडे पुण्याचा साठा नसतो. त्या वेळी माझे पुण्य घालून मी त्यांना चांगले करायचो.
४. जीव जन्माला आल्यावर रडावे; कारण इथे दुःख असते; पण जीव गेल्यानंतर हसावे; कारण तो दुःखातून मुक्त होत असणे
पू. सखाराम बांद्रे महाराज : माझी पत्नी ४२ वर्षांची असतांना गेली. त्याचा मला अधिक आनंद झाला; कारण ती या (देहाच्या) पिंजर्यातून सुटली ना ?
परात्पर गुरु डॉ. आठवले : हो.
पू. सखाराम बांद्रे महाराज : कुणी जन्माला येत असेल, तर रडा; पण कुणी गेले (मृत्यू झाला), तर हसा; कारण ही माया आहे. इथे काय आहे ? जीवन एका पारड्यामध्ये आणि मृत्यू एका पारड्यामध्ये टाका. मृत्यूला घाबरायचे कशाला ? आणि घाबरलो, तरी मृत्यू येणारच ना !
५. ‘प.पू. भक्तराज महाराज यांनी सांगितल्याप्रमाणे अमेरिकाच तुमच्याकडे आली आहे’, असे पू. बांद्रे महाराज यांनी सांगणे
पू. सखाराम बांद्रे महाराज : प.पू. भक्तराज महाराज आपल्याला म्हणाले होते ना, ‘‘स्वामी विवेकानंद यांनी ‘शिकागो धर्मपरिषदे’मध्ये हिंदु धर्माचे तत्त्वज्ञान सांगितले. तसे तुम्ही अमेरिकेला प्रचाराला जा.’’ तेव्हा तुम्ही त्यांना म्हणालात, ‘‘आता बाहेरच्या राष्ट्रात जाण्यासाठी एवढे पैसे कुठून आणायचे ?’’ तेव्हा प.पू. भक्तराज महाराज म्हणाले, ‘‘मग नका जाऊ. अमेरिकाच तुमच्याकडे येईल.’’ आज ती अमेरिका तुमच्याकडे आली आहे. हे मी बघून आलो.
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ (परात्पर गुरु डॉ. आठवले यांना उद्देशून) : काल ते आश्रमातील विदेशी साधकांना भेटले. तेव्हा त्यांना प.पू. भक्तराज महाराज यांचे हे बोलणे वाचल्याची आठवण झाली.
परात्पर गुरु डॉ. आठवले : अरे बाप रे ! यांची स्मरणशक्ती केवढी आहे ! मलाही आठवत नाही. मी आज धन्य झालो !
पू. सखाराम बांद्रे महाराज : आज आम्ही धन्य झालो. सुदर्शनचक्रधारी, गदाधारी, पद्मधारी, शंखधारी नारायण मी आज पाहिला.
परात्पर गुरु डॉ. आठवले : आजारी आहे !
६. आत्मा अमर आहे, तरी ‘आता थकल्यामुळे लिहिणार नाही’, असे पू. बांद्रे महाराज यांनी सांगणे
पू. सखाराम बांद्रे महाराज : राम आणि कृष्ण यांनाही शरीर त्यागावे लागले. श्रीराम शरयू नदीमध्ये गेले, तर वालीने व्याध्याच्या रूपात बाण मारून कृष्णाचा सूड घेतला. शरीर हे टाकावेच लागते. आता नवीन शर्ट मिळणार आहे, तर जुना फाटलेला शर्ट काय करायचा ? आता हे दात, अवयव सगळे जुने झाले. त्यांच्यावर काय प्रेम करायचे ? आत्म्याला (जिवाला) मरण आहे का ? भगवान गीतेमध्ये सांगतात,
नैनं छिन्दति शस्त्राणि नैनं दहति पावकः ।
न चैनं क्लेदयन्त्यापो न शोषयति मारुतः ॥
– श्रीमद्भगवद्गीता, अध्याय २, श्लोक २३
अर्थ : या आत्म्याचे कोणत्याही शस्त्राद्वारे तुकडे करता येत नाहीत, अग्नीद्वारे त्याला जाळता येत नाही, पाण्याद्वारे त्याला भिजवता येत नाही आणि वार्याने त्याला सुकवताही येत नाही.
श्री. शिवराम बांद्रे (महाराजांचे भाऊ) : आता महाराज देवाला सांगतात, ‘मी थकलो. त्यामुळे मी आता लिहिणार नाही.’
पू. सखाराम बांद्रे महाराज (परात्पर गुरु डॉ. आठवले यांना उद्देशून) : विराम घेऊ का ?
परात्पर गुरु डॉ. आठवले : शेवटच्या श्वासापर्यंत विराम घ्यायचा नाही. देवाकडून मिळत आहे, ते घेत रहायचे आहे. ते ज्ञान तुमच्यासाठी नाही. मनुष्याला आणि आम्हा सगळ्यांना हे ज्ञान पाहिजे. आम्हाला एवढे ज्ञान कोण देणार ? आम्हाला तुम्ही ज्या वह्या पाठवल्या होत्या ना, त्या आम्हाला पाहिजे होत्या, अगदी तशाच होत्या. व्यावहारिक जीवनातील जगणे-वागणे आणि साधना असे सगळे त्यात होते; पण तुम्हाला आता अवतार इत्यादी जे पुढचे ईश्वरी ज्ञान येत आहे ना, आज तुम्ही सांगता आहात, तेही अगदी अप्रतिम आहे.
७. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी मिळत असलेले ज्ञान घेत रहायला सांगणे
श्री. शिवराम बांद्रे (पू. बांद्रे महाराज यांना उद्देशून) : तुम्ही म्हणालात ना, ‘गुरुदेवांसाठी काय करू ?’, तर आता गुरुदेवांनी सांगितले आहे की, आता ज्ञान चालू आहे, ते आपण चालू ठेवूया. हेच आपल्याला गुरुदेवांसाठी करायचे आहे.
परात्पर गुरु डॉ. आठवले : हो. ते युगानुयुगे महत्त्वाचे आहे.
श्री. शिवराम बांद्रे : गुरुदेवांनी सांगितले तेवढे करायचे.
पू. सखाराम बांद्रे महाराज : विराम घेऊ नको. ते (भगवंत) भरपूर बोलत आहेत.
परात्पर गुरु डॉ. आठवले : भगवंताला आपण सांगणार का ‘विराम घे’ म्हणून ? तुम्हाला सगळे कळते. तुम्ही आमची गंमत करत आहात !
पू. सखाराम बांद्रे महाराज : नाही बाबा. मला विराम घेण्याविषयी तुम्हाला विचारायचे होते, ‘आता काय करू ?’ ‘हे लिखाण चालू करा सांगितलेत’, तर मी आता त्याप्रमाणे करीन.
८. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी पू. बांद्रे महाराज यांना ‘देवाकडून मिळणारे ज्ञान लिहून ठेवा; कारण त्याचा पुढच्या मानवजातीला पुष्कळ लाभ होणार आहे’, असे सांगणे
परात्पर गुरु डॉ. आठवले : हो. तुमच्याकडे जेवढे ज्ञान येत आहे, ते सगळे ग्रंथ स्वरूपात घेतले पाहिजे. मानवजातीला त्यातून पुष्कळ शिकता येईल. अलीकडच्या काळात सोप्या भाषेत सर्वसामान्यांना अध्यात्म शिकवतील, असे संत नाहीत.
पू. सखाराम बांद्रे महाराज : माझे शिक्षण फार अल्प झाले आहे. मी केवळ चौथी शिकलो आहे.
परात्पर गुरु डॉ. आठवले : अहो, पण तुम्हाला देव सांगतो ना सगळे. शिक्षणाला काय किंमत आहे ? मी पुष्कळ शिकलो आहे. डॉक्टर झालो, त्याचा अध्यात्मात काही उपयोग आहे का ?
९. ‘चंदनाच्या जवळ खैराचे झाड असले, तरी त्यालाही चंदनाचा सुगंध येतो, तसे सत्पुरुषांजवळ राहिले की, साधा मनुष्यही सत्पुरुष होत असणे’, असे पू. बांद्रे महाराज यांनी सांगणे
परात्पर गुरु डॉ. आठवले : अध्यात्मात शिक्षणाला काही महत्त्व नाही. सद्गुरु सत्यवान कदम यांनी पुष्कळ सेवा केली आणि तो संतच झाला.
पू. सखाराम बांद्रे महाराज : चंदनाच्या बाजूला खैराचे झाड असले, तरी त्यालाही सुगंध येतोच ना ? तसे आपल्यामुळे आम्हाला सुगंध येणारच ना ! आम्ही हे उपकार कसे फेडायचे ? हे उपकार आम्ही या जन्मात फेडू नाही शकणार.
(क्रमशः)
या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/509505.html