सिंहगडावर भव्य विश्रामगृह आणि शिवसृष्टी साकारण्याचा जिल्हा परिषदेचा प्रस्ताव !
पुणे, ७ सप्टेंबर – येथील सिंहगडावर अनुमाने ७ कोटी रुपये खर्चून भव्य विश्रामगृह उभारण्यासह जिल्हा परिषदेच्या अनुमाने ४४ सहस्र चौरस फूट जागेवर शिवसृष्टी साकारण्याचा पुणे जिल्हा परिषदेचा प्रस्ताव आहे. या आराखड्याचे सादरीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासमोर करण्यात आले. त्यात त्यांनी काही सूचना केल्या असून त्या दुरुस्त केल्यानंतर पुन्हा आराखड्याचे सादरीकरण केले जाणार आहे.
किल्ल्यावरील जुनी इमारत पाडून तेथे केल्या जाणार्या पुनर्विकासात शनिवारवाडा, विश्रामबागवाडा यांच्या वास्तूरचनेचे दर्शन घडवणारी इमारत बांधण्याचा प्राथमिक स्वरूपातील प्रस्ताव सिद्ध करण्यात आला आहे. इतिहासकार, वास्तूरचनाकार, पर्यटन, वन, तसेच महत्त्वाच्या विभागांची मते जाणून घेतल्यानंतर हा प्रस्ताव अंतिम केला जाणार आहे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले की, पुनर्विकास झाल्यास सिंहगड किल्ल्यावर संस्कृतीचे दर्शन घडेल, तसेच शिवशाही काळातील वास्तूरचना, ऐतिहासिक वारसा जतन करण्याचा हा एक प्रयत्न आहे. त्यामुळे शनिवारवाड्यासह विश्रामबागवाड्याच्या प्रतिकृतीचा काही भाग या पुनर्विकासामध्ये प्रत्यक्षात साकारण्याचा प्राथमिक प्रस्तावात विचार आहे.