ऋषितुल्य व्यक्तीमत्त्व आणि सर्व साधकांचे आधारस्तंभ असलेले सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांची त्यांच्या सासूबाई पू. (सौ.) शैलजा परांजपे यांनी उलगडलेली दैवी वैशिष्ट्ये !
भाद्रपद शुक्ल पक्ष द्वितीया (८.९.२०२१) या दिवशी सनातनचे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांचा ५८ वा वाढदिवस आहे. त्या निमित्त त्यांच्या सासूबाई सनातनच्या ९० व्या संत पू. (सौ.) शैलजा परांजपे यांना जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.
सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्या चरणी त्यांच्या ५८ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराकडून कृतज्ञतापूर्वक नमस्कार !
१. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांच्याशी जावयाचे नाते न रहाता ते ईश्वरासमान वाटणे आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली अन् सद्गुरु डॉ. मुकुल यांची जोडी लक्ष्मी-नारायणाप्रमाणे भासणे
‘सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ हे आमचे जावई आहेत; पण आता ते नाते राहिले नाही. ते आम्हा सर्वांसाठी ईश्वरासमान आहेत. मुलीच्या विवाहप्रसंगी मुलीच्या आई-वडिलांनी जावई आणि मुलगी यांची ‘लक्ष्मी-नारायणा’ची जोडी मानून पूजा करायची असते. आम्हीसुद्धा डॉ. मुकुल आणि चि. अंजली यांच्या विवाहाच्या वेळी रीतीनुसार पूजा केली. आम्ही इतके भाग्यवान आहोत की, आमची ही पूजा काही वर्षांनी सत्यात उतरली. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ आणि सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ हे खरोखर लक्ष्मी-नारायणच आहेत.
२. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी ईश्वरी सेवा करण्यासाठी सर्वस्वाचा त्याग करून आश्रमात येणे अन् त्यांच्या अंगी असलेले देवत्व वृद्धींगत होणे
डॉ. मुकुल आणि सौ. अंजली यांना सनातन संस्था अन् परात्पर गुरुदेव यांच्या कार्याविषयी त्यांच्या आई-वडिलांकडून (सौ. माधुरी (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के) आणि श्री. माधवराव गाडगीळ (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के) यांच्याकडून) प्रथम समजले. ते देवाच्या कृपेने सनातन संस्थेत आले आणि परात्पर गुरुदेवांवर श्रद्धा ठेवून त्यांनी साधना केली. त्यानंतर ते सर्वस्वाचा त्याग करून केवळ ईश्वरी सेवा करण्यासाठी स्वतःच्या लहान मुलीला, कु. सायलीला (आताची सौ. सायली करंदीकर हिला) घेऊन आश्रमात आले. त्यांची साधना चालू झाली आणि त्यांच्या अंगी असलेले देवत्व वृद्धींगत झाले.
सद्गुरु डॉ. मुकुल वर्ष २००१ पासून गोवा येथील सनातनच्या रामनाथी आश्रमात रहात आहेत. ते मायेपासून दूर राहिले आणि गुरुदेवांचे तंतोतंत आज्ञापालन करून सेवा अन् साधना करू लागले.
३. सद्गुरु मुकुल गाडगीळ यांच्या अंगी असलेले गुण
खरे म्हणजे सद्गुरु मुकुल यांच्या अंगी अवगुणच नाहीत. जे आहेत, ते सगळे गुणच आहेत. त्यांच्या आई-वडिलांनी त्यांना छान वळण लावले.
अ. त्यांची रहाणी साधी असून विचारसरणी उच्च आहे. ‘धोतर आणि सदरा’ असा त्यांचा पोषाख असतो.
आ. ते एखाद्या निरागस बाळाप्रमाणे दिसतात. त्यांच्या तोंडवळ्यावर सतत सात्त्विक भाव दिसतात. ते नेहमी आनंदी असतात आणि त्यांच्याकडे पाहिल्यावर आनंद होतो.
इ. ते सर्वांवर प्रेम करतात. त्यांच्या कोषात ‘राग’ हा शब्दच नाही.
ई. ते अत्यंत शिस्तप्रिय आहेत. त्यांची प्रत्येक कृती शिकण्यासारखी असते.
उ. ते ‘पी.एच्डी.’ झालेले आहेत; पण त्यांना शिक्षणाचा जराही अहं नाही. ते समाजातील अन्य व्यक्तींसमवेत असतांना केवळ ऐकण्याची भूमिका बजावतात. कुणी काही विचारले, तर उत्तर देतात; पण आपण होऊन आपले मत कधी प्रदर्शित करत नाहीत.
ऊ. त्यांना कोणत्याही गोष्टीची अपेक्षा नाही, उदा. कपडे-लत्ते, खाणे-पिणे, बाहेर फिरणे इत्यादी. ते सतत दुसर्यांसाठी झटत असतात. श्रीचित्शक्ति (सौ.) अंजलीताई धर्मप्रचारासाठी अनेक देशांत गेल्या; पण ‘मला जायला मिळाले नाही’, असे सद्गुरु मुकुल यांना कधीच वाटले नाही.
ए. ‘सौ. अंजली यांना ‘श्रीचित्शक्ति’ असे संबोधावे’, असे महर्षींनी सांगितले आहे. त्यामुळे सद्गुरु मुकुल त्यांना ‘पत्नी’, असे संबोधत नाहीत. त्यांच्याशी ते ‘देवी’ हा भाव ठेवून वर्तन करतात. त्यांच्याशी आदराने बोलतात.
सद्गुरु मुकुल यांचे सर्व आचरण ऋषिमुनींसारखेच आहे.
४. रात्रंदिवस सेवेचाच ध्यास असलेले सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ !
४ अ. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी आरंभी ‘सनातन प्रभात’शी संबंधित आणि नंतर ग्रंथसंकलन करण्याची सेवा परिपूर्ण रितीने करणे : वर्ष २००१ मध्ये सद्गुरु मुकुल सुखसागर, फोंडा येथील गोव्याच्या आश्रमात पूर्णवेळ साधना करण्यासाठी आले. आरंभी ते साप्ताहिक ‘सनातन प्रभात’शी संबंधित सेवा करत होते. नंतर काही वर्षे त्यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या कार्यालयात सेवा केली. त्यानंतर सनातनने प्रकाशित केलेल्या विविध ग्रंथांचे संकलन केले. त्यांना रात्रंदिवस सेवेचाच ध्यास असतो. त्यांना मिळालेली गुरुसेवा ते परिपूर्ण रितीने करतात.
४ आ. परात्पर गुरु डॉक्टरांनी नामजपादी उपाय करण्यास सांगितल्यावर सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी साधकांना नामजपादी उपाय सांगणे अन् त्यांच्या उपायांमुळे साधकांना त्वरित लाभ होणे : पूर्वी परात्पर गुरु डॉक्टर आध्यात्मिक त्रास असलेल्या साधकांसाठी नामजपादी उपाय करत. ते साधकांना आध्यात्मिक त्रासांनुसार वेगवेगळे नामजप आणि मुद्राही करायला सांगत असत. तेव्हा सद्गुरु डॉ. मुकुल ते उपाय बघायचे आणि त्याप्रमाणे स्वतः करण्याचा प्रयत्न करायचे. हळूहळू त्यांनाही या गोष्टी जमू लागल्या आणि तेही साधकांसाठी नामजपादी उपाय करू लागले. गुरुदेवांच्या संकल्पाने त्यांना त्यात यश प्राप्त झाले. परात्पर गुरु डॉक्टर त्यांना म्हणाले, ‘‘आता तुम्हीच नामजप शोधून साधकांसाठी नामजपादी उपाय करा.’’ त्यांचा संकल्प झाल्यावर मग काय उणे !
साधकांना काही आजार झाला, तर साधक आधुनिक वैद्यांचे औषध घेतात आणि त्यासमवेत सद्गुरु मुकुल यांना नामजपादी उपाय विचारतात. सद्गुरु मुकुल लगेचच साधकांना नामजप आणि मुद्रा शोधून देतात, तसेच ‘नामजप किती घंटे आणि किती दिवस करायचा ?’, हेही सांगतात. साधकांच्या प्रकृतीनुसार नामजप आणि मुद्रा यांत पालट होतो. सद्गुरु मुकुल यांनी सांगितलेला नामजप केल्याने साधकांना गुण येतो. त्यामुळे ते आता साधकांसाठी ‘अध्यात्मातील धन्वन्तरि’ आहेत. ते आम्हा सर्वांचा आधारस्तंभ आहेत.
साधकांना नामजपादी उपाय सांगण्याचा ते कधीही कंटाळा करत नाहीत. रात्री-अपरात्री साधकांनी विचारले तरी, ते झोपेतून उठून उपाय आणि नामजप सांगतात. प्रसंगी ते स्वतःही साधकांसाठी नामजप करतात. साधकांना त्याचा १०० टक्के लाभ होतो. साधकांची त्यांच्यावर अपार श्रद्धा आहे. दिवसभरात ते जवळजवळ १५ ते १८ घंटे याच सेवेत असतात. या गोष्टीचा त्यांच्या तोंडवळ्यावर कधीही ताण दिसत नाही.
कृतज्ञता
हे परमेश्वरा, हे गुरुराया, तुमच्या चरणी मी कितीही वेळा कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अपुरीच पडेल. ‘जगाच्या कल्याणा, संतांच्या विभूती ।’, या उक्तीप्रमाणेच सद्गुरु मुकुल आहेत. देवा, गतजन्मी आमच्याकडून काहीतरी पुण्यकर्म घडले असेल; म्हणून सद्गुरु मुकुल याच्यासारखे संतरत्न तू आम्हाला जावई म्हणून दिलेस, यासाठी आम्ही कृतज्ञ आहोत. देवा, त्यांना उदंड आयुष्य लाभू दे. त्यांचे आरोग्य चांगले राहू दे. त्यांच्याकडून अशीच सेवा घडू दे आणि सर्वांना त्यांचा लाभ करून घेता येऊ दे, ही आपल्या चरणी मनोभावे प्रार्थना !’
– (पू.) सौ. शैलजा परांजपे (सद्गुरु मुकुल गाडगीळ यांच्या सासूबाई) सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३१.८.२०२१)
आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात. |