राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते नौदलाच्या हवाई विभागाला ‘प्रेसिडेंट कलर्स’ पुरस्कार प्रदान

पणजी, ६ सप्टेंबर (वार्ता.) – भारतीय नौदलाचा हवाई विभाग देशसेवेच्या ६८ व्या वर्षात पदार्पण करत असल्याने हा एक मोठा ऐतिहासिक दिवस आहे. भारतीय नौदलाच्या हवाई विभागाला माझ्याकडून ‘प्रेसिडेंट कलर्स’ पुरस्कार प्रदान करण्यात येणे, ही माझ्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे. कोरोना महामारीच्या काळात नौदलाच्या हवाई विभागाने केलेले साहाय्यकार्य आणि सेवा उल्लेखनीय होती, असे गौरवोद्गार राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी भारतीय नौदलाविषयी काढले. भारतीय नौदलाच्या गोव्यातील आयएन्एस् हंस तळाच्या हीरक महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने आणि भारतीय नौदलाच्या हवाई विभागाला ‘प्रेसिडेंट कलर्स’ हा प्रतिष्ठेचा सर्वाेच्च पुरस्कार प्रदान करण्यासाठी आयोजित केलेल्या कार्यक्रमात राष्ट्रपती रामनाथ कोविंद प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते. दाबोळी विमानतळ क्षेत्रात आयोजित केलेल्या या कार्यक्रमात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासह गोव्याचे राज्यपाल पी.एस्. श्रीधरन् पिल्लई, गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक, भारतीय नौदलाचे प्रमुख ॲडमिरल करणबीर सिंह, व्हाईस एडमिरल हरि कुमार, नौदलाच्या गोवा विभागाचे ध्वजाधिकारी फिलिपोझ पायनमुत्तील आदींची प्रमुख उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या प्रारंभी भारतीय नौदलाच्या सैनिकांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना मानवंदना दिली. त्यानंतर राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते भारतीय नौदलाच्या हवाई विभागाला ‘प्रेसिडेंट कलर्स’ हा सर्वाेच्च पुरस्कार प्रदान करण्यात आला. राष्ट्रपती रामनाथ कोविंद पुढे म्हणाले, ‘‘वर्ष १९५३ मध्ये भारतीय नौदलाने ‘आयएन्एस् गरुड’ या ‘एअर स्टेशन’चे अनावरण केल्यानंतर पुढील वर्षापासून नौदलाच्या हवाई विभागाने अभूतपूर्व विकास केला आहे. त्यानंतर वर्ष १९६१ मध्ये भारतीय नौदलात लढाऊ विमान हाताळणारे ‘आयएन्एस् विक्रांत’ हे जहाज समाविष्ट झाल्याने दलाचे बळ आणखी वाढले. ‘आयएन्एस् विक्रांत’ जहाजाने गोवा मुक्तीलढ्यात महत्त्वाचे योगदान दिले आहे.’’

भारतीय नौदलाच्या ‘एव्हिएशन’ विभागाकडे २५० हून अधिक युद्ध विमाने

आज भारतीय नौदलाच्या ‘एव्हिएशन’ विभागाच्या अंतर्गत ९ हवाई केंद्रे आणि ३ नौदल हवाई क्षेत्रे आहेत. ही सर्व भारतीय किनारपट्टीवर आणि अंदमान अन् निकोबार बेटांवर आहेत. गेल्या ७ दशकांच्या कालावधीत नौदलाचा ‘एव्हिएशन’ विभाग  तंत्रज्ञानदृष्ट्या प्रगत आणि अत्यंत सक्षम दलामध्ये विकसित झाला आहे. दलाकडे सध्या २५० हून अधिक युद्ध विमाने आहेत.