मडगाव येथील लोहिया मैदानातील डॉ. राम मनोहर लोहिया यांचा पुतळा हाताळतांना निष्काळजीपणा करणार्या कर्मचार्यावर कारवाई करा !
स्वातंत्र्यसैनिक संघटनेची मडगाव नगरपालिकेकडे मागणी
मडगाव, ६ सप्टेंबर (वार्ता.) – गोवा मुक्तीलढ्याचे प्रणेते तथा ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक डॉ. राम मनोहर लोहिया यांचा मडगाव येथील लोहिया मैदानातील पुतळा सध्या जागेवर नाही. या पुतळ्याविषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी स्वातंत्र्यसैनिकांच्या एका शिष्टमंडळाने मडगाव नगरपालिकेच्या मुख्याधिकार्यांची भेट घेतली.
लोहिया मैदानाचे सुशोभिकरणाचे काम चालू आहे. या वेळी मैदानातील डॉ. राम मनोहर लोहिया यांचा पुतळा आणि त्यांचे नाव असलेला फलक मैदानात एका कोपर्यात भूमीवर ठेवण्यात आला होता. या प्रकरणी डॉ. राम मनोहर लोहिया यांचा अवमान झाल्याच्या पार्श्वभूमीवर मडगाव पालिकेवर टिकेची झोड उठली आहे. या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्यसैनिकांच्या एका शिष्टमंडळाने पालिकेच्या मुख्याधिकार्यांची भेट घेतली.
मडगाव पालिकेच्या मुख्याधिकार्यांनी स्वातंत्र्यसैनिकांच्या शिष्टमंडळाला सांगितले की, संबंधित पुतळा मैदानाचे सुशोभिकरण करणार्या कंत्राटदाराने ‘पॉलिशिंगसाठी नेला आहे आणि पुतळा चोरीस गेलेला नाही. स्वातंत्र्यसैनिकांच्या शिष्टमंडळाने मैदानात डॉ. राम मनोहर लोहिया यांचा पुतळा कोपर्यात टाकणार्या कर्मचार्यावर कारवाई करण्याची मागणी केली.