बेळगाव महानगरपालिकेवर भाजपची सत्ता !

काँग्रेसला केवळ १० जागा

बेळगाव, ६ सप्टेंबर – बेळगाव महापालिकेच्या निवडणुकांचा निकाल ६ सप्टेंबर या दिवशी घोषित झाला. एकूण ५८ जागांपैकी ३५ जागांवर विजय मिळवत भाजपने एकहाती सत्ता मिळवली आहे. काँग्रेसला १०, अपक्षियांना ८, महाराष्ट्र एकीकरण समितीला ४ जागा मिळाल्या आहेत, तर ‘एम्.आय.एम्.’ने एका जागेवर विजय मिळवला आहे. या अगोदरच्या सभागृहात महाराष्ट्र एकीकरण समितीचे ३२, तर कन्नड-उर्दू गटाचे ३६ सदस्य होते. गेल्या २ वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या निवडणुकीसाठी ३ सप्टेंबर या दिवशी मतदान पार पडले. मराठी भाषिकांनी बेळगावचा गड राखण्याची सिद्धता केली होती; मात्र ते त्यात यशस्वी ठरले नाहीत.

बेळगाव महापौर निवडीच्या वेळी आमदार आणि खासदार यांना मतदानाचा अधिकार आहे. सध्या बेळगावमध्ये भाजपचे २ खासदार आणि २ आमदार आहेत. त्यामुळे महापौर निवडीच्या वेळी भाजपचे संख्याबळ आणखी वाढणार आहे. तुरळक अपवाद वगळता मतमोजणी शांततेत पार पडली. गर्दी केल्याने एका ठिकाणी पोलिसांनी सौम्य लाठीमार केला. शहरात मतमोजणीच्या कालावधीत कोणताही अनुचित प्रकार घडू नये; म्हणून १ सहस्र ५०० पोलीस बंदोबस्तासाठी नेमण्यात आले होते.