गणेशोत्सवाच्या काळात सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणार्‍यांसाठी जिल्हाधिकार्‍यांच्या मार्गदर्शक सूचना

  • लस घेतली नसल्यास ‘रॅपिड अँटिजेन’ चाचणी करावी लागणार

  • जिल्ह्यात प्रवेश करणार्‍या प्रत्येकाची होणार नावनोंदणी

प्रतिकात्मक छायाचित्र

सिंधुदुर्ग (जि.मा.का.) – जिल्ह्यात प्रवेश करण्याकरिता कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या २ मात्रा (डोस) घेतलेल्या असणे आवश्यक आहे अन्यथा नागरिकांजवळ जिल्ह्यात प्रवेश करण्याअगोदर ७२ घंटे पूर्वी काढलेला आर्.टी.पी.सी.आर्. चाचणीचा कोरोनाबाधित नसल्याचा अहवाल समवेत बाळगणे आवश्यक आहे. ज्या प्रवाशांकडे कोरोना लसीच्या २ मात्रा पूर्ण झालेले प्रमाणपत्र किंवा आर्.टी.पी.सी.आर्. चाचणीचा अहवाल नसेल, अशा नागरिकांची विनामूल्य ‘रॅपिड अँटिजेन’ तपासणी केली जाईल. १८ वर्षांखालील मुलांचे लसीकरण होत नसल्याने त्यांचा आर्.टी.पी.सी.आर्. चाचणीचा अहवाल आवश्यक नाही, अशा मार्गदर्शक सूचना जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिल्या आहेत.

या अनुषंगाने प्रशासकीय यंत्रणांना दिलेल्या सूचना

१. जिल्ह्याबाहेरून येणार्‍या नागरिकांची महसूल, आरोग्य आणि पोलीस यांच्या पथकांच्या वतीने पोलीस तपासणी नाकी, रेल्वेस्थानक आणि बसस्थानक यांवर नोंदणी करण्यात यावी.

२. जिल्ह्याच्या बाहेरून एस्.टी. बसगाडीतून येणार्‍या प्रवाशांची माहिती, बस ज्या ठिकाणाहून सुटेल, त्याच ठिकाणी विहीत नमुन्यामध्ये २ प्रतीत भरावी. त्याची एक प्रत जिल्ह्यात प्रवेशाच्या ठिकाणी तपासणी नाक्यावर जमा करून घ्यावी.

३. खासगी किंवा एस्.टी. बसचे चालक आणि वाहक यांनी कोरोनाविषयक चाचणी अगोदरच केलेली असणे आवश्यक आहे. तसे न केल्यास गाडी पोचण्याच्या ठिकाणावर चाचणी करावी. खासगी किंवा एस्.टी.तील प्रवाशांनी मास्क आणि सॅनिटायझर यांचा व्यवस्थित वापर करणे अनिवार्य असल्याची समज वाहक अन् चालक यांनी प्रवाशांना द्यावी.

४. गणेशोत्सवाकरिता नगरपालिका आणि नगरपंचायत क्षेत्रांत येणार्‍या प्रवाशांची सूची संबंधित मुख्याधिकारी यांनी तहसीलदार यांच्याकडून प्रतिदिन सायंकाळी ५ वाजेपर्यंत घेण्याचे नियोजन करावे.

५. चाचणीमध्ये कोरोनाबाधित आढळणार्‍या किंवा लक्षणे दिसणार्‍या व्यक्तींना तात्पुरते संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात यावे.

६. तात्पुरत्या संस्थात्मक विलगीकरणाच्या ठिकाणी स्थानिक प्रशासनाच्या वतीने पाणी, वीज आणि वैद्यकीय सुविधा पुरवण्यात याव्यात.

७. कोरोनाविषयक चाचणीस आणि कोरोनाबाधित व्यक्तीच्या विलगीकरणास विरोध करणार्‍या व्यक्तींवर पोलिसांच्या वतीने कारवाई करण्यात यावी.

८. ग्राम नियंत्रण समितीने तिच्या कार्यक्षेत्रात गर्दी होणार नाही आणि कोरोनाच्या अनुषंगाने शासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन होईल, याची दक्षता घ्यावी.

९. सर्व प्रकारचे व्यापारी आणि ग्राहक यांनी मास्क वापरणे बंधनकारक आहे. मास्क न वापरणार्‍यांवर संबंधित अधिकार्‍यांनी दंडात्मक कार्यवाही करावी.

१०. यांसह दिलेल्या अन्य सूचनांचे पालन करावे.

वाहतुकीच्या संदर्भात सूचना

गणेशोत्सवास मोठ्या संख्येने येणारे प्रवासी आणि वाहनचालक यांच्या दृष्टीने राष्ट्रीय महामार्गावरील धोकादायक वळणांवर दिशादर्शक फलक लावावेत. मार्गांवरील खड्डे भरण्याची कार्यवाही तातडीने करावी. अपघातप्रवण क्षेत्रातील झाडेझुडपे प्राधान्याने तोडण्यात यावीत. अपघातप्रवण क्षेत्राच्या ठिकाणी रुग्णवाहिका उपलब्ध ठेवाव्यात. महामार्गावर विभाग करून तेथे ‘क्रेन’ उपलब्ध कराव्यात.

श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम तलावांची निर्मिती करावी

श्री गणेशमूर्ती विसर्जनसाठी कृत्रिम तलावांची निर्मिती करावी, तसेच मा. न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे नैसर्गिक जलस्रोतांच्या ठिकाणी मूर्तीविसर्जनास पूर्ण बंदी आहे. त्यामुळे प्रभागनिहाय योग्य ठिकाणी कृत्रिम तलाव, हौद, टाक्या निर्माण कराव्यात आणि विसर्जनस्थळी निर्माल्य कलश ठेवावेत. गणेशोत्सव कालावधीत विद्युत्पुरवठा अखंडित राहील, यासाठी विद्युत् वितरण आस्थापनाने दक्ष रहावे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर सर्व नियम आणि सूचना पाळून सिंधुदुर्गवासियांनी गणेशोत्सव आनंदाने साजरा करण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करावे.