पारपत्राची मुदत संपल्याने अफगाणी विद्यार्थी चिंतेत
पुणे, ६ सप्टेंबर – शिक्षणासाठी पुण्यात आलेल्या १ सहस्र ४०० अफगाणी विद्यार्थ्यांपैकी १०० हून अधिक विद्यार्थ्यांच्या पारपत्राची (‘व्हिसा’) मुदत संपली आहे. त्यामुळे शिष्यवृत्तीच्या कालावधीमध्ये वाढ करण्याची, तसेच पारपत्राची मुदत वाढवून देण्याची मागणी अफगाणी विद्यार्थी करीत आहेत. दीड ते दोन सहस्र अफगाणी विद्यार्थी भारतात शिक्षण घेतात. त्यांतील काही विद्यार्थी शिष्यवृत्तीअंतर्गत किंवा काही स्वत:च्या व्ययाने येतात.
संबंधित विद्यार्थ्यांच्या अडचणींविषयी आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक संबंध परिषदेच्या वतीने परराष्ट्र मंत्रालयाशी संपर्क साधण्यात आला आहे. ‘विद्यार्थ्यांनी पारपत्राच्या संदर्भात काळजी करण्याचे कारण नाही’, असे आश्वासन सावित्रीबाई फुले विद्यापिठाचे प्रकुलगुरु डॉ. एन्.एस्. उमराणी यांनी दिले आहे.