महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत ७१ नगरसेवक प्रभागातील विकासकामे आणि समस्या यांसंदर्भात चिडीचूप !
प्रभागातील विकासकामे आणि समस्या यांविषयी चकार शब्दही न काढणारे लोकप्रतिनिधी जनतेच्या कामाविषयी किती उदासीन आहेत ?, हेच यावरून लक्षात येते. असे लोकप्रतिनिधी असतील तर विकास कोणत्या दिशेने जाईल याची कल्पना न केलेली बरी ! – संपादक
पुणे – महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत ७१ नगरसेवकांना गेल्या ४ वर्षांत प्रभागातील विकासकामे आणि समस्या यांविषयी एकही प्रश्न पडला नाही. त्यामुळे हे नगरसेवक एक शब्दही बोलले नाहीत. याउलट १६२ नगरसेवकांनी मात्र महापालिकेचा निधी व्यय करण्यात कोणतीही कसर सोडली नाही. ‘परिवर्तन’ संस्थेने पुणे महापालिकेतील १६२ नगरसेवकांनी वर्ष १ एप्रिल २०१७ ते ३१ मार्च २०२१ या चार वर्षांत केलेल्या कामांचा लेखाजोखा नुकताच घोषित केला. त्याअन्वये या ४ वर्षांत एकूण ९० कोटी ९० लाख ८७ सहस्र ३२६ रुपये व्यय झाले आहेत. यामध्ये ड्रेनेज / पावसाळी गटारे विषयक कामांवर अधिक व्यय झाला असून ज्यूट / कापडी पिशव्या वाटप, आपत्ती मदतकार्य (कोविड विषयक), स्वच्छता / राडारोडा उचलणे आणि पथदिवे-विद्युत् विषयक कामे या कामांचा प्राधान्य मिळालेल्या कामात समावेश आहे.