‘वैचारिक’ तालिबान्यांचा संघद्वेष !
संपादकीय
|
तुलना करणे, हा मानवी स्वभाव आहे. ती व्यक्तीगत पातळीवर चालते, तेव्हा इतरांना त्याच्याशी काही देणे-घेणे नसते; मात्र अशी तुलना जेव्हा सामाजिक स्तरावर होते, तेव्हा मात्र सर्वांना विचार करायला लावणारी असते. खरे तर २ देशांमधील व्यवस्था, सामाजिक प्रवाह यांच्या तुलनेतून तेथील परिस्थितीचे मूल्यांकन होते. हे देशाच्या प्रगतीस पूरकही असते; मात्र आकसापोटी वा निव्वळ द्वेषापोटी तुलना करणारेही काही जण असतात. अशा तुलनेला जर राष्ट्रघातकी किनार असेल, तर राष्ट्राचे नागरिक म्हणवून घेणार्या सर्वांचेच तिच्याशी देणे-घेणे लागते. एवढेच नव्हे, तर अशी विचारसरणी नष्ट करण्यासाठी प्रयत्न करणे, हे राष्ट्रातील नागरिकांचे कर्तव्यही ठरते. दुर्दैवाने भारतात अनेक व्यक्ती अशा राष्ट्रघातकी विचारसरणीच्या आहेत. ‘हिंदुद्वेष’ हे त्यांच्या विचारसरणीचे मूळ आहे. ‘जगात जरा कुठे खुट्ट झाले, तर त्या घटनेचा भारतातील हिंदुत्वनिष्ठ संघटनांशी बादरायण संबंध जोडायचा, हिंदुत्वनिष्ठ संघटनांवर बिनबुडाचे आरोप करायचे’, असे धंदे या व्यक्ती करत असतात. बरं, अशा व्यक्ती पांढरपेशा समाजात अशा पद्धतीने जगतात की, त्यांचे वर्तन आणि वक्तव्य निधर्मी अन् पुढारलेले वाटावे ! या मुखवट्यापुढे त्यांचा हिंदुद्वेष पर्यायाने राष्ट्रद्वेष झाकला जातो; मात्र हा मुखवटा वेळोवेळी दूर करणे अत्यावश्यक आहे. या कंपूतील गीतकार आणि लेखक जावेद अख्तर हे एक आहेत. नुकतेच अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल यांना ‘तालिबानी प्रवृत्तीचे’, असे संबोधले आहे. ‘ज्या पद्धतीने तालिबानी मुसलमान राष्ट्र निर्माण करण्यासाठी हिंसक प्रयत्न करत आहेत, त्याच पद्धतीने भारतात काही जण ‘हिंदु राष्ट्रा’ची संकल्पना मांडत आहेत’, अशी तुलना अख्तर यांनी केली आहे. अर्थातच या वक्तव्याला हिंदुद्वेषाचा दर्प आहे.
संघाचे राष्ट्रोद्धारक कार्य !
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ गेल्या ९ दशकांपासून अधिक काळ राष्ट्रोद्धाराचे कार्य करत आहे. अनेक संघप्रचारकांनी पूर्णवेळ कार्यरत राहून समाजात राष्ट्र-धर्मप्रेमाची ज्योत प्रज्वलित ठेवली. अविरत राष्ट्रकार्य करण्यासाठी अनेक स्वयंसेवक अविवाहित राहिले आणि त्यांनी आजीवन राष्ट्रकार्याला वाहून घेतले. आज ईशान्येकडील राज्यांत हिंदूंचे मोठ्या प्रमाणात धर्मांतर होत आहे. याही भयावह स्थितीत तेथे हिंदू अजूनही शेष आहेत, याचे बहुतांश श्रेय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला जाते. संघप्रचारकांनी या राज्यांत तळागाळापर्यंत जाऊन तेथील धर्मांतर रोखले. स्वातंत्र्यानंतर संघाच्या कार्यकर्त्यांनी धर्मांधांच्या अत्याचारांपासून हिंदूंचे रक्षण केले. धर्मरक्षणार्थ केलेल्या कार्याला ‘आतंकवादी कार्य’ कसे म्हणू शकतो ? संघाची तालिबान्यांशी तुलना करणार्यांनी याचे उत्तर दिले पाहिजे. स्वबांधवांच्या रक्षणार्थ झटण्याला ‘आतंकवादी कार्य म्हणणे, हाच खरे तर वैचारिक आतंकवाद आहे. संघाच्या स्वयंसेवकांनी मागासवर्गीय मुलांना स्वत:च्या घरात ठेवून त्याचे शिक्षण पूर्ण केले, तसेच त्यांचे विवाहही करून दिले. मागासवर्गीय मुलांना जवळ बसवून त्यांच्यासमवेत जेवणे, यासारख्या कृतींतून संघाच्या कार्यकर्त्यांनी जातीभेद मिटवण्यासाठी प्रयत्न केले. आर्थिक, सामाजिक, रुग्णसेवा अशा अनेक क्षेत्रांत संघाच्या उपशाखा कार्यरत आहेत. शिस्तबद्धता, त्याग, प्रामाणिकता आणि नि:स्वार्थीपणा या गुणांमुळे संघाचे कार्य हे कर्मयोगाचे उदाहरण आहे. स्वार्थांधतेने बरबटलेल्या काळात संघाचे कार्यकर्ते प्रामाणिकपणे कार्यरत आहेत. देशात साम्यवाद, निधर्मीपणा फोफावत असतांना संघाने निर्मळ आणि प्रखर राष्ट्रवाद अबाधित ठेवला. द्वेषाची झापडे लावलेल्यांना हे काय कळणार ? हे राष्ट्रोद्धाराचे कार्य केवळ राष्ट्रप्रेमीच समजू शकतात, हेही तितकेच खरे !
राष्ट्रघातकी प्रवृत्तीचा बंदोबस्त करा !
सध्या अफगाणिस्तानात धुमाकूळ घालत असलेल्या तालिबान्यांना क्रूरतेचा काळा इतिहास आहे. तालिबानी अत्याचाराला सीमाच नाही. प्रेतांवर बलात्कार करणे, माणसांना टांगून खालून आग लावून त्यांना भाजणे, हात-पाय तोडणे अशा पशूलाही लाजवणार्या कृती करणारी तालिबानी प्रवृत्ती आहे. याविषयी बोलतांना अख्तर यांना हिंदुत्वनिष्ठ संघटनांशी तुलना करण्याचा आडोसा का घ्यावा लागतो ? ते उघड उघड निषेध का करत नाहीत ? यावरून ‘अख्तर यांना खरेच तालिबान्यांचा निषेध करायचा आहे का ?’ असाच प्रश्न निर्माण होतो. हिंदुत्वनिष्ठ जर तालिबानी असते, तर अख्तर यांनी असे बोलण्याचे धाडस केले असते का? अख्तर हिंदुद्वेषी विधाने बिनबोभाटपणे करू धजावतात, यातूनच यांचे वक्तव्य आणि वस्तूस्थिती यांच्यात आकाशपाताळाएवढा भेद आहे, हे लक्षात येते. अख्तर यांच्या वक्तव्यानंतर लोकप्रतिनिधींनी त्यांचा निषेध केला आहे. भाजपचे आमदार राम कदम यांनी ‘जावेद अख्तर यांचा एकही चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही’, अशी चेतावणी दिली आहे, तर आमदार नीतेश राणे यांनी ‘ज्या देशात हिंदू बहुसंख्य आहेत, तेथे अख्तरसारख्या लोकांनी हिंदु राष्ट्राला विरोध केला. आपण त्यांची गाणी, चित्रपट यांना डोक्यावर घेतो आणि त्यांच्या कुटुंबियांना सुरक्षित असल्याची निश्चिती देतो. आपण सापाला दूध पाजतोय का ?’ असा प्रश्न उपस्थित केला आहे. खरे तर सर्वच लोकप्रतिनिधी आणि राष्ट्रप्रेमी नागरिक यांनी पुढे येऊन आता कृतीशील निषेध नोंदवायला हवा. अख्तर यांचे चित्रपट आणि गाणी यांवर बहिष्कार घालायला हवा. अख्तर यांचे वक्तव्य हे केवळ एका व्यक्तीचे विचार नसून ती एक प्रवृत्ती आहे. या प्रवृत्तीची पिलावळ देशात अधूनमधून डोके वर काढत असते. अशा सर्वांपासूनच देशाला धोका आहे. त्यामुळे सरकारने या प्रवृत्तीचा बंदोबस्त करायला हवा. लोकप्रतिनिधींमधून निषेध व्यक्त होत असतांना महाराष्ट्राचे गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मात्र ‘प्रत्येकाला वैचारिक स्वातंत्र्य आहे’, अशी मखलाशी करून अख्तर यांचे समर्थन केले आहे. हीच ती ‘अख्तर प्रवृत्ती’ आहे. विविध क्षेत्रांत घुसलेल्या या विचारसरणीला आता थोपवले पाहिजे !