सरकारी कार्यक्रमात गर्दी चालते, मग गणेशोत्सव आणि दहीहंडीला का नाही ? – राज ठाकरे
पुणे – सरकारी कार्यक्रमांना किंवा एखाद्या पक्षाच्या कार्यक्रमाला गर्दी चालते; मात्र गणेशोत्सव किंवा दहीहंडीला गर्दी का चालत नाही ? नियम सर्वांसाठी सारखा असायला हवा. नेत्यांच्या सभांना वेगळा नियम आणि उत्सवांसाठी वेगळा असे का ? असा प्रश्न राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. पुण्यातील पदाधिकार्यांसमवेत घेतलेल्या बैठकीत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांसमवेत संवाद साधला. त्या वेळी ते बोलत होते.
सरकार कोरोनाच्या तिसर्या आणि चौथ्या लाटांची भीती दाखवत आहे; मात्र भीती दाखवून सरकार सर्व करत असेल, तर हे कुठपर्यंत चालणार ? असा प्रश्नही त्यांनी या वेळी उपस्थित केला. राज्य सरकारला सध्या महानगरपालिकेच्या निवडणुका नकोत. ओबीसी आरक्षणाचे सूत्र पुढे करून निवडणुका पुढे ढकलण्याचा घाट घातला जात आहे, असा आरोपही त्यांनी केला. जनगणना आणि बाकी सर्व गोष्टी झाल्यावर निवडणुका घ्यायला काहीच हरकत नाही, असे मत त्यांनी व्यक्त केले.