शांत, सहनशील आणि प.पू. गुरुदेवांवर दृढ श्रद्धा असणारे नगर येथील ६५ टक्के आध्यात्मिक पातळीचे कै. धनराज विभांडिक !
१४.४.२०२० या दिवशी नगर येथील साधक धनराज विभांडिक यांचे निधन झाले. मृत्यूसमयी त्यांचे वय ६० वर्षे होते. त्यांच्या आजारपणात आणि त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या नातेवाइकांना जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती येथे दिल्या आहेत.
श्रीमती विजया विभांडिक (पत्नी) (६२ टक्के आध्यात्मिक पातळी)
१. आज्ञापालन करणे
‘यजमानांना एखादी गोष्ट सांगितल्यावर ते आनंदाने आणि तत्परतेने ती गोष्ट पूर्ण करायचे. ते त्यांना सांगितलेले नामजपादी उपाय पूर्ण करायचे आणि आम्हालाही त्याची वेळोवेळी आठवण करून द्यायचे.
२. प्रेमभाव
ते सतत इतरांसाठी झटायचे. ते सर्वांशी प्रेमाने बोलायचे. त्यामुळे ते सर्वांना हवेहवेसे वाटायचे.
३. सतत वर्तमानकाळात रहाणे
आजपर्यंत यजमानांनी कधीच भूतकाळ आणि भविष्यकाळ यांचा विचार केला नाही. ‘आज मी काय करणे अपेक्षित आहे ?’, अशी ते देवाला प्रार्थना करत असत.
४. प.पू. गुरुदेवांवर दृढ श्रद्धा असणे
यजमानांना कितीही अडचणी असल्या किंवा शारीरिक त्रास होत असला, तरी ते नेहमी म्हणायचे, ‘‘प.पू. गुरुदेव आहेत ना ! ते सर्व चांगलेच करणार आहेत.’’ त्यांच्या तोंडी सतत गुरुदेवांचे नाव असायचे. प.पू. गुरुदेवांचे नाव घेतले, तरी त्यांची भावजागृती होत असे. त्यांना होणारे शारीरिक त्रास किंवा साधनेसाठी नातेवाइकांकडून होणारा विरोध ते प.पू. गुरुदेवांच्या कृपेने सहन करू शकले.
५. अनुभूती
५ अ. मंत्रोपचार करतांना यजमान प.पू. गुरुदेवांच्या मांडीवर झोपलेले दिसून यजमानांच्या जवळ श्रीकृष्ण, श्री दत्तगुरु आणि शिव-पार्वती यांचे दर्शन होणे : यजमानांचे निधन झालेल्या दिवशी सकाळी मी यजमानांसाठी परात्पर गुरु पांडे महाराज यांनी पूर्वी सांगितलेले मंत्रोपचार करत होते. त्या वेळी ते भावपूर्ण अन् एकाग्रतेने होत होते. तेव्हा मला दिसले, ‘यजमान प.पू. गुरुदेवांच्या मांडीवर झोपले आहेत. श्रीकृष्णाने त्याचा हात यजमानांच्या हृदयावर ठेवला आहे. श्री दत्तगुरूंनी त्यांच्या कमंडलूतील तीर्थाने यजमानांचे पूर्ण शरीर पुसले आणि त्यांना तीर्थ दिले. शिव आणि पार्वती यांनी यजमानांच्या गळ्यात हार घालून त्यांच्या हृदयाच्या स्थानी पुष्पे अर्पण केली.’
प्रत्यक्षातही श्री दत्तक्षेत्री नेवासा येथे प्रवरा आणि गोदावरी या नद्यांच्या संगमावर शिवमंदिराजवळ यजमानांच्या अस्थींचे विसर्जन करण्यात आले.
५ आ. यजमानांच्या निधनानंतर त्यांचे १३ व्या दिवसाचे विधी झाल्यानंतर मी नामजप करत असतांना मला ‘एक पांढराशुभ्र गोळा सरळ रेषेत पुढे पुढे जात आहे अन् सभोवती देवता उभ्या आहेत’, असे दिसले.’
कु. सोनल विभांडिक (मोठी मुलगी)
१. परात्पर गुरु पांडे महाराज यांनी पूर्वी सांगितलेले मंत्रोपचार केल्याने वडिलांच्या रोगाचे निदान होणे
‘बाबांना श्वास घ्यायला त्रास होत असे; पण ‘त्यांना हा त्रास कशामुळे होत आहे ?’, हे लक्षात येत नव्हते. त्यामुळे त्यांच्यावर औषधोपचार करता येत नव्हते अन् त्यांचा त्रासही न्यून होत नव्हता. परात्पर गुरु पांडे महाराज यांनी पूर्वी सांगितलेले मंत्रजप करू लागल्यावर २ दिवसांतच त्यांच्या रोगाचे निदान झाले.
२. बाबांना शारीरिक त्रास होत होते, तरी ‘ते आनंदी आहेत’, असे वाटत होते.
३. आधुनिक वैद्यांनी साधिकेच्या वडिलांच्या सहनशीलतेचे कौतुक करणे
बाबा रुग्णालयात असतांना आधुनिक वैद्य आम्हाला म्हणाले, ‘‘तुमचे बाबा शांत आणि सहनशील आहेत. असा त्रास असणारे अनेक रुग्ण आम्ही पाहिले आहेत. त्या रुग्णांनी आम्हाला त्रास दिला. तुमच्या वडिलांचे प्राण जातांना आम्हाला कळलेही नाही. तुम्ही पुष्कळ भाग्यवान आहात !’’ तेव्हा ‘बाबा सतत प.पू. गुरुदेवांच्या स्मरणात असल्यामुळेच ते सर्व सहन करू शकले’, असे माझ्या लक्षात आले.
४. वडिलांच्या मृत्यूनंतर आलेल्या अनुभूती
४ अ. वडील प.पू. गुरुदेवांशी बोलत असल्याचे दृश्य दिसणे : बाबांचे निधन झाल्यावर ‘ते प.पू. गुरुदेवांजवळ बसून बोलत आहेत. ते गुरुदेवांना ‘काय काय झाले ?’, याविषयी सांगत आहेत’, असे दृश्य मला दिसायचे. ‘ते दृश्य पहात रहावे’, असे मला वाटायचे.
४ आ. वडिलांच्या अस्थींचे विसर्जन होत असतांना ते आनंदाने हसत असल्याचे दिसणे : बाबांच्या अस्थींचे विसर्जन करत असतांना ‘बाबा नदीकिनारी उभे आहेत. त्यांच्या गळ्यात फुलांची माळ आहे आणि ते माझ्याकडे पाहून हसत आहेत’, असे मला दिसले. प्रत्यक्षातही अस्थीविसर्जन करतांना माझा लहान भाऊ व्यंकटेश आणि रामेश्वरदादा (साधक) हात जोडून उभे असतांना त्यांनाही ‘बाबा आनंदाने हसून त्यांच्याकडे पहात आहेत’, असे जाणवले.’
श्री. व्यंकटेश विभांडिक (लहान मुलगा)
१. बाबांचे पार्थिव स्मशानभूमीत आणल्यावर मला शांत वाटले आणि माझा नामजप आपोआप चालू झाला. मला स्मशानात शांती आणि चैतन्य जाणवले.
२. बाबांच्या पार्थिवाला अग्नी दिल्यावर ‘परात्पर गुरु डॉक्टर बाबांना दोन्ही हातांत घेऊन वरच्या दिशेने जात आहेत’, असे मला जाणवले.
३. नगरपासून ७० कि.मी. अंतरावर श्री दत्तक्षेत्री देवगड नेवासा येथील गोदावरी आणि प्रवरा नदीच्या संगमावर वडिलांच्या अस्थींचे विसर्जन केले. तेव्हा ‘बाबा गोदावरी नदीत लीन होत आहेत’, असे मला जाणवले.’
कृतज्ञता
‘हे गुरुमाऊली, आपल्या कृपेमुळे आम्ही सर्व जण या कठीण प्रसंगात स्थिर राहू शकलो. यापुढेही वडिलांकडून आपल्याला अपेक्षित अशी साधना करवून घ्या. त्यांच्याकडून आम्हा सर्वांना जे शिकायला मिळाले, ते कृतीत आणण्यासाठी आमच्याकडून प्रयत्न करवून घ्या. गुरुदेवा, आम्ही सर्व जण आपल्या चरणी कृतज्ञ आहोत.’
– विभांडिक कुटुंबीय, नगर (३०.४.२०२०)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |