तालिबान्यांची तुलना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी करणे, हा सुनियोजित षड्यंत्राचा भाग वाटतो !
जावेद अख्तर यांच्या टीकेला आमदार नीतेश राणे यांचे उत्तर !
मुंबई – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी तालिबान्यांची तुलना करतांना तुम्ही तालिबानी प्रवक्त्यासारखी भूमिका घेत आहात. यातून कूटनीती दिसून येते. हे एका सुनियोजित षड्यंत्राचा भाग वाटत आहे, अशी शंका भाजपचे आमदार नीतेश राणे यांनी ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांच्याविषयी व्यक्त केली आहे. जावेद अख्तर यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत देतांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदु परिषद आणि बजरंग दल या हिंदुत्वनिष्ठ संघटनांची तुलना तालिबान्यांशी केली होती. त्यावर आमदार नीतेश राणे यांनी पत्राद्वारे उत्तर दिले आहे. या पत्रात राणे यांनी जावेद यांना सार्वजनिक व्यासपिठावर चर्चा करण्याचे आव्हान दिले आहे.
My open letter to @Javedakhtarjadu
I am giving u 1 week’s ultimatum: either u decide a public platform or Newsroom to have a debate to justify what u have said,v are ready to ans all ur hatred n misconceptions or otherwise u release an unconditional apology to all Hindus. pic.twitter.com/pmTaASg2Q8— nitesh rane (@NiteshNRane) September 6, 2021
याला उत्तर देतांना आमदार नीतेश राणे म्हणाले,
१. आजवर मोगल-अफगाणी अशा अनेक परकीय आक्रमणांचे दाह या भारतमातेने सहन केले आहेत. हिंदु धर्म, हिंदु संस्कृती आणि धर्मस्थळे यांवर वारंवार आक्रमणे करून ती नष्ट करण्याचा प्रयत्न झाला, तरीही विशाल हृदय दाखवत आक्रमणकर्त्यांनाही भारतभूमीने सामावून घेतले. त्यांच्या कलाकृती, साहित्य, संस्कृती यांचे जतन आणि संवर्धन केले. त्यामुळेच आज या देशात अनेक पंथ, धर्म, संस्कृती आणि भाषा वाढल्या आणि नांदल्या. धर्मविस्ताराच्या नावाखाली तलवारीच्या जोरावर एकाही हिंदु राजाने कुठल्याही देशावर आक्रमण केले नाही.
२. या देशात रहाणारा कुणीही या देशाला स्वत:ची मातृभूमी समजून प्रेम करत असेल, येथील संस्कृतीशी एकरूप झाला असेल, तो आमच्यासाठी हिंदु आहे, मग त्याचा धर्म आणि उपासनापद्धती कोणतीही असो. हीच समरसतेची विचारधारा आणि पद्धती राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आहे.
३. ‘इस्लामोफोबिया’, द्वेष, ‘राईटविंग’, ‘फॅसिझम’ असे शब्द प्रसिद्धीमाध्यमांपुढे वारंवार वापरून केवळ चर्चेत रहायचे आणि सामान्य मुसलमान तरुणांमध्ये द्वेष पसरवायचा; असे करतांना तुम्ही मुसलमानांचा सामाजिक आणि आर्थिक स्तर उंचवण्यासाठी काय केले ?
४. वृत्तवाहिनीवरील चर्चेत तुम्ही म्हणालात की, ज्या अमानुष पद्धतीने तालिबानी स्त्रियांना वागवतात, त्याच पद्धतीने हिंदूही स्त्रियांना वागवतात. तुमच्या या अज्ञानावर मला दया येते. आम्ही हिंदु स्त्रीशक्तीचा आदर आणि सन्मान करतो. त्यांची देवींच्या स्वरूपात पूजा करून नतमस्तकही होतो. तुम्ही तुमच्या संपूर्ण आयुष्यात मुसलमान महिलांना गुलामासारखी वागणूक देणार्या ‘ट्रीपल तलाक’ सारख्या वाईट परंपरेवर बोलण्याचे धाडस केले नाही, यावरून तुम्हाला महिलांच्या हक्कांविषयी किती आदर आहे ? हे कळून येते.