‘ऑनलाईन’ माध्यमातून आर्थिक फसवणूक करणार्या १४ जणांना झारखंडमधून अटक
देहलीच्या सायबर पोलिसांची मोठी कारवाई
देहली – देहली पोलिसांच्या ‘सायबर सेल’ने झारखंडच्या जामताडा येथून लोकांची ‘ऑनलाईन’ माध्यमांतून आर्थिक फसवणूक करणार्या १४ गुन्हेगारांना अटक केली आहे. यात मुख्य सूत्रधार अल्ताफ आणि गुलाम अन्सारी यांचाही समावेश आहे. रांचीपासून २०० किलोमीटर अंतरावर असलेले जामताडा हे देशातील सायबर गुन्हेगारीचे मोठे केंद्रबिंदू बनले होते. ‘ऑनलाईन’ सायबर गुन्हे करणार्या गुन्हेगारांच्या विरोधात देहली पोलिसांनी एक अभियान चालू केले आहे. या अंतर्गत ही कारवाई करण्यात आली.
१. सायबर सेलचे पोलीस उपायुक्त अन्येश रॉय यांनी या प्रकरणी सांगितले, ‘‘आम्ही ‘सायबर प्रहार भाग-२’ अभियान चालू केले आहे. या अंतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. हे गुन्हेगार मुख्यत: ऑनलाईन प्रणालीशी संबंधित फसवणूक करत होते. आरोपी ‘केवाय्सी’ (खातेदारांच्या कागदपत्रांची पूर्ण माहिती घेण्यासाठीची पद्धत) पूर्ण न झाल्याने भ्रमणभाषचे सिम कार्ड बंद होण्याचा शेवटी दिनांक लक्षात घेऊन किंवा बँक खाते बंद करण्याच्या निमित्ताने ऑनलाईन प्रणालीच्या माध्यमातून पैसे भरण्यास सांगत होते.’’
२. रॉय यांनी सांगितले की, पूर्वी हे आरोपी लोकांना भ्रमणभाष करून त्यांच्याकडे बँकेची विस्तृत माहिती मागत होते. आता ते ‘गूगल’वर एक तात्पुरते संकेतस्थळ बनवतात आणि छोटे अनेक संदेश पाठवून आर्थिक फसवणूक करतात. अटक करण्यात आलेल्या १४ आरोपींवर ९ राज्यांमध्ये ३६ गुन्हे नोंद आहेत. त्यांनी या प्रकरणी १ कोटी रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक केली आहे. (एवढे सर्व होईपर्यंत पोलीस झोपले होते का ? पोलिसांना याचा थांगपत्ता न लागणे, हे पोलिसांना लज्जास्पद ! – संपादक)
३. हे लोक प्रतिदिन ४०० ते ५०० लोकांना दूरभाष करत होते. त्यातील ४ ते ५ जण त्यांच्या जाळ्यात अडकायचे. आरोपींनी शेकडो बनावट संकेतस्थळे बनवून ठेवली आहेत. त्या माध्यमातून त्यांनी लोकांना फसवले आहे.
४. अन्येश रॉय यांनी सांगितले की, या ‘रॅकेट’चे मुख्य सूत्रधार अल्ताफ अन्सारी उपाख्य रॉक स्टार आणि गुलाम अन्सारी उपाख्य मास्टरजी आहे. अल्ताफजवळ मोठ्या संख्येने ‘कॉलर’ आहेत. ते लोकांना दूरभाष करायचे. अल्ताफ ‘विज्ञापनाची मोहीम’ चालवण्यासाठी प्रतिदिन ४० ते ५० सहस्र रुपये देत होता.
५. यापूर्वी राजस्थान पोलिसांच्या एका ज्येष्ठ अधिकार्याच्या खात्यातून मोठी रक्कम फसवून घेण्यात आल्याप्रकरणी जामताडा येथील सायबर गुन्हेगारांपैकी एकाला १४ लाख रुपयांच्या रोख रकमेसह मोबाईल सिम कार्ड आणि अनेक बँक खात्यांसह अटक केली होती.