मातृभाषेतून शिक्षण दिल्यास मुलांच्या व्यक्तीमत्त्वाचा विकास होऊ शकतो ! – रंजीत वडियाला, इतिहास संशोधक
‘तेलुगु भाषादिन महोत्सवा’च्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘भाषेच्या माध्यमातून संस्कृतीचे रक्षण’ या विषयावर ‘ऑनलाईन’ चर्चासत्राचे आयोजन
भाग्यनगर (आंध्रप्रदेश) – जागतिकीकरणासाठी इंग्रजी येणे आवश्यक आहे, असे बहुतांश लोकांना वाटते; परंतु ते खरे नाही. जगातील ८० देशांमध्ये मातृभाषेतून शिक्षण दिले जाते. ‘केओएफ् ग्लोबलायजेशन’च्या सूचीप्रमाणे (वर्ष २०१८) पहिल्या ५० देशांमधील ४८ देशांमध्ये मातृभाषेतूनच व्यवहार चालतो. मातृभाषेतून शिक्षण दिले, तरच व्यक्तीमत्त्व विकास होऊ शकतो, याकडे सरकारने लक्ष दिले पाहिजे. मातृभाषेतून शिक्षण दिल्यामुळे मुले चांगल्या पद्धतीने शिकू शकतात. त्यामुळे त्यांची शिक्षणातील फलनिष्पत्तीही चांगली असते. इंग्रजी माध्यमातून शिकवणारे शिक्षक कितीही चांगले असले; पण विद्यार्थ्यांनाच जर इंग्रजी कळत नसेल, तर त्या शिकवण्याला काही अर्थ रहात नाही, असे प्रतिपादन इतिहास संशोधक श्री. रंजीत वडियाला यांनी केले. ‘तेलुगु भाषादिन महोत्सवा’च्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘भाषेच्या माध्यमातून संस्कृतीचे रक्षण’ या विषयावर ‘ऑनलाईन’ चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले. या चर्चासत्रामध्ये समाजसेवक श्री. बी.के.एस्.आर्. अय्यंगार, ‘भगवद्गीता फाऊंडेशन’चे संस्थापक श्री. लक्कावल वेंकट गंगाधर शास्त्री आणि हिंदु जनजागृती समितीचे आंध्रप्रदेश अन् तेलंगाणा समन्वयक श्री. चेतन गाडी यांनी सहभाग घेतला. या वेळी समाजसेवक श्री. बी.के.एस्.आर्. अय्यंगार यांनी तेलुगु भाषेचा इतिहास आणि तिचे वैभव यांविषयी माहिती दिली.
तेलुगु भाषा मृतप्राय होत चालली आहे ! – लक्कावल वेंकट गंगाधर शास्त्री, संस्थापक, भगवद्गीता फाऊंडेशन
तेलुगु भाषा मृतप्राय होत चालली आहे. आपण तेलुगु भाषेचे रक्षण करण्यात अयशस्वी ठरलो आहोत. आपण तेलुगुमध्ये एक वाक्य बोललो, तर त्यात २ ते ३ शब्द हे इंग्रजी असतात, अशी आपली स्थिती आहे.
हिंदु राष्ट्रामध्येच मातृभाषेचे रक्षण शक्य ! – चेतन गाडी, आंध्रप्रदेश अन् तेलंगाणा समन्वयक, हिंदु जनजागृती समिती
स्वभाषाभिमानाने राष्ट्राभिमान वाढतो. आज लोकांमध्ये भाषाभिमान नसल्यामुळे राष्ट्राभिमान नाही. भारत धर्मनिरपेक्ष असल्यामुळे मातृभाषेला राजाश्रय मिळत नाही. इंग्रजी भाषेच्या अत्याधिक वापरामुळे आपण आजही इंग्रजांचे नोकर आहोत. इंग्रजी भाषेमुळे भारतात विदेशी संस्कृती मोठ्या प्रमाणात प्रचलित आहे. केवळ हिंदु राष्ट्रामध्येच मातृभाषेचे रक्षण शक्य आहे. त्यामुळे भारताला हिंदु राष्ट्र बनवणे आवश्यक आहे.