कीर्तनसेवा करून समाजात भक्ती रुजवणारे पू. (ह.भ.प.) कै. सखाराम बांद्रे महाराज यांच्या देहत्यागाच्या संदर्भातील ज्योतिषशास्त्रीय विश्लेषण !
१. देहत्यागाच्या वेळची कुंडली
‘पू. (ह.भ.प.) कै. सखाराम बांद्रे महाराज यांनी २४.८.२०२१ च्या उत्तररात्री १२.१५ वाजता देहत्याग केला. त्या वेळचे ज्योतिषशास्त्रीय विश्लेषण पुढे दिले आहे. व्यक्तीच्या मृत्यूच्या वेळी मांडलेल्या कुंडलीवरून मृत्यूत्तर गती आणि आयुष्यात केलेल्या कर्मांचाही बोध होतो.
२. ज्योतिषशास्त्रीय विश्लेषण
२ अ. पू. (ह.भ.प.) बांद्रे महाराज यांची साधना चांगली असल्याविषयी दर्शवणारा योग : कुंडलीत प्रथम स्थानाचा स्वामी (लग्नेश) शुक्र ग्रह पंचम स्थानात आहे. पंचम हे शुभ स्थान असून उपासनेशी संबंधित आहे. हा योग पू. (ह.भ.प.) बांद्रे महाराज यांची साधना चांगली असल्याचे दर्शवतो.
२ आ. विवेक, त्याग आणि सदाचरण ही वैशिष्ट्ये दर्शवणारा योग : कुंडलीत पंचम स्थानातील शुक्र आणि नवम स्थानातील शनि यांमध्ये ‘नवपंचम’ हा शुभयोग आहे. हा योग असल्यास व्यक्ती विवेकी, त्यागी आणि सदाचरणी असते.
२ इ. देवाप्रती उत्कट भाव दर्शवणारा योग : कुंडलीत चंद्र आणि शुक्र यांचा प्रतियोग आहे, म्हणजे ते एकमेकांच्या समोर आहेत. चंद्र आणि शुक्र हे जलतत्त्वाचे ग्रह असल्याने हा योग पू. महाराजांमध्ये देवाप्रती उत्कट भाव असल्याचे दर्शवतो. पू. महाराजांनी कीर्तनाच्या माध्यमातून समाजामध्ये भावभक्तीचे बीज रोवले.
२ ई. अंत:स्फूर्तीशी संबंधित योग : कुंडलीत चंद्र आणि नेपच्यून यांची युती आहे. हा योग अंत:स्फूर्तीचा कारक आहे. पू. महाराजांना पहाटेच्या वेळी देवाकडून ज्ञानाची प्राप्ती होत असे.
२ उ. ‘समाजाला साधनेस प्रवृत्त करणे’, हेच मुख्य कर्म असणे : कुंडलीत गुरु ग्रह दशम स्थानात आहे. गुरु ग्रह ज्ञानाचा कारक असून दशम स्थान कर्माशी संबंधित आहे. पू. महाराजांना देवाकडून मिळणारे ज्ञान ते कीर्तनाच्या माध्यमातून समाजापर्यंत पोचवत. ‘समाजाला साधनेस प्रवृत्त करणे’, हेच त्यांचे मुख्य कर्म होते. देवाकडून मिळणारे ज्ञान त्यांनी २६ वह्यांमध्ये लिहून ठेवले आहे. या ज्ञानावर आधारित ग्रंथांचे प्रकाशन ‘सनातन संस्था’ लवकरच करणार आहे. त्यामुळे समष्टीला व्यापक स्तरावर या ज्ञानाचा लाभ होणार आहे.
२ ऊ. पू. महाराजांना उच्च लोकात स्थान प्राप्त होणे : ‘लग्नेश (शुक्र) पंचम स्थानात असणे’, ‘नवमेश (शनि) नवम स्थानात असणे’ आणि ‘गुरु ग्रह दशम (कर्म) स्थानात असणे’ हे आध्यात्मिक योग देहत्यागानंतर पू. महाराजांना उच्च लोकात स्थान प्राप्त झाल्याचे दर्शवतात.’
– श्री. यशवंत कणगलेकर, ज्योतिष विशारद, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२७.८.२०२१)