नागपूर येथे शिवसैनिकांकडून महापालिका कार्यालयाची तोडफोड !
रस्त्यावर पाणी साचण्यास उत्तरदायी असणारे कंत्राटदार आणि याकडे कानाडोळा करणारे महापालिकेचे दोषी अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशी जनतेची अपेक्षा आहे. – संपादक
नागपूर – रस्त्यावर पाणी साचल्याने राष्ट्रसंत नगरमध्ये रहाणार्या जान्हवी चिंचुलकर (वय १७ वर्षे) तरुणीला रुग्णालयात नेण्यास विलंब झाल्याने तिचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूला महानगरपालिका उत्तरदायी आहे, असा आरोप करत शिवसेनेच्या वतीने शिवसैनिकांनी हनुमाननगर झोनच्या कार्यालयात तोडफोड केली.
जान्हवी चिंचुलकर हिची प्रकृती ३१ ऑगस्टच्या रात्री बिघडल्याने तिला रुग्णालयात न्यायचे होते; पण त्या परिसरात सर्वत्र पाणी साचले असल्याने रुग्णवाहिका जाऊ शकत नव्हती. या वेळी रुग्णालयात नेण्यासाठी रस्त्याची अडचण सध्याच्या नाल्यामुळे उपस्थित झाली होती. या घटनेविषयी कळताच परिसरातील नागरिक संतप्त झाले. यानंतर शिवसैनिकांनी महापालिकेच्या हनुमाननगर झोनमधील साहित्याची तोडफोड केली. राष्ट्रसंत नगरपरिसरात एका वास्तुविशारदने नाल्याचे पाणी सोडले आहे. यामुळेच या भागात पाणी साचण्याची समस्या उद्भवली आहे. संबंधित कंत्राटदारावरही मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करावा, तसेच मुलीच्या कुटुंबाला आर्थिक साहाय्य करावे. ज्या नाल्यामुळे हा पाणी साचण्याचा प्रश्न उद्भवला आहे, त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे.