‘ऑनलाईन साधना सत्संग’ घेण्याची सेवा करतांना वाराणसी सेवाकेंद्रातील साधिकांना शिकायला मिळालेली सूत्रे
१. कु. मधुलिका शर्मा (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के)
१ अ. ‘ऑनलाईन साधना सत्संग’ घेण्याच्या सेवेमुळे अभ्यास करण्याची तळमळ निर्माण होऊन आत्मविश्वास वाढणे : पूर्वी सत्संग घेण्याची सेवा करतांना माझा आत्मविश्वास अल्प असायचा. दळणवळण बंदीच्या कालावधीत माझ्यात सत्संगाचा अभ्यास करण्याची तळमळ निर्माण झाली. ‘जिज्ञासूंच्या स्थितीचा विचार करून सूत्रे कशी सांगायची ?’, हे माझ्या लक्षात आले. आता माझा आत्मविश्वास काही प्रमाणात वाढला आहे. सत्संग घेतांना आता मला स्वतःचे भान रहात नाही. ‘सत्संगाचा अभ्यास करणे आणि सत्संग घेणे’, यांतील भेद माझ्या लक्षात येतो. ‘गुरुतत्त्वाच्या माध्यमातून सत्संग घेतला जात आहे’, याची प्रचीती येऊन मला पुष्कळ कृतज्ञता वाटते. परात्पर गुरुदेवांची प्रीती आणि कृपा यांमुळेच मला ही सेवा करण्याची संधी मिळाली. त्याबद्दल मी त्यांच्या विश्वव्यापक चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.
२. सौ. सानिका संजय सिंह
२ अ. सेवेमुळे स्वतःचे विचार आणि कृती यांत व्यापकता येऊन कृतज्ञताभावात वाढ होणे : ऑक्टोबर २०२० मध्ये परम कृपाळू परात्पर गुरुदेवांच्या कृपेने चालू झालेल्या ‘ऑनलाईन’ साधना सत्संगा’त मला विविध प्रकारच्या सेवा मिळाल्या. त्यामुळे मला आनंद झाला आणि स्वतःतील ‘नियोजनाचा आणि गांभीर्याचा अभाव’ या स्वभावदोषांमुळे भीतीही वाटली. या सेवेच्या माध्यमातून माझ्यात पालट झाले. माझ्यातील संकुचितपणा न्यून होऊन साधकांच्या सुविधेचा विचार होऊ लागला. ‘साधकांचे शंका-समाधान करण्यासाठी अभ्यास करणे आणि इतरांना विचारणे’, यांतून मला आनंद मिळाला. ‘एखादे नवीन सूत्र समजल्यावर किंवा एखादी चूक झाल्यावर त्यातून इतरांना शिकायला मिळावे’, या दृष्टीने सर्व सांगण्याचे प्रयत्न होऊ लागले. अभ्यास करतांना साधनेचे दृष्टीकोन आणि धर्मशास्त्राची माहिती मिळते अन् ‘परात्पर गुरुदेव आपल्याला किती भरभरून देत आहेत’, असा विचार येऊन मन कृतज्ञतेने भरून येते. सत्संगात सूत्रे सांगत असतांना अनेक वेळा माझे मन परात्पर गुरुदेवांच्या चरणी शरणागत होते. सत्संग घेतांना आणि अभ्यासवर्गात विषय मांडतांना मनात आनंदाचे तरंग अनुभवायला मिळतात.
हे परात्पर गुरुदेवा, आपली अनंत कृपा आणि प्रीती यांमुळेच या सेवेची संधी मिळाली आहे. या सेवेच्या माध्यमातून ‘आपल्याला अपेक्षित असे मला घडवावे’, अशी आपण कृपा करावी.
हो जाए तन-मन-बुद्धि का पूर्ण समर्पण ।न कोई अनुभव, न कोई ज्ञान । हो जाए तन-मन-बुद्धि का पूर्ण समर्पण । |
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |