काणकोण तालुक्यात मुसळधार पावसामुळे पूरसदृश स्थिती
पैंगीण-गालजीबाग मार्ग पाण्याखाली
काणकोण, ५ सप्टेंबर (वार्ता.) – काणकोण तालुक्यात ४ सप्टेंबरच्या रात्री मुसळधार पाऊस पडल्याने तालुक्यात अनेक ठिकाणी पूरसदृश स्थिती निर्माण झाली आहे. पैंगीण येथील आदिव्हाळ नदी दुथडी भरून वहात आहे. पैंगीण-गालजीबाग मार्ग पाण्याखाली गेल्याने काही काळ रस्त्यावरील वाहतूक बंद ठेवण्यात आली. या ठिकाणी वर्ष २००९ मध्ये पुराच्या पाण्यात वाहून दोघांचा मृत्यू झाला होता. आदिव्हाळ येथे पाण्याचा विसर्ग सुरळीत होण्यासाठी हल्लीच लाखो रुपये खर्चून नाल्याचा गाळ उपसण्यात आला आहे, तर नाल्याचे बांधकाम करून नाल्याची रूंदीही वाढवण्यात आली आहे; मात्र तरीही अभियांत्रिकी दोषामुळे पावसाचे पाणी तुंबून रस्ता पाण्याखाली गेला, असे स्थानिकांचे मत आहे.
काणकोण येथे २४ घंट्यांत ४.३३ इंच पाऊस
काणकोण येथे मागील २४ घंट्यांत ४.३३ इंच पावसाची नोंद झाली. आतापर्यंत काणकोण येथे ११६.८३ इंच पाऊस पडल्याचे जलस्रोत खात्याने सांगितले आहे.
राज्यात ६ ते ८ सप्टेंबरपर्यंत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता ! – हवामान विभाग
पणजी – राज्यात ६ ते ८ सप्टेंबर या कालावधीत मुसळधार पावसाची (ऑरेंज अलर्ट) शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. ९ सप्टेंबर या दिवशीही असाच मुसळधार पाऊस पडणार असल्याचे, तसेच ताशी ४० कि.मी. वेगाने वारे वहाणार असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे.
वास्को मार्केट येथे वर्दळीच्या ठिकाणी मोठे झाड कोसळले
वास्को – येथील ‘संडे मार्केट’जवळील रस्त्यावर गुलमोहराचे मोठे झाड खाली असलेल्या ६ वाहनांवर कोसळले. यामुळे वाहनांना बरीच हानी पोचली. वीजवाहिन्यांसह झाड कोसळल्याने येथील वीजपुरवठा काही काळ खंडित झाला होता. या ठिकाणी चतुर्थीच्या खरेदीच्या निमित्ताने वर्दळ होती; मात्र सुदैवाने यामुळे कुणालाही दुखापत झाली नाही. वास्को अग्नीशमन दलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ५ सप्टेंबर या दिवशी सकाळी ११.३० वाजता ही घटना घडली. याप्रसंगी वास्को नगरपालिकेचे माजी नगरसेवक दाजी साळकर म्हणाले, ‘‘वास्को मार्केट परिसरात अनेक धोकादायक झाडे आहेत. नागरिकांच्या सुरक्षेसाठी अनेकदा विनंती करूनही ती कापली जात नाहीत.’’ (मुरगाव नगरपालिका प्रशासन दुर्घटना घडायची वाट पहात आहे का ? धोकादायक झाडे कापायची विनंती करूनही ती न कापल्याने होणार्या हानीस संबंधित अधिकार्यांना उत्तरदायी ठरवून कारवाई करायला हवी ! – संपादक)