उपजतच ईश्वराची ओढ असणारे आणि निरपेक्षपणे लोकांना भक्ती करायला शिकवणारे पूज्य (ह.भ.प.) कै. सखाराम बांद्रे महाराज !
निवळी (तालुका चिपळूण, जिल्हा रत्नागिरी) येथील पूज्य (ह.भ.प.) सखाराम बांद्रे महाराज यांनी २४.८.२०२१ च्या उत्तररात्री देहत्याग केला.
६.९.२०२१ या दिवशी त्यांच्या देहत्यागानंतरचा १३ वा दिवस आहे. त्या निमित्ताने महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या ६७ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. प्रियांका लोटलीकर यांनी पूज्य (ह.भ.प.) बांद्रे महाराज यांच्याशी त्यांचा साधनाप्रवास आणि त्यांचे भाऊ ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. शिवराम बांद्रे यांच्याशी केलेला वार्तालाप पुढे दिला आहे.
१. लहानपणापासूनच कुणीही न सांगता ईश्वराविषयी श्रद्धा आणि प्रेम निर्माण होणे
कु. प्रियांका लोटलीकर : तुम्ही लहानपणापासून कशा प्रकारे साधना केली ?
पू. बांद्रे महाराज : आमच्या घरात सर्वांनाच देवाची आवड होती. लहानपणापासूनच मला भजन-पूजन, मंदिरात जाणे यांविषयी कुणीही काहीही न सांगता मला ईश्वर आवडायचा. मला देवतांची चित्रे आवडायची. त्या वेळी मुंबईत रविवारी दुकाने बंद असतांना काही जण आणि साधू-संत रस्त्यावर देवतांची चित्रे मांडायचे. ती पहाण्यासाठी मी अर्धा घंटा चालत जायचो. पुढे आपोआप ईश्वराविषयी श्रद्धा आणि प्रेम निर्माण झाले.
त्यानंतर सनातन संस्थेचे डोंबिवली येथील साधक श्री. विजय लोटलीकर आमच्या बाजूच्या गल्लीमध्ये रहायला होते. त्यांच्यामुळे माझ्या साधनेला चालना मिळाली. नंतर आमचा (मी आणि माझी पत्नी) भक्तीचा प्रवास गणेश मंदिर, डोंबिवली येथून चालू झाला. ‘इवलेसे रोप लावियेले द्वारी । तयाचा वेलु गेला गगनावरि ।’ म्हणजे ‘गुरुभेट होऊन गुरुमंत्राची दीक्षा हे जणू इवलेसे रोप संत ज्ञानेश्वर महाराज यांना मिळाले. नित्यनेमाने आणि भक्तीभावाने नियमित उपासना केल्यावर त्याचा एवढा विस्तार झाला की, तो वेल गगनापर्यंत जाऊन पोचला.’ (छोट्याशा गुरुमंत्राने कुंडलिनीचक्र जागृत होऊन तिचा प्रवास गगनाच्या, म्हणजेच सहस्राराच्या दिशेने झाला.) त्याचप्रमाणे पुढे माझ्या साधनेत वाढ होत गेली.
२. ‘डोंबिवलीत लहान असतांना वडिलांच्या समवेत पू. बांद्रे महाराज यांच्या घरी जाणारी प्रियांका आज त्यांच्याशी वार्तालाप करणे’, हे परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे नियोजन असल्याचे पू. बांद्रे महाराज यांनी सांगणे
पू. बांद्रे महाराज : डोंबिवली येथे असतांना श्री. लोटलीकर त्यांची मुलगी कु. प्रियांका लोटलीकर हिला लहान असतांना आमच्या घरी आणायचे. ‘इतक्या वर्षांनी आपली अशी भेट होईल’, हे तुम्हाला (प्रियांकाताईंना) ठाऊक होते का ? परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांनी त्या वेळीच ‘प्रियांका पुढे माझ्याशी साधनेच्या प्रवासाविषयी बोलणार आहे’, हे ध्वनीमुद्रित करून ठेवले होते. देवाचा चमत्कारच आहे हा ! हे गुरूंचे (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे) कार्य आहे, सामान्य व्यक्तीचे काम नाही.
कु. प्रियांका लोटलीकर : हे सर्व विधीलिखितच आहे.
३. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांच्या समाधीच्या ठिकाणी प्रार्थना केल्यावर अखंड महाभारत, रामायण, गीता अन् सर्व संतांचे जीवनचरित्र पू. महाराज यांना मुखोद्गत असणे
पू. बांद्रे महाराज : डोंबिवली येथील गणेश मंदिरामध्ये भागवत सप्ताह होता. तो झाल्यावर मी आळंदीला गेलो आणि तेथे संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांच्या समाधीवर एक दगड आहे, तो मी बाजूला काढला आणि प्रार्थना केली, ‘माऊली, मला प्रवचन पाहिजे. मला तू जे करत होतीस, ते मला जगाला सांगायचे आहे. मला प्रवचन पाहिजे.’ त्या समाधीमध्ये काळोख आहे; परंतु जशी वीज चमकते आणि दिवा लागल्याप्रमाणे प्रकाश होतो, तसा प्रकाश पडला अन् मला प्रोत्साहन मिळाले. मी काही ग्रंथ वाचले होते; परंतु चमत्कार म्हणजे न वाचलेले अखंड महाभारत आज मला मुखोद्गत आहे. अखंड रामायण, गीता आणि सर्व संतांचे जीवनचरित्र मला मुखोद्गत आहे.
४. विठ्ठल-रखुमाईची आवड असल्याने त्यांचे मंदिर बांधतांना सर्वकाही ईश्वरावर सोपवल्याने त्याने साहाय्य करणे
कु. प्रियांका लोटलीकर : महाराज, विठ्ठल-रखुमाई मंदिरच बांधावे, असे तुम्हाला का वाटले ? आणि मंदिराचे कार्य कसे चालते ?
पू. सखाराम बांद्रे महाराज : विठ्ठल-रखुमाईची उपासना करण्याची मला आवड होती. मंदिर बांधण्याची प्रेरणा मला देवानेच दिलेली आहे. त्या वेळी ‘मंदिरासाठी काय घ्यावे?, काय नाही, किती घ्यावे?, टाळ किती घ्यावेत ? वीणा किती घ्याव्यात’, हे सगळे देवच सुचवत होता. मला याविषयी काहीही ज्ञान नसतांना मी जे काही आणले, ते सगळे यथायोग्यच होते. ईश्वरच मला साहाय्य करत होता. मी देवाला सांगायचो, ‘हे कार्य तुझे आहे, मी केवळ तुझा नोकर, श्रीखंड्या (सेवेकरी) आहे.’ ‘संत एकनाथ महाराज यांच्या घरी भगवंताने पाणी भरले, तसे सगळे देव करणार आहे’, हे मला ठाऊक असल्याने मी कधीही काळजी केली नाही. मंदिरामध्ये वर्षातून दोन वेळा आषाढी आणि कार्तिकी एकादशीला मोठे कार्यक्रम असतात. त्या कार्यक्रमांमध्ये अन्नदान असते.
५. शे-दीडशे सर्पांनी आक्रमण करणे, आई-वडिलांचे आजारपण आणि पत्नीचे निधन होणे
कु. प्रियांका लोटलीकर : मंदिर बांधतांना तुम्हाला कशा प्रकारे अनिष्ट शक्तींचे अडथळे आले ?
पू. सखाराम बांद्रे महाराज : मंदिर बांधतांना मला १० वर्षे भयंकर अडथळे आणि मोठी संकटे आली. शे-दीडशे सर्पांनी आक्रमण केले. अनेक मण्यार (विषारी सापाचा प्रकार) अंगावर यायचे. अनेकदा विंचूही त्रास द्यायचे. अनिष्ट शक्तींनी प्राण्यांच्या माध्यमातून त्रास दिला, तसेच वीज गेली आणि बरेच दिवस ती आली नाही, असा अनुभवही सहस्र वेळा आला. त्यातच आई आजारी पडली, वडिलांना कर्करोग झाला आणि पत्नी ४२ वर्षांची असतांना तिचे निधन झाले, अशी अनेक संकटे हात धुऊन माझ्या पाठीशी लागली.
६. अनिष्ट शक्तींनी मनुष्याचे रूप घेऊन भयंकर त्रास देणे
कु. प्रियांका लोटलीकर : ‘व्यक्तींच्या माध्यमातून कुणी त्रास दिला’, असे कधी झाले आहे का ?
पू. सखाराम बांद्रे महाराज : हो. भयंकर. अर्धे मंदिर आणि घराचे थोडे काम झाले. त्यानंतर विहिरीचे काम चालू असतांना बांधकामाच्या ठिकाणी लोकांनी कुंपणेच घातली. त्या वेळी डोंबिवलीला मुलांकडे लक्ष द्यावे लागायचे आणि गावीही लक्ष द्यायला लागायचे. कुंपण घातल्याने मी सिमेंट इत्यादी साहित्य आणणार कुठून ? जेव्हा आपण लोकांच्या हिताचे काम करायला घेतो, तेव्हा अनिष्ट शक्ती मनुष्याचे रूप घेऊनही भयंकर त्रास देतात. परात्पर गुरु आठवले सांगतात, ‘अनिष्ट शक्ती आहेत’, ते मी अनुभवले. ‘अनिष्ट शक्ती माणसांचे किती हाल करू शकतात आणि कशा प्रकारे त्रास देऊ शकतात’, याचा प्रत्यक्ष अनुभव मी घेतला. त्यातून ‘अनिष्ट शक्ती आणि पितर आहेत’, हे सिद्ध होते. ती अंधश्रद्धा नाही.
७. तीन वेळा विविध रंगांत सुदर्शनचक्र दिसणे
कु. प्रियांका लोटलीकर : तुम्हाला आलेल्या काही चांगल्या अनुभूतींविषयी सांगा.
पू. बांद्रे महाराज : एकदा मी रात्री २ वाजता उठलो. तेव्हा मला २ झाडांमध्ये पिवळ्या, निळ्या आणि हिरव्या रंगांचे चक्र दिसले. मोठे बैलगाडीचे चाक असते, तसेच ते होते. त्या वेळी माझ्या मनात विचार आला, ‘धुके आले की, चंद्राला खळे पडते. तसे खळे पडले असेल. झाडाच्या मागे बघायला गेलो, तर चंद्रावर खळे पडलेले नव्हते. मी हात जोडून सकाळपर्यंत बसून राहिलो. तेव्हा माझ्या लक्षात आले की, मला भगवान श्रीकृष्णाच्या सुदर्शनचक्राचे दर्शन झाले. दुसर्या दिवशीही रात्री मी अंगणात केळीच्या झाडावर पाहिले, तर मला पुन्हा तसेच सुदर्शनचक्र दिसले. असे तीन वेळा मला सुदर्शनचक्राचे दर्शन झाले.
८. गावातील लोकांना साधना सांगून त्यांना भक्तीमार्गाकडे वळवणे
कु. प्रियांका लोटलीकर : पू. महाराज निःस्वार्थीपणे सेवा करतात, याचे तुम्हाला काही अनुभव आहेत का ?
श्री. शिवराम बांद्रे (पू. बांद्रे महाराज यांचे भाऊ) : आमच्या गावातील लोकांना सकाळची अंघोळ करणे आणि तुळशीजवळ दिवा लावणे, या साध्या कृतीही ठाऊक नव्हत्या. पू. महाराजांचे वैशिष्ट्य म्हणजे ते आधीपासून आणि आता संत झाल्यावरही मंदिरातील पूजा झाली की, स्वतःहून गावामध्ये जाऊन प्रचार करतात. ‘संध्याकाळी देवाजवळ दिवा लावून हरिपाठ वाचा’, असे सांगतात. पू. महाराजांनी सांगितल्याप्रमाणे लोकांनी तसे केल्यावर बर्याच जणांना त्याचे अनुभवही आले आहेत. आजूबाजूच्या ४ – ५ गावांत काही भक्त मंडळी होती. पू. महाराजांनी त्यांना हळूहळू माहिती सांगून आनंदाने भक्तीमार्गाकडे वळवले.
या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/509006.html