दळणवळण बंदीच्या काळात ‘ऑनलाईन’ ‘नामसत्संग’ चालू करतांना आणि केल्यावर जाणवलेली अपार गुरुकृपा !
कोरोना महामारीमुळे आलेला आपत्काळ आणि त्यामुळे असलेल्या दळणवळण बंदीच्या काळात सर्व व्यवहार अन् दैनंदिन जीवन ठप्प झाले होते. लोक घाबरले होते. त्यांना मानसिक आधाराची आवश्यकता होती. अशा वेळी सनातन संस्थेने ‘ऑनलाईन’ सत्संग चालू केले. ते सत्संग चालू करतांना ‘जणू ती ईश्वरी इच्छा असावी’, अशा प्रकारे सर्व गोष्टी आपोआप जुळून येत गेल्या. सर्व साधकांनीही ‘ही गुरुसेवा गुरुचरणी अर्पण व्हावी आणि परिपूर्ण व्हावी’, यासाठी झोकून देऊन सेवा केल्या. सर्वांच्या सुंदर सहकार्याने हा अनुपम ‘नामसत्संग’ समाजापुढे प्रस्तुत होऊ लागला. आम्हा साधकांनाही त्या सेवेचा पुष्कळ लाभ झाला आणि समाजालाही या सत्संगांमुळे आधार मिळाला. ‘गुरुकृपा कशी कार्य करते ?’, हे यातून आम्हाला शिकायला मिळाले.
या सेवेमुळे साधकांमध्ये संघटितभाव आणि समर्पणभाव निर्माण झाला. अर्थातच सद्गुरु नंदकुमार जाधवकाकांची अपार कृपा, त्यांचे चैतन्य, त्यांनी या सेवेसाठी घेतलेले परिश्रम आणि त्यांची अपरंपार प्रीती यांमुळे या सेवा प्रतिदिन तेवढ्याच उत्साहाने अन् आनंदाने होत गेल्या. श्री गुरुदेवांनी आम्हावर केलेल्या या कृपेसाठी आम्ही निरंतर शरण आणि कृतज्ञ आहोत देवा. फूल नाही; पण फुलाची पाकळी म्हणून आम्हाला या सेवेतून मिळालेला आनंद व्यक्त करण्यासाठी हे शब्द तुमच्या श्री चरणी कृतज्ञताभावाने अर्पण करत आहोत.
१. नामसत्संग आरंभ करणे
१ अ. संत आणि सद्गुरु सेवा करवून घेतील, ‘आपण ही सेवा करायची आहे’, एवढाच विचार असणे : ‘नामसत्संग आरंभ करायचे आहेत’, अशी सूचना मला मिळाली. तेव्हा माझ्या मनात ‘ही गुर्वाज्ञा आहे. संतांची कृपा आहे आणि सद्गुरु जाधवकाका ही सेवा माझ्याकडून करवून घेतील. मी ही सेवा केवळ करायची आहे’, एवढेच विचार होते.
१ आ. सेवाकेंद्रातील सर्व साधकांनी संघटितभावाने सेवा करणे, तेव्हा ‘गुरुदेवांची प्रचंड ऊर्जा आणि सद्गुरूंचे चैतन्य कार्यरत असल्यामुळे अशक्य ते शक्य होत आहे’, असे जाणवणे : ध्वनीचित्रीकरण (शूटिंग), संकलन (एडिटिंग), प्रत्यक्ष प्रक्षेपण (लाइव्ह) या सेवा जळगावमधील ३ साधकांनी सांभाळल्या. हे सर्व अतिशय जलद गतीने चालू होते. केवळ एकाच दिवसात सर्व सिद्धता झाली. तेव्हा ‘कुणीही साधक स्वतःच्या मनानुसार काहीच करत नसून परात्पर गुरुदेवांची प्रचंड ऊर्जा आणि सद्गुरु जाधवकाकांचे चैतन्य यांमुळे सर्व आपोआप होत आहे’, असे मला वाटत होते. सत्संग चालू करायचा आणि दुसर्या दिवशी ‘सेटअप’ लावून त्याची छायाचित्रे पाठवायची होती. तेव्हा सेवाकेंद्रातील सर्व साधकांनी संघटितभावाने ‘सेटअप’ लावला. अशा प्रकारे सत्संग आरंभ झाला. जे सर्वसामान्य स्थितीत सर्वथा अशक्य होते. दळणवळण बंदीच्या काळात सर्वकाही आपोआपच शक्य होत होते.
२. सद्गुरु नंदकुमार जाधवकाका यांचे अनुभवलेले चैतन्य !
२ अ. सद्गुरु जाधवकाकांच्या शब्दांमधील चैतन्य आणि प्रीती यांत साधक अन् दर्शक चिंब भिजत असणे : सत्संगाच्या आरंभी सद्गुरु जाधवकाका निवेदनाला आरंभ करतात. तेव्हा वातावरणात मोठ्या प्रमाणात चैतन्य आणि शक्ती प्रक्षेपित होते. ‘समुद्रात लाटा उसळाव्यात, तसे सद्गुरु जाधवकाकांचे चैतन्य संपूर्ण वातावरणात पसरत आहे’, असे मला जाणवायचे. त्यांची वाणी आकाशवाणीसारखी वाटायची. ‘त्यांच्या शब्दांतून प्रीतीचा वर्षाव होत असून त्यात केवळ साधकच नाही, तर सत्संग पहाणारे दर्शकसुद्धा भिजून चिंब होत आहेत’, असे मला जाणवायचे.
२ आ. सद्गुरु जाधवकाका नामजप करतांना त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात ‘ॐ’चे प्रक्षेपण होणे : सद्गुरु जाधवकाका सत्संगाच्या कालावधीत नामजपासाठी डोळे मिटून जप करतात. तेव्हा ‘त्यांच्याकडून अनेक ‘ॐ’ वातावरणात प्रक्षेपित होत आहेत’, असे जाणवते. यासंदर्भात एक अनुभूती एका दर्शकाला आली. त्यांना ‘सद्गुरु जाधवकाका प्रत्यक्ष बोलत आहेत’, असा ध्वनी ऐकू आला.
२ इ. प्रत्येक सत्संगागणिक सद्गुरु जाधवकाकांचे चैतन्य वाढत चालले असून आता ते एखाद्या ऋषींप्रमाणे भासत असणे : सद्गुरु जाधवकाका अत्यंत तेजस्वी आणि एखाद्या ऋषींसारखे दिसतात. कधी कधी, तर ‘विठ्ठलच सत्संगात येऊन बसला आहे’, असे आम्हाला दिसते. आता ७ मासांनंतर ध्वनीचित्रीकरण करतांना ‘सद्गुरु जाधवकाकांच्या ठिकाणी पुष्कळ प्रकाश दिसतो. ‘त्यांचा तोंडवळा आणि हात अधिक गोरे अन् पारदर्शक होत आहेत’, असे जाणवते. त्यांचे चैतन्य दिवसेंदिवस वाढतच चालले आहे’, असे आम्हा सर्वांना जाणवते.
३. ‘सत्संगांचा समाजाला लाभ व्हावा’, यासाठी सद्गुरु जाधवकाकांची असलेली तळमळ !
३ अ. सत्संगाच्या प्रत्येक संहितेचा सद्गुरु जाधवकाका बारकाईने अभ्यास करत असणे, ‘जनसामान्यांना मार्गदर्शन समजत आहे ना ?’, याची ते निश्चिती करत असणे : सद्गुरु जाधवकाकांची ‘समाजापर्यंत परिपूर्ण, सोप्या आणि सरळ भाषेत ज्ञान पोचले पाहिजे’, अशी तळमळ मला शिकायला मिळाली. ते संहितेतील (स्क्रिप्टमधील) प्रत्येक शब्दाचा अभ्यास करतात. ‘प्रत्येक शब्द दर्शकांना समजत आहे ना ?’, हे ते पहातात. ‘प्रत्येक मार्गदर्शन समाजातील जनसामान्यांना समजावे’, यासाठी ते संहितेत तशी सुधारणाही करतात. यावरून ‘समाजाला साधना समजून त्यांनी साधना आरंभ करायला पाहिजे’, अशी त्यांची तळमळ दिसून येत होती.
३ आ. सद्गुरु जाधवकाकांची हिंदी भाषा फार चांगली असल्यामुळे सत्संगाच्या संहितेतील सुधारणाही तेच सांगत असणे : माझी मातृभाषा हिंदी आहे. मला सद्गुरु जाधवकाकांसह सत्संगाची संहिता पडताळण्याची सेवा असायची. सद्गुरु जाधवकाकांचे हिंदी कुठल्याही मूळ हिंदी भाषिक व्यक्तीपेक्षा अनेक पटींनी चांगले आहे. सद्गुरु जाधवकाकांना हिंदी व्याकरणाचीही माहिती आहे. त्यामुळे संहितेत तेच अधिक वेळा सुधारणा सांगायचे.
३ इ. उत्साही : अनेक वेळा अन्य सेवा किंवा पत्रकार परिषदा असायच्या. त्यामुळे ध्वनीचित्रीकरणाच्या वेळी घाई व्हायची. अशा वेळी संपूर्ण दिवसभरात केवळ ३ – ४ घंटे किंवा अनेकदा यापेक्षाही अल्प वेळ झोप घेऊन सद्गुरु जाधवकाका सेवा करायचे. त्यांच्या उत्साहाला सीमाच नाही.
४. अनुभूती
४ अ. सत्संग सेवेतील साधकांच्या अनुभूती
४ अ १. सद्गुरु जाधवकाकांच्या अस्तित्वाने सत्संग निर्विघ्नपणे पार पडणे : सत्संग, म्हणजे एक सूक्ष्म युद्धच असते. ‘सत्संगात अनेक अडचणी येतात; परंतु सद्गुरु जाधवकाकांच्या अस्तित्वाने सत्संग अत्यंत निर्विघ्नपणे पार पडतो’, हे लक्षात येते.
४ अ २. संपूर्ण वर्षभराच्या कालावधीत सहसाधकांपैकी कुणीही रुग्णाईत न होणे : सद्गुरुकाकांच्या समवेत लाभलेल्या नामसत्संगाच्या या सेवेत पुष्कळ अद्भुत अनुभूती येतात. त्यांच्या चैतन्यामुळे आम्ही संपूर्ण वर्षात एकदाही रुग्णाईत किंवा निरुत्साही झालो नाही. ‘हा सर्व संतांच्या अस्तित्वाचा परिणाम आहे’, असे लक्षात येते.
४ आ. दर्शकांच्या अनुभूती
१. सद्गुरु काकांच्या प्रीतीमुळे ते अनेक दर्शकांचे आवडते झाले आहेत. अनेक दर्शक न विसरता त्यांना नमस्कार सांगतात. काहींनी ‘सद्गुरूंच्या ठिकाणी त्यांना प्रकाश दिसतो’, असे सांगितले.
२. अमेरिकेतून सत्संग पहाणार्या सौ. कैलाशबेन पटेल म्हणाल्या, ‘‘सद्गुरु जाधवकाका सत्संगात माझ्या मनातील प्रश्नांचीच उत्तरे देतात’, असे मी अनेक वेळा अनुभवले आहे.’’
५. प्रत्यक्ष पडद्यावर न दिसणार्या अनेक साधकांच्या अविरत योगदानामुळे सत्संगसेवा घडत असणे
नामसत्संगाच्या सेवेत तंत्रज्ञ गटाचा (टेक्निकल टीम) सर्वाधिक सहभाग आहे. या गटातील साधक आम्हाला मार्गदर्शन करतात. या सत्संगाच्या सेवेत असलेले अनेक साधक प्रत्यक्ष पडद्यावर दिसत नाहीत; परंतु ते अखंड सेवारत असतात. मग तो छायाचित्रक (कॅमेरा) सांभाळणारा साधक असो, प्रत्यक्ष प्रक्षेपण सेवा करणारा साधक असो, प्रसारातील साधक असो, संहिता लिखाणाची सेवा करणारा साधक असो किंवा अन्य सेवा करणारा साधक असो. जळगाव सेवाकेंद्रातील सर्वच साधकांचा या ‘ऑनलाइन’ सेवेत प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग असतो. ‘प्रत्येक सत्संग श्री गुरूंना आवडेल’, असा व्हावा’, यासाठी सेवाकेंद्रातील साधक स्वतःचे योगदान देतात. या सर्व साधकांच्या सहकार्यामुळेच ही सेवा करणे शक्य झाले आहे.
६. कृतज्ञता
‘वर्षातील ३६५ दिवस सत्संग सादर करणे’, हे आमची क्षमता आणि पात्रता याच्या पलीकडचे आहे. हे सर्व परात्पर गुरुदेवांच्या संकल्पामुळेच होत आहे. त्यांनी आम्हाला शक्ती आणि चैतन्य प्रदान केले आहे. केवळ आणि केवळ त्याचमुळे आम्ही सर्व साधक या नामसत्संगाचा ‘चैतन्य सागर’ अनुभवू शकत आहोत. हा सत्संग संपूर्णतः त्यांच्या कृपेच्या बळावरच होत आहे.
‘श्री गुरूंच्या या दैवीकार्यात त्यांनी आम्हाला माध्यम बनवले’, यासाठी त्यांच्या श्री चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे. कृतज्ञता व्यक्त करायला आमच्यापाशी शब्दच नाहीत ! नामसत्संग रूपी गुरुसेवेची ३६५ भावपुष्पे
श्री गुरुचरणी अर्पण !’
– सौ. क्षिप्रा जुवेकर, (आध्यात्मिक पातळी ६२ टक्के) जळगाव सेवाकेंद्र, जळगाव. (१६.३.२०२१)
|