महाप्रलयानंतर ब्रह्मदेवांनी सप्तसुरांतून विश्वाची निर्मिती केल्याचे दृश्य दिसणे
‘मी ध्यानाला बसलो असतांना मला प्रतिदिन सूक्ष्मातून पुढील दृश्य दिसते. ‘मला महाभयंकर प्रलय दिसायचा. महाप्रलयानंतर भगवान श्रीविष्णु ब्रह्मदेवांना म्हणाले, ‘महाप्रलयाचा काळ संपत आला आहे. आपण आता विश्वाच्या निर्मितीला आरंभ करावा.’ त्या वेळी ब्रह्मदेवांनी ‘ॐ’कारातून प्रथम सप्तसुरांची निर्मिती केली. तेव्हा ‘साऽ रेऽ गऽ मऽ पऽ धऽ नीऽ’ या सप्तसुरांची निर्मिती झाल्याचे जाणवले. तेव्हा ब्रह्मदेवांनी त्या सुरांद्वारे म्हणजे ‘सा’मधून सागरातील जीव निर्माण केले. ‘रे’मधून रेती (वाळवंट) जमिनीवरील जिवांची निर्मिती केली. ‘ग’तून गगनविहारी पक्षी सिद्ध केले. ‘म’मधून मानवाची निर्मिती केली. ‘प’मधून अन्य प्राण्यांची निर्मिती केली. ‘ध’मधून सर्व प्राणीमात्रांसाठी धर्माची निर्मिती केली आणि ‘नी’मधून नीती-नियम यांची निर्मिती केली. ‘सा’द्वारे ‘सामवेद’ या प्रथम वेदाची निर्मिती केली. अशा प्रकारे ब्रह्मदेवाने विश्वाची निर्मिती केली.’ मला एवढी सुंदर अनुभूती दिल्याविषयी मी श्रीकृष्णाच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
– आपल्या चरणांजवळील धुळीचा कण, श्री. नंदकिशोर दत्तात्रय नारकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२७.१२.२०१९)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |