सूक्ष्मातून गुरुदेवांचे अस्तित्व जाणवल्याने स्थुलातून भेटण्याची ओढ उणावणे आणि ‘स्थुलापेक्षा सूक्ष्म श्रेष्ठ’ याची प्रचीती येणे

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘साधनेत ‘स्थुलातून सूक्ष्माकडे’, जायचे असते. ते सौ. उषा किटकरु यांनी अनुभवले. या अनुभूतीविषयी साधिकेचे कौतुक करावे, तेवढे थोडे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

१. गुरुदेवांना स्थुलातून भेटण्याची ओढ वाटणे

‘पूर्वी साधक रामनाथी आश्रमात यायचे. त्या वेळी मला वाटायचे, ‘मला रामनाथी आश्रमात कधी जायला मिळणार ? गुरुमाऊलीने आपल्यालाही बोलवावे.’ मी उत्सुकतेने गुरुमाऊलीला भेटण्याची वाट पहात होते.

२. प्रार्थना आणि अनुसंधान यांमुळे सूक्ष्मातून सतत गुरुदेवांचे अस्तित्व जाणवणे अन् स्थुलातून त्यांना भेटण्याची ओढ उणावणे

एकदा मला उत्तरदायी साधकांनी सांगितले, ‘‘तुम्हाला रामनाथी आश्रमात जायचे आहे.’’ तेव्हा माझ्या मनात पुढील विचार आले, ‘गुरुमाऊली तर आपल्या हृदयात आहे. आपल्या जवळच आहे. मी त्यांना मनातील प्रत्येक गोष्ट सांगते. चुका झाल्यानंतर त्यांची कान पकडून क्षमा मागते. दुःख झाले किंवा वाईट वाटले, तरी त्यांना सांगते. ताण आला, तरी ताण नष्ट करण्यासाठी त्यांना विनवणी करते. ते सूक्ष्मातून माझ्याजवळच आहेत. तेच माझी काळजी घेतात. प्रत्येक प्रसंगात कसे बोलायचे ? आणि कसे वागायचे ?, हे मला सांगतात. माझ्यातील अहंच्या पैलूंची जाणीव करून देतात. स्वभावदोष घालवण्यासाठी माझ्याकडून झालेल्या चुकांची जाणीव करून देतात. ‘एवढे सगळे ते सूक्ष्मातून करतात. सूक्ष्मातून माझ्याजवळ रहातात, मग मी त्यांना स्थुलातून भेटून काय करू ?’ असे वाटल्याने पूर्वीची उत्सुकता जाणवली नाही. त्यामुळे गुरुमाऊली स्थुलातून भेटल्यावर ‘आरंभी काय बोलावे ?’, ते मला सुचले नाही.’

– सौ. उषा किटकरु, नागपूर.

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक