पू. अनंत आठवले लिखित ‘अध्यात्मशास्त्राच्या विविध अंगांचा बोध’ या नूतन मराठी ग्रंथाचे प्रकाशन !
सनातनचे १०१ वे संत पू. अनंत आठवले यांचा ८६ वा वाढदिवस चैतन्यमय वातावरणात साजरा !
रामनाथी (गोवा) – सनातन संस्थेचे संस्थापक परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे ज्येष्ठ बंधू तथा सनातनचे १०१ वे संत पू. अनंत आठवले (पू. भाऊकाका) यांच्या ८६ व्या वाढदिवसाचा कार्यक्रम आणि त्यांनी लिहिलेल्या ‘अध्यात्मशास्त्राच्या विविध अंगांचा बोध’ या नूतन मराठी ग्रंथाचे प्रकाशन चैतन्यमय वातावरणामध्ये झाले. पू. अनंत आठवले यांचा २ सप्टेंबर २०२१ या दिवशी ८६ वा वाढदिवस परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या खोलीत साजरा झाला. या निमित्ताने परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी पू. भाऊकाकांचा भेटवस्तू देऊन सन्मान केला. या कार्यक्रमाला पू. अनंत आठवले यांच्या पत्नी सौ. सुनीती आठवले आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी केले. या कार्यक्रमाची सांगता भगवान श्रीकृष्णाच्या चरणी भावपूर्ण कृतज्ञता व्यक्त करून झाली. या वेळी ‘अध्यात्मशास्त्राच्या विविध अंगांचा बोध’ या मराठी ग्रंथाचे प्रकाशन उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले.
संत ज्ञानेश्वर आणि समर्थ रामदासस्वामी यांच्याप्रमाणे पू. भाऊकाकांचाही अध्यात्मावर अधिकार आहे ! – परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले, संस्थापक, सनातन संस्थापरात्पर गुरु डॉ. आठवले म्हणाले की, तत्त्वज्ञानाचे ग्रंथ अतिशय कठीण असतात आणि त्यांचा आपल्याला वाचतांना कंटाळा येतो; परंतु पू. अनंत आठवले, म्हणजे आमचे पू. भाऊकाका यांनी लिहिलेला ग्रंथ हा साध्या सोप्या भाषेत मार्गदर्शन करणारा आहे. त्यामुळे हा ग्रंथ आपल्याला भावेल, तसेच सहजपणे ज्ञानही मिळेल. पू. भाऊकाका यांचा तत्त्वज्ञानाचा गाढा अभ्यास आहे. तसेच त्यांची भगवद्गीतेवरही अतूट श्रद्धा आणि भक्ती आहे. संत ज्ञानेश्वर यांनी ‘ज्ञानेश्वरी’ लिहिली आणि समर्थ रामदासस्वामी यांनी ‘दासबोध’ लिहिला. ‘ज्याप्रमाणे या महापुरुषांचा अध्यात्मावर अधिकार होता, तसाच अधिकार पू. भाऊकाकांचाही आहे’, असे हा ग्रंथ वाचल्यावर कळते. हा ग्रंथ अध्यात्मशास्त्राचे विविध ग्रंथ, तत्त्वज्ञान आणि साधनेचे सर्व मार्ग यांच्याविषयी आपल्याला ज्ञान देतो. सनातनच्या ग्रंथसंपदेमध्ये आणखी एका मौल्यवान ग्रंथाचा समावेश झाला आहे. त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करतो. समस्त मानवजातीला साधनेचे तत्त्वज्ञान सोप्या भाषेत सांगून पू. भाऊकाका यांची समष्टीविषयीची तळमळ दिसून येते. पू. भाऊकाका यांच्या चरणी साष्टांग दंडवत ! |
पू. अनंत आठवले यांचे मनोगत ग्रंथाचे मृखपृष्ठ म्हणजे केवळ चित्र किंवा कला नसून त्यात आध्यात्मिक प्रगतीचे प्रतिबिंब आहे !नूतन ग्रंथाविषयी मनोगत व्यक्त करतांना पू. अनंत आठवले म्हणाले, ‘‘एखादा ग्रंथ लिहितांना किती कष्ट पडतात, हे मला ठाऊक नव्हते. हा ग्रंथ सिद्ध करत असतांना मला प्रथमच समजले की, सनातनच्या साधकांनी अहोरात्र कष्ट घेऊन याला ग्रंथरूप दिले आहे. कलेची सेवा करणार्या साधकांनी या ग्रंथाचे अतिशय सुंदर मुखपृष्ठ बनवले आहे. हे केवळ चित्र किंवा कला नाही, तर त्यात आध्यात्मिक प्रगतीचे प्रतिबिंब आहे. त्याविषयी मी सर्वांचा कृतज्ञ आहे. क्षणचित्र ‘अध्यात्मशास्त्राच्या विविध अंगांचा बोध’, या नूतन मराठी ग्रंथाचे लवकरच हिंदीमध्ये भाषांतर होणार आहे. ‘अध्यात्मशास्त्र के विविध अंगोंका बोध’, या नावाने तो लवकरच प्रकाशित होणार आहे, अशी माहिती देण्यात आली. |
‘अध्यात्मशास्त्राच्या विविध अंगांचा बोध’ हा ग्रंथ वाचकांना अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेणारा आहे ! – सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ, सनातन संस्था
या वेळी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ नूतन ग्रंथाचा परिचय करून देतांना म्हणाले की, या ग्रंथामध्ये ‘मनुष्याला आत्मसाक्षात्कार कसा होतो ?’ याविषयी मार्गदर्शन करण्यात आले आहे. ‘ईश्वराकडे लहानसहान गोष्टी मागण्याऐवजी मुख्यत: मोक्ष मागितला पाहिजे. आपण जी सेवा करतो, ती साधनाच आहे आणि हाच निष्काम कर्मयोग आहे’, अशा शब्दालंकारांनी हा ग्रंथ नटलेला आहे. या ग्रंथामध्ये भक्ती, ज्ञान आणि पराभक्ती काय असते ? याविषयी मार्गदर्शन करण्यात आले आहे. मराठी बाराखडीमध्ये ‘अ’ पासून ‘ज्ञ’पर्यंत अक्षरे आहेत. त्याप्रमाणे या ग्रंथामध्ये अज्ञानाकडून ज्ञानाकडे प्रगती करण्यासंदर्भातही पू. अनंत आठवले यांनी मार्गदर्शन केले आहे. ‘भगवद्गीता हा हिंदूंचा केवळ धर्मग्रंथच नाही, तर आम्हाला तत्त्वज्ञान शिकवणारा ग्रंथ आहे.’
पू. अनंत आठवले यांचा ग्रंथलेखनाविषयी असलेला समर्पणभाव !
‘अध्यात्मशास्त्राच्या विविध अंगांचा बोध’ या नूतन ग्रंथाचे प्रकाशन करण्यात आल्यानंतर पू. अनंत आठवले यांनी ‘तुझी वस्तू तुलाच अर्पण करत आहे’, या अर्थाने ‘त्वदीयं वस्तु गोविन्द तुभ्यमेव समर्पये’ (हे श्रीकृष्णा, तुझी वस्तू मी तुलाच अर्पण करतो आहे.), अशी प्रार्थना करून हा ग्रंथ भगवान श्रीकृष्णाच्या चरणी अर्पण केला. यानंतर त्यांनी त्यांचा समर्पणभाव दर्शवणारी ‘तेरा तुझको अर्पण, क्या लागे मेरा ?’, ही पंक्ती उधृत केली.
वाढदिवसाच्या निमित्ताने पू. अनंत आठवले यांनी समष्टीसाठी केली प्रार्थना !
या कार्यक्रमाच्या निमित्ताने पू. अनंत आठवले यांनी ‘सर्वांचे अपसमज आणि अज्ञान नष्ट होऊन त्यांची योग्य प्रकारे साधना व्हावी’, ही भगवान श्रीकृष्णाच्या चरणी प्रार्थना !’, अशा शब्दांमध्ये समष्टीचे कल्याण करणारी प्रार्थना केली.
‘अध्यात्मशास्त्राच्या विविध अंगांचा बोध’ या ग्रंथाचे उपस्थितांनी केलेले सूक्ष्म परीक्षण
१. सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ – ग्रंथ हातात घेतल्यावर मला थंडावा आणि आनंद जाणवला.
२. पू. अनंत आठवले – हा ग्रंथ हातात घेऊन पाहिल्यावर मला शब्दांचा अर्थ नाही, तर ज्ञान लक्षात येत आहे. ज्ञान प्रतीत झाल्याने आपले अपसमज आणि अज्ञान दूर होत असल्याचे दिसत आहे.
३. परात्पर गुरु जयंत डॉ. आठवले – हा ग्रंथ हातात घेतल्यावर माझी अनाहत आणि आज्ञा चक्रे जागृत झाली अन् भावही जागृत झाला.
४. सौ. सुनीती आठवले – माझे हात थरथरले.
५. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ – ग्रंथ हातात घेतल्यानंतर माझी भावजागृती झाली आणि माझ्या अनाहत अन् सहस्रार चक्रांवर संवेदना जाणवली.