गायनाचा सराव करतांना पुणे येथील कु. मधुरा चतुर्भुज यांना आलेल्या अनुभती
१. एका गायनप्रकाराचा सराव करतांना वृंदावनात श्रीकृष्णाच्या बासरीचा नाद ऐकू येणे, परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा हसरा तोंडवळा दिसून आनंद जाणवणे आणि सूक्ष्मातून त्यांना तुळशीचा हार घातल्यावर भावजागृती होणे
कु. मधुरा चतुर्भुज‘२.३.२०२१ या दिवशी स्वरांचा (अलंकारांचा) सराव करतांना मला बासरीचे सूर ऐकू येऊन राधा त्या सुरांसमवेत नृत्य करतांना दिसली. याच प्रकारे श्रीकृष्णाच्या बासरीचा नाद ऐकतांना ‘मी वृंदावनात आले आहे’, असे मला दिसले. त्या वेळी मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांचा हसरा तोंडवळा दिसला. त्यांनी सूक्ष्मातून माझ्या डोक्यावर हात ठेवला असून माझ्या सहस्रारचक्रात चैतन्यरूपी लहरी जाणवल्या. माझे मन शांत आणि एकाग्र होऊन मला वेगळीच आनंदावस्था अनुभवायला मिळाली. त्यानंतर मला तुळस दिसली आणि त्या तुळशीचा हार मी परात्पर गुरु डॉक्टरांना घातला. तेव्हा ‘ते पुष्कळ आनंदी झाले आहेत’, असे मला दिसले आणि माझी भावजागृती झाली.
२. ‘स्वर हवेत तरंगत आहेत’, असे दिसणे आणि सात स्वर एकरूप होऊन पिवळा गोळा होणे अन् त्यामधून सर्वत्र चैतन्य पसरणे
६.३.२०२१ या दिवशी गायनाच्या सरावाच्या वेळी स्वर म्हणतांना ‘स्वर हवेत तरंगत आहेत’, असे दिसले. ‘सात स्वर एकरूप झाले. त्यांचा पिवळा गोळा तयार होऊन त्यामधून सर्वत्र चैतन्य पसरत आहे’, असे जाणवले, तसेच मनातले विचार न्यून होऊन नामजप चालू झाला.’
– कु. मधुरा चतुर्भुज, पुणे (१३.३.२०२१)
|