श्रावण आणि भाद्रपद या मासांतील (५.९.२०२१ ते ११.९.२०२१ या सप्ताहातील) शुभ-अशुभ दिवस अन् त्या दिवसांचे आध्यात्मिक महत्त्व !
‘६.९.२०२१ या दिवशी श्रावण मास संपत आहे आणि ७.९.२०२१ दिवसापासून भाद्रपद मासाला आरंभ होणार आहे. सर्वांना हिंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ (साप्ताहिक दिनविशेष) हे सदर प्रसिद्ध करत आहोत.
१. हिंदु धर्मानुसार ‘प्लव’नाम संवत्सर, शालिवाहन शक – १९४३, दक्षिणायन, वर्षाऋतू, श्रावण मास आणि कृष्ण पक्ष चालू आहे. ७.९.२०२१ पासून भाद्रपद मास आणि शुक्ल पक्ष चालू होणार आहे.
आपल्या धर्मग्रंथात श्रावण मासात प्रतिदिन विविध धार्मिक व्रते सांगितली आहेत. श्रावण मासात प्रत्येक रविवारी मौन धारण करून ‘गभस्ति’ नावाच्या सूर्याचे पूजन करावे. प्रत्येक सोमवारी अनुक्रमे तांदुळ, तीळ, मूग, जवस आणि पाचवा सोमवार असल्यास सातू, हे ५ मुठी धान्य शिवपिंडीवर वहावे. (‘७.९.२०२१ या दिवसापासून भाद्रपद मास चालू होत असल्याने बुधवार ते शनिवार या दिवशी श्रावणमासात करावयाच्या व्रतांची माहिती दिलेली नाही.’ – संकलक)
२. शास्त्रार्थ
२ अ. भद्रा (विष्टी करण) : ज्या दिवशी ‘विष्टी’ करण असते, त्या काळाला ‘भद्रा’ किंवा ‘कल्याणी’ असे म्हणतात. भद्रा काळात शुभ आणि मंगल कार्ये करत नाहीत; कारण त्या कार्यांत विलंब होण्याचा संभव असतो. ५.९.२०२१ या दिवशी सकाळी ८.२२ पासून रात्री ८.०५ पर्यंत आणि १०.९.२०२१ या दिवशी सकाळी ११.०९ पासून रात्री ९.५८ पर्यंत विष्टी करण आहे.
२ आ. यमघंट योग : रविवारी मघा, सोमवारी विशाखा, मंगळवारी आर्द्रा, बुधवारी मूळ, गुरुवारी कृत्तिका, शुक्रवारी रोहिणी आणि शनिवारी हस्त नक्षत्र एकत्र आल्यास ‘यमघंट योग’ होतो. हा अनिष्ट योग आहे. प्रवासासाठी हा योग पूर्णतः वर्ज्य करावा. रविवारी ५.९.२०२१ या दिवशी सायंकाळी ६.०७ नंतर मघा नक्षत्र असल्याने यमघंट योग आहे.
२ इ. दर्श-पिठोरी अमावास्या, सोमवती अमावास्या, वृषभपूजन (पोळा) : अमावास्या तिथीचे मधले पाच प्रहर (दुसर्या प्रहरापासून सहाव्या प्रहरापर्यंत) ‘दर्श’ संज्ञक मानतात. प्रदोषकाल व्यापिनी श्रावण अमावास्येच्या दिवशी पिठोरी अमावास्या साजरी केली जाते. पिठोरी अमावास्येच्या दिवशी ६४ योगिनींच्या चित्राचे पूजन करून याच दिवशी ‘बैल पोळा’ हा सण साजरा केला जातो. श्रावण अमावास्येला कृतज्ञता म्हणून बैलांची (वृषभांची) पूजा करून पक्वान्नांचा नैवेद्य करून बैलांना खायला देतात. बैलांची वाजत-गाजत मिरवणूक काढली जाते. सोमवार, ६.९.२०२१ या दिवशी सकाळी ७.३९ पासून ७.९.२०२१ या दिवशी सकाळी ६.२२ पर्यंत दर्श-पिठोरी अमावास्या आहे. ही अमावास्या सोमवारी असल्याने ‘सोमवती योग’ होतो. सोमवती अमावास्या तिथीला तीर्थस्नान, अश्वत्थपूजन आणि विष्णुपूजन करतात. या दिवशी मातृदिन साजरा करतात.
२ ई. दर्भाहरण : दर्भाहरण किंवा कुशग्रहणी हे व्रत श्रावण अमावास्येला करतात. शास्त्रानुसार दहा प्रकारचे कुश (दर्भ) सांगितले आहेत. ज्या दर्भाचे मूळ तीक्ष्ण असेल, ज्याला सात पाने असतील, ज्याचा शेंडा तोडला नसेल आणि जो हिरवा असेल, असा दर्भ श्रावण अमावास्येला उजव्या हाताने तोडून आणतात. या दर्भाचा उपयोग वर्षभर होतो. असा दर्भ देव आणि पितृ दोन्ही कार्यांत वापरतात.
२ उ. क्षयदिन : ६.९.२०२१ या दिवशी ‘क्षयदिन’ आहे. ज्या तिथीच्या वेळी सूर्याेदयाची वेळ नसते, ती ‘क्षय तिथी’ असते. क्षय तिथी शुभ कार्यासाठी वर्ज्य असते.
२ ऊ. मौनव्रतारंभ : हे व्रत भाद्रपद शुक्ल पक्ष प्रतिपदेला करतात. या दिवशी श्री सदाशिवाची षोडशोपचारे पूजा करतात. या दिवशी सर्व नित्यकर्मे करतांना मौन पाळतात. भगवान शिवाच्या अनुसंधानात राहून अंतर्मुख होण्याचा प्रयत्न करावा. या दिवशी १६ देवता आणि १६ ब्राह्मण यांचे पूजन करतात. ‘या व्रताने पापमुक्त होऊन आरोग्य आणि दीर्घायुष्य प्राप्त होते’, असे मानले जाते. या व्रताने साधनेत प्रगती होते.
२ ए. चंद्रदर्शन : अमावास्येनंतर चंद्राचे ‘चंद्रकोर’रूपात प्रथम दर्शन होते. हिंदु धर्मात चंद्रदर्शनाला विशेष महत्त्व आहे. या दिवशी चंद्रदर्शन होणे भाग्यकारक आहे; कारण चंद्र हा मनाचा कारक ग्रह आहे. सूर्यास्तानंतर लगेचच केवळ थोड्या वेळासाठी चंद्रकोर दिसते. या तिथीची देवता ब्रह्मा आहे. ८.९.२०२१ या दिवशी रात्री ८.०२ पर्यंत चंद्रदर्शन आहे.
२ ऐ. दग्ध योग : रविवारी द्वादशी, सोमवारी एकादशी, मंगळवारी पंचमी, बुधवारी तृतीया, गुरुवारी षष्ठी, शुक्रवारी अष्टमी आणि शनिवारी नवमी ही तिथी असेल, तर दग्ध योग होतो. दग्ध योग हा अशुभ योग असल्याने सर्व कार्यांसाठी निषिद्ध मानला आहे. ८.९.२०२१ या दिवशी बुधवार असून उत्तररात्री २.३४ नंतर तृतीया तिथी असल्याने दुसर्या दिवशी सूर्याेदयापर्यंत ‘दग्ध योग’ आहे.
२ ओ. हरितालिका तृतीया : हरितालिका तृतीया उदयव्यापिनी हवी. या दिवशी सखी, पार्वती (उमा) आणि भगवान शिव यांचे पूजन केले जाते. ‘चांगला पती मिळावा’, या इच्छेने हे व्रत विशेषतः कुमारिकांनी करावे; परंतु हे सौभाग्य व्रत असल्याने सौभाग्यप्राप्तीसाठी विवाहित स्त्रियांनीसुद्धा हे व्रत करावे. सूर्याेदयापासून मध्यान्ह समाप्तीपर्यंत (अंदाजे दुपारी दीड वाजेपर्यंत) कोणत्याही वेळी हरितालिका पूजन करावे. ९.९.२०२१ या दिवशी पहाटे २.३४ पासून रात्री १२.१९ पर्यंत तृतीया तिथी आहे.
२ औ. स्वर्णगौरीव्रत : कर्नाटक, आंध्रप्रदेश आणि तमिळनाडू या राज्यांमध्ये भाद्रपद शुक्ल पक्ष तृतीया तिथीला माता पार्वतीच्या गौरी अवताराचे पूजन केले जाते. उत्तर भारतात हरितालिका तीज म्हणतात. विवाहित स्त्रिया सुखी वैवाहिक जीवनासाठी माता गौरीची पूजा करतात. यालाच ‘स्वर्णगौरीव्रत’ मानले जाते.
२ अं. सामश्रावणी : भाद्रपद शुक्ल पक्ष तृतीया तिथीला सामवेदी ब्राह्मण जुने जानवे पालटून नवीन जानवे धारण करतात.
२ क. मन्वादि : भाद्रपद शुक्ल पक्ष तृतीया तिथीला ‘मन्वादि योग’ होतो. या दिवशी केलेल्या श्राद्धाचे विशेष फल सांगितले आहे.
२ ख. श्री गणेशचतुर्थी, पार्थिव गणेशपूजन, चंद्रदर्शन निषेध : प्रत्येक मासाच्या अमावास्येनंतर येणार्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला ‘विनायक चतुर्थी’ म्हणतात. भाद्रपद शुक्ल चतुर्थी तिथीला पार्थिव श्री गणेशाची स्थापना करून पूजन करतात. श्री गणेशचतुर्थीला मध्यान्ह व्यापिनी चतुर्थी पाहिजे. प्रातःकालापासून मध्यान्हापर्यंत कोणत्याही वेळी स्थापना आणि पूजन करता येते. त्यासाठी विशिष्ट नक्षत्र, योग, विष्टी करण इत्यादी वर्ज्य नाहीत; म्हणून ते पाहू नयेत. या दिवशी चंद्रदर्शन निषेध मानले आहे. १०.९.२०२१ या दिवशी श्री गणेशचतुर्थी आहे.
२ ग. जैन संवत्सरी : मध्यान्हकाल व्यापिनी भाद्रपद शुक्ल पक्ष पंचमीच्या दिवशी जैन संवत्सरी साजरी करावी. यामध्ये चतुर्थी आणि पंचमी पक्ष असे दोन प्रकार आहेत. १०.९.२०२१ आणि ११.९.२०२१ या दिवशी जैन संवत्सरी आहे.
२ घ. ऋषिपंचमी : भाद्रपद शुक्ल पक्ष पंचमी तिथीला ऋषिपंचमी साजरी करतात. पंचमी तिथी मध्यान्ह व्यापिनी पाहिजे. ‘रजस्वलेच्या स्पर्शास्पर्शाच्या दोषाचे निवारण व्हावे’, यासाठी महिला हे व्रत करतात, तसेच इतर पापदोषांच्या निवारणार्थ स्त्री आणि पुरुष, दोघेही हे व्रत करतात. या व्रतामध्ये सप्तर्षी आणि अरुंधती यांचे पूजन केले जाते. या दिवशी व्रतकर्त्याने नांगरलेल्या भूमीतून उत्पन्न झालेले (बैलाच्या कष्टाचे) धान्य खाऊ नये.
२ च. घबाड मुहूर्त : हा शुभ मुहूर्त आहे. ११.९.२०२१ या दिवशी सायंकाळी ७.३८ पासून दुसर्या दिवशी सकाळी ९.५० पर्यंत घबाड मुहूर्त आहे.
टीप १ – शिवरात्री, दग्ध योग, भद्रा (विष्टी करण), विनायक चतुर्थी, घबाड मुहूर्त आणि अन्वाधान यांविषयीची अधिक माहिती पूर्वी प्रसिद्ध केली आहे.
– सौ. प्राजक्ता जोशी (ज्योतिष फलित विशारद, वास्तूविशारद, अंक ज्योतिष विशारद, रत्नशास्त्र विशारद, अष्टकवर्ग विशारद, सर्टिफाइड डाऊसर, रमल पंडित, हस्ताक्षर मनोविश्लेषण शास्त्र विशारद), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, फोंडा, गोवा. (२५.८.२०२१)