पुणे येथील डॉ. प्रमोद घोळे यांचा साधनाप्रवास आणि त्यांनी विविध प्रसंगांत परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अनुभवलेली प्रीती
३.९.२०२१ या दिवशी आपण ‘पुणे येथील डॉ. प्रमोद घोळे यांच्या साधनाप्रवासाच्या अंतर्गत त्यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याकडून साधना करण्यास प्रोत्साहन कसे मिळाले ?’ याविषयी पाहिले. आज उर्वरित भाग पाहू.
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/507981.html
५. परात्पर गुरुदेवांची अनुभवलेली प्रीती
५ अ. एका प्रसिद्ध वर्तमानपत्रात छापून आलेल्या एका विज्ञापनामधील व्यक्तीचे छायाचित्र साधकासारखे असल्याने परात्पर गुरुदेवांनी ते साधकाला दाखवणे : आम्ही वर्ष १९९९ च्या मेमध्ये गोवा येथील सुखसागरमध्ये गेलो होतो. त्या वेळी परात्पर गुरुदेवांनी मला १५ ते २० दिवसांपूर्वीचे एक प्रसिद्ध वर्तमानपत्र दाखवले. ते मला म्हणाले, ‘‘युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया (यु.टी.आय.)च्या विज्ञापनामधील ही व्यक्ती अगदी तुमच्यासारखीच आहे ना !’’ प.पू. गुरुदेवांनी एवढे बारीक निरीक्षण करून ते वर्तमानपत्र आम्हाला दाखवण्यासाठी शोधले होते. खरोखरच केवढी ही प्रीती !
५ आ. परात्पर गुरुदेवांच्या कृपेने अनेक साधकांचा सत्संग लाभल्याने सतत ‘सत्’मध्ये रहाता येणे : ‘सतत सत्मध्ये ठेवणे’, ही परात्पर गुरुदेवांनी साधकांवर केलेली सर्वाेच्च प्रीती आहे’, असे मला वाटते. आमचे भोपाळ, लखनऊ आणि चंडीगड येथे स्थानांतर (बदली) झाल्यावर आम्हाला साधनेत टिकवून ठेवण्यासाठी आणि आम्हाला मार्गदर्शन करण्यासाठी परात्पर गुरुदेवांच्या कृपेने आधुनिक वैद्य (डॉ.) पांडुरंग मराठे, आधुनिक वैद्य (डॉ.) दुर्गेश सामंत आणि अनेक साधक यांचा सत्संग आम्हाला लाभला. लखनऊमध्ये प्रसारासाठी अनेक मास साधक घरी रहात असल्यामुळे आम्हाला सतत सत्मध्ये रहाता आले.
५ इ. परात्पर गुरुदेवांनी मुलींच्या शाळेच्या सुटीच्या कालावधीत विविध आश्रमांमध्ये शिकण्यासाठी जायला सांगणे : प्रतिवर्षी मे मासात मुलींच्या शाळांना सुटी असल्याने परात्पर गुरुदेव आम्हाला आध्यात्मिक ऊर्जा देण्यासाठी आणि निरनिराळ्या साधकांकडून शिकण्यासाठी गोवा येथील आश्रमात किंवा अन्य आश्रमांत शिकण्यासाठी जायला सांगायचे.
५ ई. ‘प्रशिक्षणासाठी इस्रायल येथे जावे कि नको’, अशी द्विधा मनःस्थिती होणे, परात्पर गुरुदेवांना याविषयी सांगितल्यावर त्यांनी मुंबई येथील प.पू. जोशीबाबा यांचे आशीर्वाद घेऊन जाण्यास सांगणे : मी वर्ष २००१ मध्ये नोकरीनिमित्त लखनऊ येथे कार्यरत असतांना मला ४ आठवड्यांच्या प्रशिक्षणासाठी इस्रायल येथे जायचे होते. त्या वेळची इस्रायलमधील स्फोटक परिस्थिती पहाता ‘प्रशिक्षणाला जावे कि नको’, अशी माझी द्विधा मनःस्थिती झाली होती. परात्पर गुरुदेवांना याविषयी सांगितल्यावर ते म्हणाले, ‘‘मुंबई येथे प.पू. जोशीबाबा आहेत. त्यांना जाण्यापूर्वी भेटून जा.’’ मी लखनऊहून मुंबई विमानतळावर पोचल्यावर दुपारी एक साधक मला न्यायला आले होते. ते मला प.पू. जोशीबाबा यांच्याकडे घेऊन गेले आणि त्यांचे आशीर्वाद घेऊन सायंकाळी त्यांनी पुन्हा मला विमानतळावर पोचवले. परात्पर गुरुदेवांनी अशा तर्हेने माझी इस्रायलच्या वास्तव्यात आध्यात्मिक स्तरावर काळजी घेतली.
६. साधना करतांना होत असलेल्या त्रुटी, स्वभावदोष आणि अहं यांची परात्पर गुरुदेवांनी वेळोवेळी जाणीव करून देणे
६ अ. परात्पर गुरुदेवांनी ‘शिकण्याचा आणि लोकांमध्ये मिसळण्याचा भाग वाढवला पाहिजे’, असे सांगणे : वर्ष २००३ मध्ये आम्ही परात्पर गुरुदेवांच्या समवेत नाशिक येथे प.पू. ढेकणे महाराज यांच्या सत्कार समारंभासाठी आणि कोल्हापूर येथे प.पू. शामराव महाराज यांच्या दर्शनासाठी गेलो होतो. तेव्हा प्रवासात परात्पर गुरुदेवांनी मला सांगितले, ‘‘हिंदी भाषिक क्षेत्रात सेवा करणार्या साधकांकडून शिकण्याचा आणि लोकांमध्ये मिसळण्याचा भाग तुम्ही वाढवला पाहिजे.’’
६ आ. परात्पर गुरुदेवांनी ‘मुली आता मोठ्या झाल्या आहेत, तुम्ही साधनेकडे लक्ष द्या, नाहीतर असेच एक दिवस हे जीवन संपून जाणार’, असे सांगणे : वर्ष २००४ मध्ये माझी मोठी मुलगी कु. प्राजक्ता इयत्ता दहावी इयत्तेत उत्तीर्ण झाली. त्या वेळी मी परात्पर गुरुदेवांना दूरभाष केला होता. त्या प्रसंगी मुलीचे अभिनंदन केल्यानंतर परात्पर गुरुदेव मला म्हणाले, ‘‘मुली आता मोठ्या झाल्या. तुम्ही आता तुमच्या साधनेकडे लक्ष द्या, नाहीतर असेच एक दिवस हे जीवन संपून जाणार.’’
६ इ. ‘कुटुंबातील चौघांचाही ‘अहं’ सामान्य व्यक्तीएवढाच आहे’, असे परात्पर गुरुदेवांनी सांगणे : वर्ष २००६ मध्ये आम्ही देवद आश्रम, तपोधाम, रत्नागिरी सेवाकेंद्र यांना भेटी देऊन गोवा येथे गेलो होतो. त्या वेळी परात्पर गुरुदेवांनी आम्हाला सांगितले, ‘‘कुटुंबातील चौघांचाही ‘अहं’ सामान्य व्यक्तीएवढाच आहे.’’
६ ई. वर्ष २००७ मध्ये रामनाथी आश्रमातील भावसत्संगाच्या वेळी परात्पर गुरुदेवांनी सांगितले, ‘‘माझ्यावर पुष्कळ आवरण आले आहे.’’
(अनिष्ट शक्ती व्यक्तीचे शरीर, मन आणि बुद्धी यांवर त्रासदायक शक्तीचे आवरण आणतात. – संकलक)
७. क्षमायाचना आणि कृतज्ञता
परात्पर गुरुदेवांनी एवढ्या स्पष्टपणे सांगूनही ‘मायेचे आवरण, स्वभावदोष अन् अहं यांमुळे मी साधनेकडे अपेक्षित असे लक्ष देऊ शकलो नाही’, याबद्दल मला पुष्कळ खंत वाटते. मी परात्पर गुरुदेवांच्या चरणी क्षमायाचना करतो.
‘परात्पर गुरुदेवांनी माझ्याकडून लिखाण करवून घेतले’, त्याबद्दल मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’
(समाप्त)
– डॉ. प्रमोद घोळे, बिबवेवाडी, पुणे. (२९.५.२०२०)