तीर्थक्षेत्रे मद्य आणि मांस मुक्त करा !
संपादकीय
भारतातील तीर्थक्षेत्रांचे पावित्र्य राखण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना अपरिहार्य !
१३ राज्यांत गोवंशियांच्या हत्याबंदीचे कायदे असूनही ‘जीव हातावर घेऊन फिरणार्या गोप्रेमींना स्वतःचे प्राण वाचवण्याच्या लढाईसमवेतच पोलिसांशी संघर्ष करावा लागतो’ हे निराशाजनक आहे. सणाच्या वेळी प्रदूषणाच्या आरोळ्या ठोकणार्यांना ‘वर्षभर विविध प्राण्यांच्या शरिराचे भाग आणि रक्त नदीत टाकले जाते’, ते दिसत नाही. सर्वत्र भ्रष्टाचाराच्या बजबजपुरीमुळे आणि सत्तेत असलेल्यांच्या महसूल धोरणामुळे देशातील कोट्यवधींचे संसार उद्ध्वस्त करणारे दारूधंदेही अल्प होत नाहीत; उलट आता त्याला मध्यमवर्गियांतही प्रतिष्ठा मिळाली आहे. दळणवळणबंदीच्या काळात मद्य न मिळाल्याने काहींनी आत्महत्या केली. या घटना चिंता वाढवणार्या आहेत. या सर्व पार्श्वभूमीवर उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एक चांगले वृत्त दिल्याने प्रत्येक धर्मप्रेमी आणि भाविक यांना निश्चितच समाधान वाटले असेल. गोपालक भगवान श्रीकृष्णाची मथुराच नव्हे, तर उत्तरप्रदेशातील सर्व तीर्थक्षेत्रांच्या परिसरात मद्य आणि मांस यांच्या विक्रीवर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. श्रीकृष्ण जयंतीच्या मुहूर्तावर त्यांनी स्थानिक जनतेला आवाहन केले, ‘मथुरा पूर्वी दुधाच्या व्यापारासाठी ओळखली जायची. आताही येथील मद्य आणि मांस विक्रेत्यांनी दुधाचा व्यवसाय चालू करावा आणि परत एकदा पूर्वीप्रमाणे मथुरेची ओळख निर्माण करावी.’
धर्मप्रेमी शासनकर्ता !
सध्याच्या राजकीय आणि सामाजिक परिस्थितीत अशा प्रकारे पालट करणे म्हणजे विशिष्ट गटाशी संघर्ष ओढवून घेण्यासारखे असते. त्यामुळे राजकारणी सहसा असे निर्णय घेत नाहीत; परंतु धर्माचे अधिष्ठान असणार्या नेत्यांमध्ये संघर्ष करण्याची क्षमता असते. साधना आणि प्रखर धर्माभिमान यांमुळे त्यांच्यात आत्मबल येते. त्या जोरावर ते धर्महिताचे, म्हणजेच बहुसंख्य समाजाच्या हिताचे निर्णय घेऊ शकतात. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या संदर्भात तेच होत आहे. ‘उत्तरप्रदेशातील येणार्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला’, अशी टीका अनेक जण करतील; परंतु आतापर्यंत अनेक निवडणुका देशात झाल्या आणि होत असतात; पण अन्य कुणी असा निर्णय घेतला नव्हता. प्रखर धर्मप्रेमामुळेच शहरांना दिलेली आक्रमणकर्त्यांची नावे पालटण्यापासून राज्यातील गुंडांची दहशत संपवण्यापर्यंत अनेक पालट मुख्यमंत्री योगी करू शकत आहेत.
तीर्थक्षेत्रांचे महात्म्य !
जगातील एकूण तीर्थक्षेत्रांपैकी जवळजवळ सर्वच भारतभूच्या परिसरात असून काही हाताच्या बोटावर मोजण्याइतकी विदेशात आहेत. तीर्थक्षेत्र हा असा परिसर असतो. त्या विशिष्ट स्थानी पुष्कळ मोठ्या प्रमाणात दैवी लहरी कार्यरत असतात. त्यामुळे तेथे पुष्कळ सात्त्विकता असते. या सात्त्विकतेचा लाभ तेथे येणार्या भाविकांना, तेथे विधी करणार्या भक्तांना होतो. त्यामुळे ‘तीर्थक्षेत्राची सात्त्विकता टिकवून ठेवणे’, हे स्थानिक आणि राज्य प्रशासनाचे कर्तव्य असते. अध्यात्म आणि धर्म हेच आपल्या देशाचे वैशिष्ट्य आहे अन् ‘ते टिकवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणे’ हे शासन आणि समाज यांचे कर्तव्य बनते. ‘चिरकाल चैतन्याचे प्रसारण करणारी तीर्थक्षेत्रे ही भारताची केंद्रस्थाने आहेत’, असे म्हटले, तर चूक नव्हे. अनेक आक्रमणे होत असूनही भारत या तीर्थक्षेत्री साधना करणार्या महात्म्यांमुळे टिकून आहे. ‘द्रष्टा दृश्यवशात् बद्ध: दृश्याभावात् विमुच्यते ।’ या प्रसिद्ध वचनानुसार ‘डोळ्यांनी पाहिले, तर माणूस त्या दृश्यात अडकू शकतो.’ मद्य किंवा मांस यांची दुकाने हे मनुष्याच्या वासना जागृत करण्याचे माध्यम असते. त्यामुळे तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी तमोगुण वाढवणारी मद्य आणि मांस यांची दुकाने नसणेच योग्य आहे. निवडणुकांच्या काळातही मद्याची दुकाने बंद ठेवण्यात येतात. याचा अर्थ ‘प्रलोभनाला माणूस कसा भुलतो’, याचे दुष्परिणाम सरकार जाणते. ‘देवाच्या स्थानाचे पावित्र्य जपण्यासाठी मात्र तेवढे कडक निर्बंध घातले जात नाहीत’, हे आध्यात्मिक भूमी असणार्या भारताचे दुर्दैव आहे. काही तीर्थक्षेत्रे तर चक्क ‘सहलीची ठिकाणे’ झाली आहेत. केदारनाथ येथे वर्ष २०१८ मध्ये आलेल्या महापुराच्या संकटानंतर शंकराचार्यांनी ‘तेथील पावित्र्य भंग झाल्यामुळे नैसर्गिक संकट आले’, असे सांगितले होते. तीर्थक्षेत्री जाणे म्हणजे ‘भक्ताचे भगवंताच्या भेटीला जाणे’ हा भाव असणारे आता अत्यल्प होत असून ‘सहलीला जाऊन मजा करणे’ अशा भावनेने जाणारे लोक वाढले आहेत.
पंढरपुरातील प्रयत्न अपुरे !
महाराष्ट्रातील पंढरपुरात गेली अनेक वर्षे मद्य आणि मांस विक्रीवर बंदी येण्यासाठी धर्मप्रेमी प्रयत्नरत आहेत. खरे तर वर्ष २०१८ मध्ये मंदिर समितीने हा ठरावही संमत केला होता; परंतु संबंधित व्यावसायिकांनी त्याला विरोध केला. त्यामुळे सध्या केवळ वारीच्या काळात ही दुकाने बंद ठेवण्यात येतात. वारकर्यांच्या अधिवेशनातही या संदर्भातील ठराव संमत करण्यात आले होते आणि त्या संदर्भातील निवेदनेही सरकारपर्यंत पोचवली होती. खरे तर बहुसंख्य वारकरी हे ‘माळ’ घातलेले, म्हणजे मद्य, मांस न घेणारे असतात; पण तरीही अद्याप पंढरपुरात याविषयीचा निर्णय होऊ शकलेला नाही. ‘समाजाला हानीकारक व्यवसायात सहभागी असणार्यांनाही किती पाप लागत असेल’, हे त्यांना लक्षात आणून दिले गेले पाहिजे. त्यामुळे त्यांच्यातही काही अंशी परिवर्तन होऊ शकते. ‘सरकारच्या हातात सर्व काही असल्याने ते योग्य निर्णय घेऊ शकते आणि प्रशासनाकडून कार्यवाहीही करवून घेऊ शकते’, हे उत्तरप्रदेशच्या उदाहरणावरून लक्षात येईल. गेली अनेक वर्षे नि(अ)धर्मी काँग्रेस सरकारने या देशात हिंदूंच्या भावनांची कदर केली नाही. त्यामुळे ‘आता हिंदु विचारांचे सरकार आल्याने देशभरातील तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी उत्तरप्रदेशप्रमाणेच निर्णय घेऊन त्याची कडक कार्यवाही प्रशासनाकडून करून घ्यावी’, असे या निर्णयानंतर भाविक, हिंदू आणि धर्मप्रेमी यांना वाटत आहे !