अशाने भ्रष्टाचार संपणार का ?
नाशिक येथील शिक्षणाधिकारी वैशाली झनकर यांना नुकतेच ८ लाख रुपयांची लाच घेतांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अटक करण्यात आली; मात्र अजूनही त्यांना शासनाने निलंबित केलेले नाही. केवळ झनकरच नाही, तर राज्यात तब्बल २०४ लाचखोर अजूनही उजळ माथ्याने शासनाच्या सेवेत आहेत, यासारखे दुर्दैव आणखी कोणते ? यापेक्षा गंभीर म्हणजे लाचखोरीचा गुन्हा न्यायालयात सिद्ध होऊन न्यायालयाने शिक्षा ठोठावल्यानंतरही २९ जणांना शासनाने अद्यापपर्यंत सेवेतून बडतर्फ केलेले नाही. हे म्हणजे ‘लाचखोरी देशातून हद्दपार करायचीच नाही’, असा चंगच जणू शासनाने बांधला आहे का ? असे कुणाला वाटल्यास चूक ते काय ?
लाच घेतांना सापडलेले अधिकारी आणि कर्मचारी राजकीय लागेबांधे वापरून अन् वरिष्ठांशी असलेल्या संबंधातून निलंबन होऊ नये, यासाठी प्रयत्न करतात. असे प्रत्येक क्षेत्रात होतांना दिसते. शिक्षा झाल्यानंतर संबंधित व्यक्ती शिक्षेच्या विरोधात उच्च न्यायालयात अपील करते. त्यामुळे तिला बडतर्फ केले जात नाही. त्यामुळे ‘आपल्या देशात लाच घेतांना व्यक्ती सापडूनही काही उपयोग आहे कि नाही ?’ असेच कुणालाही वाटणार.
एकूण ही स्थिती पाहिल्यास देशातील भ्रष्टाचार संपवण्यासाठी किती कठोर प्रयत्न करायला हवेत, याचा अंदाज येतो. भ्रष्टाचार केलेल्यांना शिक्षा सुनावली जाते; परंतु त्यांना प्रत्यक्ष शिक्षा होण्यासाठी दिरंगाई होते. जे दिरंगाई करतील, त्यांनाही शिक्षा द्यायला हवी, अशी आता स्थिती झाली आहे. भ्रष्टाचार नष्ट होण्यासाठी शिक्षा करणार्या शासनकर्त्यांची इच्छाशक्ती वाढायला हवी. ईश्वराच्या नियमानुसार एकाने चूक करणे आणि त्या चुकीवर उत्तरदायी व्यक्तीने काहीही उपाय न काढणे यामध्ये दोघेही त्या चुकीच्या शिक्षेला तितकेच पात्र असतात. संबंधितांना शिक्षा दिली नाही, तरी ईश्वरी नियमानुसार त्याला शिक्षा मिळतेच आणि ती शिक्षा अधिक कठोर असू शकते. त्याऐवजी नियमानुसार शिक्षा दिल्यास अधिक योग्य ! समाजाला धर्मशिक्षण मिळत नसल्याने त्यांना हे शास्त्र ठाऊक नाही, तसेच आपण करत असलेल्या कृतींचा आपल्या जीवनावर काय परिणाम होतो, हेही लक्षात येत नाही. ‘भ्रष्टाचार निर्मूलनासाठी आता आहे, ही स्थिती अशीच राहिल्यास भ्रष्टाचार संपणार का ?’ असाच प्रश्न सामान्यांच्या मनात आहे आणि त्याचे उत्तर मिळण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !
– श्री. सचिन कौलकर, मिरज