कोरोना महामारीतील संचारबंदीमुळे कदंब परिवहन महामंडळाला आर्थिक फटका
४१७ बसगाड्या बंद ठेवल्याने प्रतिदिन २० लाख रुपयांची हानी सोसावी लागली !
पणजी – कोरोना महामारीच्या कालावधीत राज्यात लागू करण्यात आलेल्या संचारबंदीमुळे कदंब परिवहन महामंडळाला आर्थिक फटका बसला आहे. या कालावधीत महामंडळाच्या ४१७ बसगाड्या बंद ठेवाव्या लागल्या होत्या. त्यामुळे कदंब महामंडळाला प्रतिदिन २० लाख रुपयांची हानी सोसावी लागत होती. त्यामुळे प्रतिवर्ष सरकारी अनुदान घेणार्या कदंब महामंडळाच्या आर्थिक अडचणीत वाढ झाली होती; परंतु आता या स्थितीत थोडी सुधारणा झाली आहे. कदंब महामंडळाच्या ५० टक्के बसगाड्या चालू करण्याची अनुमती देण्यात आली आहे. सध्या कदंबच्या ११७ बसगाड्या राज्यात वेगवेगळ्या मार्गांवर धावत आहेत. त्यामध्ये आता ३ आंतरराज्य मार्गांवरील बसगाड्यांची भर पडली आहे. श्री गणेशचतुर्थीपूर्वी बसगाड्या चालू झाल्याने प्रवाशांची गैरसोय दूर होणार आहे.
१ सप्टेंबरपासून मुंबई, पुणे, बेंगळुरू इत्यादी महामार्गांवरील बससेवा चालू करण्यात आली आहे, तसेच मैसुरू येथे जाणार्या बसगाड्या १० सप्टेंबरपासून चालू करण्यात येणार आहेत. या मार्गांवर प्रतिदिन सायंकाळी पणजी कदंब बसस्थानकातून प्रत्येकी १ बस सुटणार आहे. बेळगाव आणि कारवार या मार्गांवरील कदंबच्या बससेवेला चांगला प्रतिसाद लाभत आहे. बेळगाव मार्गावर प्रतिदिन ७ बसगाड्या धावतात.