सावंतवाडी येथे नवविवाहितेच्या आत्महत्येच्या प्रकरणी पती, सासू आणि सासरे यांना पोलीस कोठडी
सावंतवाडी – शहरातील सबनीसवाडा येथील नवविवाहिता सौ. निधी पास्ते यांना आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याच्या प्रकरणी पती, सासू आणि सासरे यांना येथील न्यायालयाने ४ दिवसांची पोलीस कोठडी बजावली.
सौ. निधी पास्ते यांनी ३१ ऑगस्टच्या रात्री सावंतवाडी शहरातील सबनीसवाडा येथील एका इमारतीत गळफास लावून आत्महत्या केली होती. १ सप्टेंबरला तिचे वडील प्रभाकर माळकर (रहाणार कारिवडे, सावंतवाडी) यांनी याविषयी सावंतवाडी पोलीस ठाण्यात तक्रार नोंद केली. माळकर यांनी तक्रारीत म्हटले आहे की, सौ. निधी हिचा विवाह वर्ष २०१८ मध्ये नीलेश पास्ते (साहाय्यक पोस्टमास्तर, देवसू तथा रहाणार कलंबिस्त, सावंतवाडी) यांच्याशी झाला. त्या दिवसापासून सौ. निधी हिचा पती नीलेश आणि सासू-सासरे मानसिक अन् शारीरिक छळ करत होते. ३१ ऑगस्टला नीलेश याने तिच्याशी भांडण करून तिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केले.
या तक्रारीवरून पोलिसांनी नीलेश पास्ते, सासरे ज्ञानेश्वर पास्ते आणि सासू सौ. निर्मला पास्ते यांच्यावर गुन्हा नोंद करून त्यांना अटक केली होती. २ सप्टेंबरला या तिघांना पोलिसांनी न्यायालयात उपस्थित केल्यावर न्यायालयाने त्यांना पोलीस कोठडी बजावली.