भुदरगड तालुक्यातील (जिल्हा कोल्हापूर) मेघोली तलाव फुटल्याने झाली पिकांची हानी आणि एक महिला गेली वाहून !
भुदरगड (जिल्हा कोल्हापूर), २ सप्टेंबर – भुदरगड तालुक्यातील मेघोली लघु पाटबंधारे तलाव १ सप्टेंबर या दिवशी रात्री १०.३० च्या सुमारास फुटला. तलाव फुटल्याने पाण्याच्या प्रवाहात एक महिला वाहून गेली आहे. परिसरातील पिकांची मोठी हानी झाली असून शेतीचे साहित्य, गुरे आणि वाहने वाहून गेली आहेत.
तलाव फुटल्याने मेघोली, नवले, सोनुर्ली, ममदापूर, वेंगरूळ या गावांची मोठी हानी झाली आहे. प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून बचावकार्य युद्धपातळीवर चालू आहे. तलाव फुटण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही. यात शेतकर्यांची मोठी हानी झाल्याने शासनाने तात्काळ पंचनामे करून त्याची हानीभरपाई द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकर्यांनी केली आहे.