२० सहस्र माथाडी कामगारांचे लसीकरण करणार ! – देवेंद्र फडणवीस
नवी मुंबई – जीवनावश्यक वस्तूंची चढ-उतार करण्यामध्ये माथाडी कामगारांची महत्त्वाची भूमिका आहे. त्यामुळे त्यांचे प्राधान्याने कोरोनाचे लसीकरण होणे आवश्यक आहे. यासाठी आपण २० सहस्र माथाडी कामगारांचे लसीकरण करण्यासाठी नरेंद्र पाटील यांच्या अण्णासाहेब पाटील विकास फाऊंडेशनला साहाय्य करणार आहे, अशी माहिती राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तुर्भे येथे दिली. अण्णासाहेब पाटील विकास फाऊंडेशनच्या वतीने माथाडी भवन येथे १ सहस्र माथाडी कामगारांसाठी विनामूल्य लसीकरण आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या शुभारंभप्रसंगी फडणवीस बोलत होते.
फडणवीस पुढे म्हणाले की, माथाडी नेते नरेंद्र पाटील यांच्या वतीने राबवला जाणारा माथाडी कामगारांचे विनामूल्य लसीकरण हा उपक्रम स्तुत्य आहे. यासाठी माथाडी कामगार संघटना आणि फाऊंडेशन यांच्या कार्याला माझे नेहमीच सहकार्य राहील. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ऐतिहासिक कार्याला चालना देणारा हा उपक्रम आहे. देशात मोदी यांनी चार लसींची निर्मिती केली. देशातील ५० कोटी जनतेचे लसीकरण झाले आहे. प्रतिदिन ५० ते ६० लाख लोकांचे लसीकरण होत असून येत्या डिसेंबरपर्यंत देशातील बहुतांश जनतेचे लसीकरण होऊन देश कोरोनामुक्त होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. नरेंद्र पाटील हे पुढाकार घेऊन आपले सामाजिक दायित्व पार पाडत आहेत.
नरेंद्र पाटील प्रास्ताविक भाषणात म्हणाले की, देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाज आणि माथाडी कामगार यांच्या हितासाठी अण्णासाहेब पाटील विकास फाऊंडेशनची स्थापना करण्याचा मोलाचा सल्ला दिला. म्हणूनच या कार्यक्रमाचे आयोजन करता आले.