शासकीय नोकरी प्रामाणिकपणे करणारे पुणे येथील पू. गजानन बळवंत साठे यांचा साधनाप्रवास !
१. जन्म आणि बालपण
‘माझा जन्म ६.१२.१९४३ या दिवशी मध्यमवर्गीय कुटुंबात माझ्या आजोळी कोल्हापूरमधील शाहूपुरी येथे झाला. मी माझे २ धाकटे भाऊ (श्री. चिंतामणि साठे आणि श्री. विनायक साठे), २ धाकट्या बहिणी (सौ. सुधा बर्डे आणि श्रीमती अंजली मोडक) आणि विधवा आत्या ((कै.) श्रीमती सरस्वती जोशी) यांच्यासह पुण्यातील नारायण पेठेत भाड्याच्या जुन्या घरात राहून शिक्षण घेत होतो. भावंडांमध्ये मीच मोठा होतो. माझे वडील केंद्रशासनाच्या नोकरीत असल्याने त्यांचे वारंवार स्थानांतर होत असे. त्यामुळे माझे आई-वडील ((कै.) उषा बळवंत साठे आणि (कै.) बळवंत गणेश साठे) त्या वेळी आमच्या समवेत पुण्यात रहात नव्हते.
२. पानशेतचे धरण फुटल्यावर अंगावरच्या कपड्यांनिशी घरातून बाहेर पडावे लागणे, त्यामुळे जीव वाचणे; मात्र पुरामुळे घराची हानी होऊन घरातील सर्व साहित्य वाहून जाणे
१२.७.१९६१ या दिवशी पानशेत येथील धरण फुटल्याने पुण्यात महापूर आला होता. तेव्हा मी १८ वर्षांचा होतो. सकाळची वेळ असल्यामुळे आम्ही सतर्क होतो. आम्ही नेसत्या वस्त्रांनिशी घराबाहेर पडलो आणि महापालिकेच्या एका शाळेत आसरा घेतला. पूर ओसरल्यावर आम्ही घरी परत आलो. घरी आल्यावर पाहिले, तर आमच्या घराच्या मातीच्या भिंती खचल्या होत्या आणि घरातील सर्व सामान वाहून गेले होते. तेव्हा माझे वडील नोकरीनिमित्त दौंड (जिल्हा पुणे) येथे रहात होते; म्हणून काही दिवस आम्हीही दौंडला रहायला गेलो. आम्ही केवळ ईश्वरी कृपेनेच वाचलो होतो.
३. पूरग्रस्त म्हणून शासनाकडून भूमी मिळणे आणि ऋण काढून त्या भूमीवर घर बांधणे
मी पूरग्रस्त असल्याने वडिलांच्या प्रयत्नांनी आणि श्री गुरुकृपेनेच शासनाकडून सहकारनगर क्र. १ मध्ये आम्हाला पूरग्रस्तांसाठीच्या प्रस्तावित पुनर्वसन ‘हौसिंग सोसायटी’त भूमी (प्लॉट) मिळाली. मी मोठा असल्याने आणि माझे शिक्षण पूर्ण झाल्यावर मला नोकरी लागल्याने मी ऋण (कर्ज) काढले आणि त्या पैशांतून आम्ही तिथे घर बांधले.
४. शिक्षण आणि नोकरी
वर्ष १९६७ मध्ये मी स्थापत्य अभियांत्रिकीची (‘सिव्हिल इंजिनीयरिंग’ची) परीक्षा उत्तीर्ण होऊन पदवीधर झालो. त्यानंतर मी लगेचच शासकीय सेवेत नगररचना आणि मूल्य निर्धारण (टाऊन प्लानिंग अँड व्हॅल्युएशन) विभागात रुजू झालो. वर्ष १९८३ मध्ये शासनाने माझी त्यांच्या खर्चाने पदव्युत्तर (‘एम्.ई. सिव्हिल’चे) शिक्षण घेण्यासाठी निवड केली. तेव्हा पुणे विद्यापिठातून नगर आणि जनपद रचना (टाऊन अँड कंट्री प्लानिंग) या विषयातील दोन वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करून देवाच्या कृपेने मी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालो. मी ३४ वर्षे महाराष्ट्रातील ६ जिल्ह्यांमध्ये प्रामाणिकपणे नोकरी केली. वर्ष २००१ मध्ये मी प्रथम श्रेणी अधिकारी (क्लास वन ऑफिसर) या पदावरून सेवानिवृत्त झालो. या काळात मी कुठल्याही प्रलोभनांना बळी पडलो नाही. आज मला जाणीव होत आहे, ‘हे सर्व गुरुदेवांची कृपा आणि त्यांचे आशीर्वाद यांमुळेच शक्य झाले.’
५. सनातन संस्थेच्या संपर्कात येण्यापूर्वी केलेली साधना
आमच्या कुटुंबात श्री गणेशाची उपासना होत होती. आम्ही पुण्यातील श्री कसबा गणपति आणि श्री जोगेश्वरीदेवी यांना आमचे इष्टदैवत मानत होतो.
६. सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार केलेली साधना आणि सेवा
मी वर्ष २००२ पासून सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करू लागलो. तेव्हा मी सत्संगाला जात असे. पुढे मी सेवा करू लागलो.
७. श्री गुरुकृपेने दुचाकी चालवण्याच्या भीतीवर मात करता येणे आणि गेली २० वर्षे दुचाकी चालवत असल्यामुळे अनेक सेवा करू शकणे
सेवा करण्यासाठी मला दुचाकी वापरणे सोयीचे होते; पण मला दुचाकी चालवायला भीती वाटायची. मी तरुणपणी दुचाकी चालवायला शिकलो होतो आणि वाहन परवानाही काढला होता; पण नोकरीत असतांना काही ठिकाणी देवाच्या कृपेने मला चारचाकी वाहन आणि चालक उपलब्ध होते. त्यामुळे मी दुचाकी चालवली नव्हती. सेवानिवृत्त झाल्यावर श्री गुरूंच्या कृपेने मला दुचाकी चालवतांना वाटणार्या भीतीवर मात करता आली. गेली २० वर्षे मी दुचाकीमुळे अनेक सेवा करू शकलो.’
– (पू.) श्री. गजानन साठे (वय ७७ वर्षे), सातारा रस्ता, पुणे. (ऑगस्ट २०२१)