धार्मिक वृत्ती काही नास्तिक लोकांना पटली नसल्याने त्यांनी खंडणी मागितल्याचा भोसले यांचा दावा !
सोलापूर येथील मनोहरमामा भोसले यांच्याविरुद्ध केलेल्या आरोपांचे पुणे येथे पत्रकार परिषद घेऊन खंडण
पुणे, १ सप्टेंबर – काही जण आपल्याकडे २ कोटी रुपयांची खंडणी मागत असून ‘पैसे दिले नाही, तर तुमचा आसाराम बापू करू’, अशी मला धमकी दिली जात आहे. त्यामुळे माझी अपकीर्ती करणार्यांविरुद्ध १०० कोटी रुपयांचा दावा करणार असल्याचे मनोहर भोसले यांनी सांगितले. सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील उंदरगाव येथील मनोहरमामा भोसले यांच्याविरुद्ध गेल्या काही दिवसांपासून आरोप केले जात आहेत. त्याविषयी भोसले यांनी ३१ ऑगस्ट या दिवशी पुणे येथे पत्रकार परिषद घेऊन या आरोपांचे खंडण केले.
मनोहर भोसले यांनी सांगितले की, मी कोणताही अवतार आणि बाबा नाही, मी केवळ श्री बाळूमामांचा निस्सिम भक्त म्हणून सेवा करत आहे. वैयक्तिक श्रद्धेतून मी बाळूमामांचे मंदिर उभारले आहे. मी ज्योतिष शास्त्राचा अभ्यास केला आहे. त्यातून अनेकांना धार्मिक सल्ले आणि पारायण करण्याचा सल्ला देत असतो. मंदिरात येणार्या लोकांच्या गाड्या ‘पार्किंग’वरून काही लोकांच्या मनामध्ये राग आहे. त्यामुळे मी भक्तांकडून पैसे उकळतो, असेही आरोप माझ्यावर होत आहेत. भक्तगण त्यांच्या स्वच्छेने शिवसिद्धि संचालित श्री मामा संस्था या संस्थेकडे देणगी देतात. ही देणगी केवळ मंदिर बांधकाम, तसेच भक्त निवासासाठी वापरली जाते. आमची ही धार्मिक वृत्ती काही नास्तिक लोकांना पटली नसल्याने त्यांनी माझ्याकडे आणि भक्तांकडे खंडणी मागितली आहे. त्यामुळे मी करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे.