गणेशोत्सवाच्या काळात वारसा हक्क प्रकरणी गावपातळीवर शिबिरांचे आयोजन करा ! – उपजिल्हाधिकारी प्रशांत पानवेकर यांची तहसीलदारांना सूचना
सिंधुदुर्ग (जि.मा.का.) – श्री गणेशचतुर्थीनिमित्त असंख्य खातेदार (नागरिक) जिल्ह्यात येतात. या कालावधीत विशेष गोष्ट म्हणून वारस तपासनोंदीची माहिती देणारी शिबिरे गावपातळीवर आयोजित करावीत, अशा सूचनेचे पत्र सामान्य प्रशासन विभागाचे उपजिल्हाधिकारी प्रशांत पानवेकर यांनी जिल्ह्यातील सर्व तहसीलदारांना पाठवले आहे.
या पत्रात म्हटले आहे की, गावपातळीवर काम करणार्या तलाठ्यांकडे असलेल्या गाव दप्तरातील (शासकीय दस्तऐवज) एक महत्त्वाची नोंदवही म्हणजे फेरफार नोंदवही आहे. धारण केलेल्या भूमीवर निर्माण झालेल्या हक्कांची किंवा हक्कांमध्ये झालेल्या पालटांचे संक्षिप्त वर्णन या नमुन्यात नोंदवायचे असते. भूमीमध्ये होणारे हक्कांचे पालट हे प्रामुख्याने खरेदी- विक्री व्यवहार, भूमीची वाटणी, गहाणखत, हक्कसोडपत्र, वारसाहक्क, बक्षीसपत्रे, दत्तकपत्र, कर्ज, विहिरीची नोंद, भूसंपादन, वननोंदी, कुळवहिवाटीच्या नोंदी केल्या जातात. ७/१२ उतारा आणि इतर अभिलेखात होणारे फेरपालट आणि त्याविषयीच्या उपाययोजनांच्या संदर्भात शासन निर्णयाप्रमाणे सूचना निर्गमित केलेल्या आहेत.
प्रामुख्याने श्री गणेशचतुर्थीनिमित्त असंख्य खातेदार सिंधुदुर्ग जिल्ह्यात येत असतात. या कालावधीत विशेष गोष्ट म्हणून वारस तपास नोंदीचे शिबिर आयोजन करून आणि त्याविषयी आवश्यक ती प्रचार अन् प्रसिद्धी करून गावपातळीवर कार्यवाही करावी आणि केलेल्या कार्यवाहीचा सविस्तर अहवाल सजा (तलाठ्यांचे क्षेत्र) आणि मंडळ निहाय सादर करावा, असे या पत्रात म्हटले आहे.