(कै.) सौ. पूजा रेळेकर यांच्या निधनानंतर साधिकेला पडलेल्या स्वप्नातून ‘गुरुदेव प्रत्येक साधकाच्या मृत्यूनंतरही त्याची काळजी घेतात’, याची तिला आलेली अनुभूती !
१. स्वप्नात दिसलेले दृश्य
सौ. पूजाताई हात जोडून शरणागतभावाने गुरुदेवांच्या चरणांकडे पहात असणे आणि गुरुदेवांनी त्यांना प्रसाद म्हणून खीर खायला देणे : ‘जुलै २०२१ च्या शेवटच्या आठवड्यात एकदा पहाटे पूजाताई माझ्या स्वप्नात आली. तेव्हा मला दिसले, ‘पूजाताईच्या पूर्ण शरिरावर सूज आहे. ती हात जोडून शरणागतभावाने गुरुदेवांच्या चरणांकडे पहात आहे. त्या वेळी गुरुदेव पुष्कळ उंच दिसत होते. काही क्षणांतच गुरुदेवांनी ताईला एका पेल्यात प्रसाद म्हणून खीर दिली. ताईने ती खीर ग्रहण करेपर्यंत ते ताईकडे पहात होते. ते दोघे जण एकमेकांकडे आनंदाने पहात होते. प.पू. गुरुदेव स्मित हास्य करत होते आणि ताईच्या मुखावरही हास्य होते.’ त्यानंतर जाग आल्यावर मला कुठल्याच प्रकारची भीती वाटली नाही. मी घड्याळात पाहिले. तेव्हा पहाटेचे ३.३० वाजले होते. तेव्हा मला आतून चांगले वाटत होते.
२. गुरुदेवांनी साधिकेला स्वप्नाचा सुचवलेला अर्थ
गुरुदेवांनी सौ. पूजा यांच्या निधनानंतर त्यांना भरकटू न देता स्वतःच्या जवळच ठेवल्याने त्यांनी शरणागतभावाने गुरुदेवांच्या चरणांकडे पहाणे आणि गुरुदेवांनी खीर देऊन त्या जिवाच्या पुढील प्रवासासाठी शक्ती अन् चैतन्य देणे : ‘मी पूजाताईचा विचारही करत नव्हते, तरी देवाने आज मला हे दृश्य का दाखवले ?’, असा विचार माझ्या मनात आला. त्या वेळी गुरुदेवांनी मला पुढील विचार दिला, ‘या जिवाचे आयुष्य एवढेच होते’, हे गुरुदेवांना आणि त्या जिवालाही ठाऊक होते. पूजाताईचे निधन झाल्यावर परात्पर गुरु डॉक्टरांनी सूक्ष्मातून तिला स्वतःजवळ ठेवले. तिला कुठेही भटकू दिले नाही; म्हणून तो जीव शरणागतभावाने त्यांच्या चरणांकडे पहात होता. गुरुदेवांनी त्या जिवाने देह त्यागल्यानंतर त्याला प्रसाद म्हणून खीर दिली. याचा अर्थ ‘त्या जिवाचा पुढील प्रवास सुखकर व्हावा’, यासाठी त्यांनी तिला प्रसादाच्या माध्यमातून शक्ती आणि चैतन्य दिले. त्या वेळी माझी भावजागृती झाली आणि ‘परात्पर गुरु डॉक्टर प्रत्येक जिवाची किती काळजी घेतात !’, याबद्दल माझ्याकडून कृतज्ञता व्यक्त झाली. सकाळी मी या स्वप्नाविषयी आईला सांगितले. तेव्हा तीही म्हणाली, ‘‘परात्पर गुरु डॉक्टर तिची काळजी घेत आहेत.’’
‘हे गुरुदेवा, आम्ही जिवंत असतांना तुम्ही आमची अगदी फुलासारखी काळजी घेता आणि मृत्यूनंतरही आमचा पुढचा प्रवास तुम्ही सुखकर करता’, यासाठी कोटीशः कृतज्ञता !’
– कु. नीता अहिरे, पुणे (२७.८.२०२१)