वयोवृद्ध, ज्ञानवृद्ध आणि तपोवृद्ध असूनही शिकण्याची वृत्ती असणारे सनातनच्या संतांच्या मांदियाळीतील १०१ वे संतरत्न पू. अनंत आठवले (वय ८६ वर्षे) !

श्रावण कृष्ण पक्ष एकादशी (२.९.२०२१) या दिवशी पू. अनंत आठवले (परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे ज्येष्ठ बंधू) यांचा ८६ वा वाढदिवस आहे. त्या निमित्त साधिकेला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

पू. अनंत आठवले

पू. अनंत आठवले (पू. भाऊकाका) यांच्या चरणी ८६ व्या वाढदिवसानिमित्त सनातन परिवाराच्या वतीने कृतज्ञतापूर्वक नमस्कार !

१. आनंदी

‘पू. भाऊकाका आणि काकू (सौ. सुनीती आठवले वय ७७ वर्षे) यांना पुष्कळ शारीरिक त्रास आहेत, तरीही ते दोघेही सतत आनंदी असतात.

सौ. सुनीती आठवले

२. प्रेमभाव

पू. काका आणि काकू पुष्कळ प्रेमळ आहेत. त्यांनी मला १५ दिवस नातीसारखे सांभाळले. काकू मला अनेक वेळा ‘आज घरी जाऊ नकोस. इथेच थांब’, असे म्हणायच्या. तेव्हा मलाही घरी जावेसे वाटत नसे.

३. इतरांचा विचार करणे

अ. मी पू. काकांच्या समवेत टंकलेखनाची सेवा करते. त्या वेळी पू. भाऊकाका मला ‘एखाद्या विषयाच्या संदर्भात माहिती आहे का ?’, असे विचारतात. मला त्याविषयी माहिती नसेल, तर ते मला समजेल, अशा पद्धतीने समजावून सांगतात.

आ. एकदा पू. काकांना एका धारिकेतील प्रश्नांची उत्तरे ग्रंथांशी संबंधित सेवा करणार्‍या साधकाला पाठवायची होती. त्या वेळी पू. काकांनी ती धारिका लगेचच तपासून दिली. तेव्हा त्यांचा ‘याविषयीची सेवा करणार्‍या साधकाला उशीर व्हायला नको’, असा विचार होता.

४. जिज्ञासू आणि शिकण्याची वृत्ती

एखाद्या धारिकेतील काही भाग पू. काकांच्या लक्षात आला नाही, तर त्याविषयी पूर्ण समजेपर्यंत ते प्रयत्न करतात. तेव्हा त्यांची तो विषय अभ्यासून त्यातून शिकण्याची तळमळ लक्षात येते. एकदा पू. काकांना एका शब्दाच्या व्याकरणाविषयी शंका होती. तेव्हा त्यांनी तो शब्द शब्दकोषात पाहिला, तरीही पू. काकांनी मला सांगितले, ‘‘रामनाथी आश्रमातील संकलकांचा अभ्यास असतो. त्यांना त्यांचा अभ्यास विचारूया आणि तो अभ्यास सांगायला सांगूया.’’

५. स्वतःच्या आचरणातून इतरांना शिकवणे

एकदा पू. काकांनी मला सांगितले, ‘‘एकदा श्री. विलासने (पू. भाऊकाका आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे कनिष्ठ बंधू यांनी) मला सांगितले, ‘‘गीतेतील एखादी गोष्ट तुम्हाला पटली नाही, तर ‘तुम्हाला अजून कळलेले नाही’, असे समजा आणि आणखी विचार करा.’’ पू. काका हे सूत्र प्रत्यक्ष कृतीत आणत आहेत. यातून ‘आपल्याला एखादी गोष्ट समजली नसेल, तर ती समजून घेईपर्यंत धडपडायला हवे’, हे मला शिकायला मिळाले. पू. काकांच्या आचरणातून ‘एखादी गोष्ट धडपड करून समजून घेतल्यावर त्यातून पुष्कळ आनंद मिळतो’, हेही माझ्या लक्षात आले.

६. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रतीचा भाव

एकदा पू. भाऊकाकांनी परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी बोलतांना त्यांचा उल्लेख ‘परम पूज्य’, असा केला. त्या वेळी मी त्यांना म्हणाले, ‘‘तुम्ही परात्पर गुरु डॉक्टरांना ‘परम पूज्य’ म्हणता का ?’’ तेव्हा पू. भाऊकाका मला म्हणाले, ‘‘लहान भाऊ आहे; म्हणून काय झाले ? खरेतर मी चुकत आहे. मी ‘परात्पर गुरु’ म्हणायला हवे.’’ (‘परात्पर गुरु डॉ. आठवले पू. भाऊकाकांपेक्षा वयाने लहान आहेत.’ – संकलक)

‘परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने मला पू. भाऊकाकांच्या समवेत सेवा करण्याची संधी मिळाली’, त्याबद्दल मी पुष्कळ कृतज्ञ आहे.’ – सौ. समृद्धी राऊत, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

(१२.७.२०२१)